मागचे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक होते. २०२० मध्ये कोरोनाचा भारतात प्रवेश झाला आणि हळूहळू कोरोनाच्या भीतीने सर्वच क्षेत्रे बंद झाली. त्यात मनोरंजन क्षेत्राचा देखील समावेश होता. कोरोनामुळे चित्रपटगृह आणि नाट्यगृह दोन्ही बंद झाले. मात्र २०२० च्या डिसेंबर महिन्यापासून भारतात कोरोना आटोक्यात आला आहे. त्यामुळे सरकारने २०२१ या नवीन वर्षात हळू हळू सर्व सुरु करायला सुरुवात केली आहे. त्यात नाट्यगृहांचा देखील समावेश आहे. त्यामुळे अनेक नाटकांच्या प्रयोगांना सुरुवात झाली आहे. बऱ्याच दिवसांनी नाटकं सुरु झाल्यामुळे प्रेक्षकही नाटकांना जोरदार प्रतिसाद देत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून भरवलेल्या प्रिया बापटने नुकतंच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
प्रियाने ह्या व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. प्रिया बापट निर्मित ‘दादा एक गुड न्यूज आहे’ या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात नुकताच पार पडला. हा प्रयोग हाऊसफुल्ल झाला होता. बालगंधर्वमध्ये नाटकाचे प्रयोग सुरु झाल्यापासून हाऊसफुल्ल झालेले हे पहिले नाटक आहे. त्यामुळे प्रियासोबत नाटकाची सर्व टीम खूपच आनंदी असून प्रियाने ही गुड न्यूज व्हिडिओद्वारे सर्वांसोबत शेअर केली. या व्हिडिओमध्ये मास्क घालूनही प्रियाच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव प्रेक्षकांपासून लपून राहत नाहीये.
या व्हिडिओत प्रिया ‘दादा एक गुड न्यूज आहे’ चा न्यू नॉर्मलमधला पहिला प्रयोग होत आहे आणि तो हाऊसफुल्ल झालाय. हे सांगताना तिच्या आवाजात असणारा आनंद आणि उत्साह सगळ्यांनाच जाणवत आहे. सोबत व्हिडिओमध्ये तिकीट काऊंटरवर हाऊसफुल्लचा बोर्ड दिसत असून दोन व्यक्ती त्यावर फुलांचा हार चढवताना दिसत आहेत. या दोन व्यक्ती म्हणजे ‘दादा एक गुड न्यूज आहे’ नाटकाचे पुण्याचे बुकिंग सांभाळणारे प्रिया, उमेशचे सहकारी आहेत. आमच्या नाटकाला पहिला हाऊसफुल्लचा मान मिळाल्याने आम्ही तुमचेही खूप आभारी आहोत, असे प्रिया आणि उमेश आनंदाने सांगत आहे.
‘दादा एक गुड न्यूज आहे’ याद्वारे प्रिया पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. यामध्ये उमेश कामत आणि ऋता दुर्गुळे प्रमुख भूमिकेत आहेत. उमेश आणि ऋता यामध्ये बहिण-भावाची भूमिका साकारत आहेत. अद्वैत दादरकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असून कल्याणी पठारे यांनी याचे लेखन केले आहे.