Wednesday, October 15, 2025
Home कॅलेंडर महाराष्ट्राचा सुपरस्टार ते तुझ्यात जीव रंगला, असा होता अभिनेत्री धनश्री काडगावकर हीचा प्रवास!

महाराष्ट्राचा सुपरस्टार ते तुझ्यात जीव रंगला, असा होता अभिनेत्री धनश्री काडगावकर हीचा प्रवास!

तुझ्यात जीव रंगला ही मालिका गेली चार वर्षे सतत झी मराठीवर सुरू आहे. १२०० हून अधिक भागांचा इतका लांब पल्ला गाठल्यानंतर आता कुठे या मालिकेचा शेवट होणार आहे.

या मालिकेतील काही पात्र आपल्याला कायम लक्षात राहतील. उदा. राणा दादा, अंजली वहिनी, गोदाक्का, सनी दा, बरकत, खलनायिका आणि सर्वांच्या लाडक्या असलेल्या वहिनीसाहेब! या सर्व कलाकारांमध्ये सर्वात जास्त जर कुणी भाव खाऊन गेलं असेल तर ती आहे वहिनीसाहेब हे पात्र साकारणारी आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री धनश्री काडगावकर! मालिकेच्या चार वर्षांच्या प्रवासात ३ वर्षे तर नंदिता गायकवाड ही भूमिका धनश्रीनेच साकारली आणि खूप नाव कमावलं. धनश्रीला प्रसिद्धी जरी या मालिकेतून मिळाली असली तरी ही काही तिची पहिली मालिका नव्हती. या आधीही तिने विविध मालिकांमधून काम केलं होतं. चला आज आपण धनश्रीच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा घेऊयात.

धनश्रीचा जन्म ६ एप्रिल १९८८ ला पुण्यात झाला. तिने गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स मधून तिचं शिक्षण पूर्ण केलं. मग ती कलक्षेत्राकडे वळाली. धनश्रीने मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रात स्वतःचं नाव कमावलं आहे. धनश्रीने महाराष्ट्राचा सुपरस्टार या अभिनयाच्या रिऍलिटी शो मध्ये सहभाग घेतला. या शोचं परीक्षण हे सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर यांनी केलं होतं. या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली शिकता शिकता ती या शोच्या अंतिम फेरीत पोहोचली. ती या शोची विजेती तर बनू शकली नाही परंतु तिच्या साठी मराठी कलाजगताची दारं खुली झाली होती.

धनश्रीला यानंतर झी मराठी वरीलच ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. यानंतर तेव्हाचं ई टीव्ही आता कलर्स मराठी असलेल्या वाहिनीवर धनश्रीला ‘गंध फुलांचा गेला सांगून’ ही नवी मालिका मिळाली. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. यानंतर २०१६ मध्ये जेव्हा तुझ्यात जीव रंगला ही मालिका आली तेव्हा या मालिकेतील नंदिता वहिनी या मालिकेने धनश्रीला खरी ओळख मिळवून दिली. यानंतर धनश्रीने दोन सिनेमेही केले. २०१७ साली आलेला ब्रेव्ह हार्ट आणि २०१८ मध्ये आलेला चिट्ठी या दोन्ही सिनेमांमध्ये धनश्रीने मुख्य भूमिका साकारल्या. सध्या गरोदरपणामुळे धनश्रीने सर्व कामातून काही काळ विश्रांती घेतली आहे.

लॉककडाऊनमध्येच धनश्रीने तिचा पती दुर्वेश देशमुखच्या वाढदिवसाच्या दिवशी एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून पोस्ट केला आणि गर्भवती असल्याचं जाहीर केलं. यानंतर संपूर्ण मालिकाक्षेत्रातून धनश्रीवर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. आता धनश्री गोड बातमी देऊन केव्हा मालिकांमध्ये पुनरागमन करेल याची तिचे चाहते प्रतीक्षा करत आहेत.

हे देखील वाचा