नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) मंगळवारी अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या मॅनेजर करिश्मा प्रकाश हिच्या वर्सोवा निवासस्थानावर छापा टाकला. तेथे १.७ ग्रॅम चरस आणि किमान दोन बाटल्या भांग (सीबीडी) सापडल्याचा दावा केला आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरच्या संदर्भात एनसीबीने यापूर्वी करिश्माची चौकशी केली होती.
“आम्ही बॉलिवूडमध्ये ड्रग्स नेटवर्क शोधत आहोत आणि या प्रकरणात आमच्याकडून अटक करण्यात आलेल्या एका पॅडलर्सच्या चौकशीदरम्यान करिश्माचे नाव उघडकीस आले, त्या माहितीच्या आधारे आम्ही आज तिच्या राहत्या घरी छापा टाकला. आम्हाला १.७ ग्रॅम चरस आणि किमान दोन बाटल्या सीबीडी तेल आढळले, असे एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
छापे टाकताना करिश्मा घरी नव्हती आणि तिच्या ओळखीच्या व्यक्तींच्या उपस्थितीत तिच्या राहत्या घरी शोध घेण्यात आला, असे अधिकाऱ्याने सांगितले, “आम्ही तिला उद्या एनसीबीकडे चौकशीसाठी बोलवले आहे, तथापि तिचा फोन बंद आहे आणि ती कोठे आहे हे आम्हाला ठाऊक नाही.” असेही एक अधिकारी पुढे म्हणाले.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणी एफआयआर केस – १५/२० ची चौकशी दिल्ली एनसीबी टीममार्फत केली जात आहे, तर दुसरी एफआयआर – १६/ २० ज्यामध्ये रिया चक्रवर्ती आणि इतर २६ जणांना अटक करण्यात आली आहे, याची एनसीबीच्या मुंबई विभागीय युनिट तर्फे चौकशी केली जात आहे. या प्रकरणातील आतापर्यंतच्या सर्व अटक मुंबई युनिट एफआयआरच्या संदर्भात करण्यात आल्या आहेत.
या अधिकाऱ्याने असे म्हटले आहे की करिश्माने एनडीपीएस कायद्याच्या कलमांचे उल्लंघन केले आहे, परंतु एफआयआरमध्ये तिचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी तिला स्वत:चा बचाव करण्याची संधी देण्यात येईल. आतापर्यंत या प्रकरणात दीपिकाला जोडण्यासारखे काही नाही. करिश्मा व्यतिरिक्त दीपिकानेही गेल्या महिन्यात एनसीबीसमोर आपले निवेदन नोंदवले होते.
आधीच्या प्रसंगी, एनसीबीने सुशांतसिंग राजपूतच्या माजी मॅनेजर जया साहा यांच्या मोबाइल फोनवरचे मेसेज सापडल्याचा आरोप केल्यामुळे करिश्मा आणि दीपिका यांचे विधान नोंदविण्यात आले ज्यामध्ये मादक पदार्थांची चर्चा सुरू होती. दीपिकाने आपल्या निवेदनात पोलिसांना सांगितले की, चर्चा नशाची नसून सिगारेटसाठी कोड शब्दांविषयी होती.