कंगना सोबत ट्विटवर वादावादी झाल्यानंतर पंजाबी अभिनेता दिलजीत दोसंज हा शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी गेला. त्याच्या या कृतीचं चहुबाजूंनी कौतुक केलं जातंय. सिंघू बॉर्डरवर सुरू असलेल्या आंदोलनात स्टेजवर जाऊन दिलजीतने सरकारला खडे बोल सुनावलेत. त्याने म्हटलं की शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर मान्य कराव्या.
दिलजीत म्हणाला की,”ट्विटरवर गोष्टींना बदलून सांगितलं जातं, जेव्हा की या मुद्द्यांना भटकवलं नाही गेलं पाहिजे. मी हात जोडून सरकारला विनंती करतो की आपल्या शेतकरी भावांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य कराव्यात. हे सर्व शेतकरी शांतीपूर्ण पद्धतीने, कोणतीही हिंसा न करता आंदोलनाला बसले आहेत. आपल्या सर्व शेतकऱ्यांना सलाम! आपण जे करत आहात ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे. या आंदोलनाची इतिहास साक्ष ठेवेल.”
इतकंच नाही तर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना थंडीपासून वाचवण्याकरिता दिलजीतने १ कोटी रुपये दान केले. पंजाबी गायक सिंघा याने एका व्हिडियोच्या माध्यमातून याबद्दल खुलासा केला. त्याने सांगितलं की या पैशातून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना उबदार कपडे पुरवले जातील.
गेल्या शुक्रवारीच कंगना आणि दिलजीत हे ट्विटरवर भिडले होते. याची सुरुवात कंगनाकडूनच झाली होती हे विशेष! कंगनाने ट्विटरवर एक वयोवृद्ध आंदोलनकर्त्या आजींचा फोटो पोस्ट करून त्यांची तुलना शाहीनबाग येथील आंदोलनकर्त्या बिलकीस बानो यांच्या सोबत केली होती. शिवाय अशा महिला या १०० रुपयांमध्ये उपलब्ध होतात असं देखील ट्विटमध्ये म्हटलं होतं.
यावर साऱ्या नेटकर्यांनी तिला धारेवर धरले. काही वेळाने कंगणाने ते ट्विट डिलीट केलं परंतु याच ट्विटवरून दिलजीतने कंगनाला चांगलंच सुनावलं होतं. हे प्रकरण इतकं ताणलं गेलं होतं की दोघेही एकमेकांसोबत अर्वाच्य शब्दात बोलत होते. नेटकाऱ्यांमध्येही सध्या दोन गट पडलेले दिसून येत आहेत जे सरकार आणि शेतकरी असे विभागले गेले आहेत. यापूर्वी देखील कपिल शर्मा, भोजपुरी कलाकार खेसारी लाल, विशाल दादलानी तसेच इतर पंजाबी कलाकारांनी देखील शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी-
–दुःखद ! ज्येष्ठ मराठी अभिनेते रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळाने निधन, 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास










