आपल्याकडे बॉलिवूड कलाकारांचं खूप अनुसरण केलं जातं. पूर्वी एक काळ होता जेव्हा अमिताभ एखाद्या सिनेमामध्ये बेल बॉटम पँटमध्ये दिसले की, सगळी तरुणाई आपल्याला पुढील काही दिवस बेल बॉटम पँटमध्येच वावरताना दिसणार! त्याचप्रमाणे एखादी नायिका तिच्या नव्या सिनेमामध्ये विशिष्ट पॅटर्नच्या ड्रेस किंवा साडीमध्ये दिसली तर सर्व तरुणी त्याच ड्रेस किंवा साडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असे!
कुणी विचारलं तर या तरुणाईचं उत्तर ठरलेलं असायचं फॅशन आहे किंवा स्टाईल आहे… हे असंच अजूनही बऱ्याचदा होतं. परंतू, ही फॅशन किंवा ही स्टाईल ज्या अभिनेत्रींनी सुरू केली तिचे नाव म्हणजे अभिनेत्री साधना शिवदासानी. दिनांक २५ डिसेंबर हा साधना यांचा स्मृतीदिन होता. साठच्या आणि सत्तरचं दशक गाजवणाऱ्या साधना यांनी २०१५ मध्ये जवळपास ७५ वर्षांच्या असताना जगाचा निरोप घेतला.
अभिनेत्री साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ मध्ये कराची, पाकिस्तान येथे झाला. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची खूप आवड होती. अशातच त्यांना राजकपूर यांच्या ‘श्री ४२०’ या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून कास्ट केलं गेलं. या चित्रपटातील इचक दाना गाण्यामध्ये आपल्याला बालस्वरूपातील साधनाजी पाहायला मिळतात.
साधनाजी या सिंधी भाषिक असल्याने त्या सिद्धी भाषेमध्ये अभिनयाचे स्टेज शोज करत असत. अशातच एका सिंधी चित्रपटांच्या दिग्दर्शकाने त्यांना पाहिलं आणि फिल्म अबानामध्ये कास्ट केलं. गंमत म्हणजे या सिनेमासाठी त्यांना फक्त १ रुपये इतकीच टोकन अमाउंट दिली गेली होती. यानंतर मात्र साधना यांच्या बॉलिवूड प्रवेशाची एक वेगळीच कथा आहे.
खरं तर त्यावेळी चित्रपटनिर्माते सशाधर मुखर्जी हे त्यांचा मुलगा जॉय मुखर्जी याला बॉलिवूडमध्ये लाँच करायचा प्लॅन करत होते. परंतू, जॉयसोबत मुख्य भूमिकेसाठी त्यांचा अभिनेत्रीसाठी शोध सुरू होता. अशातच एक मॅगझीनमध्ये त्यांनी साधना यांचा अबाना चित्रपटातील एक फोटो पाहिला आणि ते स्तब्धच झाले.
त्यांना चित्रपटाची नायिका मिळाली होती. लगेचच सशाधर यांनी साधना यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना चित्रपट लव्ह इन शिमलामध्ये कास्ट केलं. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा बॉक्स ऑफिसवर इतका तुफान चालला की साधना या रातोरात स्टार झाल्या होत्या.
हा फक्त साधनाच नव्हे तर त्यांची या चित्रपटातील हेअर कट देखील तुफान प्रसिद्ध झाली होती. आजच्याच भाषेत म्हणायचं झालं तर व्हायरल झाली होती. गंमत म्हणजे अजूनही त्या तीच हेअर स्टाईल करत होत्या. परंतु आपल्याला ठाऊक आहे का की त्यांची ही हेअर स्टाईल ठरवण्यासाठी अनेक प्रयोग केले गेले होते. अनेक प्रयत्नांनंतर ही हेअर स्टाईल अंतिम ठरवण्यात आले होती.
मेरा साया, राजकुमार, मेरे मेहबूब, वो कौन थी, वक्त, असली – नकली, एक फुल दो माली, आप आये बहार आयी अशा एक ना अनेक उत्तमोत्तम सिनेमांमधून साधनाजी सतत रुपेरी पडद्यावर झळकत राहिल्या. सततच्या कामामुळे त्या आजारी पडू लागल्या. त्यांना थायरॉईडची लागण झाली. ज्याच्या उपचारासाठी त्या अमेरिकेला गेल्या आणि बऱ्या होऊन आल्या. यानंतर इंतकाम आणि एक फुल दो माली हे दोन हिट चित्रपट दिले आणि यशस्वी पुनरागमन केलं.
त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ३५ सिनेमे केले ज्यातील बहुतांश सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. सन १९६६ मध्ये साधनाजींनी त्यावेळचे प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक आर. के. नय्यर यांच्याशी विवाह केला होता. सन १९९५ मध्ये नय्यर यांच्या निधनानंतर त्या एकट्याच राहत होत्या. सन २०१५ मध्ये तोंडाच्या कॅन्सरमुळे त्या वयाच्या पंचाहत्तरीमध्ये या जगाला सोडून गेल्या. परंतु त्यांचा अभिनय आणि त्यांची आयकॉनिक हेअर कट रसिक प्रेक्षकांच्या चिरकाल स्मरणात ठेऊन गेल्या.