बॉलिवूडमध्ये अभिनय, कॉमेडी अन् डान्सर अशी वेगवेगळी कौशल्य असणारे खूप कमी कलाकार असतात. त्यापैकीच एक आहेत जावेद जाफरी. ते एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आहेत, ज्यांनी आपल्या विनोदी स्टाईलने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. एक उत्तम कॉमेडियन असण्यासोबतच, ते एक अप्रतिम डान्सर देखील आहेत. सोमवारी (04 डिसेंबर) जावेद त्यांचा 60वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित खास गोष्टी.
जावेद जाफरी (Jaaved Jaffrey) यांचा जन्म 4 डिसेंबर, 1963 रोजी उत्तर प्रदेशात झाला. त्यांचे खरे नाव सईद जावेद अहमद जाफरी आहे. ते बॉलिवूडचे ज्येष्ठ विनोदी अभिनेता जगदीप यांचा मुलगा आहेत. लहानपणापासूनच त्यांना चित्रपटसृष्टीचं वातावरण मिळालं, ज्याचा त्यांना नंतर खूप फायदा झाला. त्यांच्यामध्ये त्यांच्या वडिलांची सावली दिसते. जावेद हे एक चांगले कॉमेडियन, तसेच उत्तम डान्सर आहेत.
जावेद जाफरी यांनी डिज्नीच्या सर्वात लोकप्रिय कार्टून शो ‘मिकी माऊस’, ‘गुफी’ आणि ‘डॉन कार्नेज’च्या हिंदी व्हर्जनला स्वतःचा आवाज दिला आहे. डिज्नीच्या ‘जंगल बुक २’ आणि ‘द इनक्रेडिबल’चे हिंदी व्हर्जन स्वतः जावेदने डब केली होती. अभिनयासोबतच डबिंगच्या जगातही त्यांनी नाव कमावले आहे.
जावेद यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1979 मध्येच केली होती. परंतु 1986 मध्ये आलेल्या ‘मेरी जंग’ या सिनेमात त्यांनी साकारलेल्या उत्कृष्ट व्यक्तिरेखेमुळे त्यांना खरी ओळख मिळाली. ते मोठ्या पडद्यावर चांगलेच सक्रिय होते. मात्र केबल सुरू होताच, ते टीव्हीकडे वळाले.
चॅनल व्हीसाठी कार्यक्रम करून त्यांनी टीव्हीच्या दुनियेत प्रवेश केला. त्यांनी ‘बूगी बूगी’ शो दिग्दर्शित केला होता आणि ते त्याचे परीक्षक होते. हा त्यांच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय डान्स शोपैकी एक होता. याशिवाय जावेद चित्रपटांमध्येही सक्रिय आहेत. ‘धमाल’, ‘सिंग इज किंग’, ‘बाला’, ‘3 इडियट्स’, ‘तहलका’, ‘भूत पोलीस’, ‘कुली नंबर 1’, ‘शेरशाह’, ‘लुप्त’, ‘सूर्यवंशी’ यांसारख्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केले.
जावेद स्वतः एका फिल्मी कुटुंबातील आहे. त्यांचे वडील जगदीप हे ‘शोले’मधील त्यांच्या प्रतिष्ठित व्यक्तिरेखेसाठी नेहमीच आठवले जातात. जावेद यांच्या मुलानेही आता चित्रपटात पदार्पण केले आहे. त्यांचा मुलगा मीझान जाफरी याने प्रियदर्शनच्या ‘हंगामा 2’मधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. जावेदला आणखी दोन मुले आहेत, एक मुलगी अलाविया जाफरी आणि मुलगा अब्बास जाफरी. (comedy maestro jaaved jaaferi earned a lot of name as a dancer too know special things related to him)
अधिक वाचा-
–नेटकऱ्यांच्या ‘त्या’ कमेंटवर संतापली केतकी; म्हणाली, ‘तुम्हाला सुद्धा घरात बहिणी असतील आई असेल…’
–अभिनयात पास पण राजकारणात नापास; विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या ‘या’ अभिनेत्रीला मोठा दणका