Saturday, December 7, 2024
Home कॅलेंडर परवीन बाबी ते जिया खान…कुणी फाशी घेतली तर कुणाचा मृतदेह कुजला! चंदेरी दुनियेतील ‘या’ अभिनेत्रींच्या मृत्यूचं कोडं अद्याप कायम

परवीन बाबी ते जिया खान…कुणी फाशी घेतली तर कुणाचा मृतदेह कुजला! चंदेरी दुनियेतील ‘या’ अभिनेत्रींच्या मृत्यूचं कोडं अद्याप कायम

बॉलीवूडचे जग हे ग्लॅमर आणि झगमगाटाने इतके भरलेले आहे की, बॉलीवूडमध्ये असणारा अंधार यामुळे कदाचित सर्वसामान्यांना कधी दिसतच नाही. सर्व जण या झगमगाटीला भुलतात. मात्र या जगात वावरणाऱ्या सर्वांना या चंदेरी दुनियेचा मागचा अंधार माहित असतो. या सिनेसृष्टीतील असे अनेक कलाकार आहेत जे या अंधाराला दूर सारू शकले नाही आणि या अंधारातच एक रहस्यमयी मृत्यूचे कोडे सर्वांसाठी सोडून गेले.

परवीन बाबी:
परवीन बाबी म्हणजे निखळ सौंदर्य. ७० च्या दशकात परवीन ह्या अतिशय यशस्वी अभिनेत्री होत्या. त्यांच्याकडे यश, स्टारडम, पैसा या सर्व गोष्टी होत्या. एवढे असूनही त्या एकट्या होत्या. त्यांचे नाव अनेक लोकांसोबत जोडले गेले मात्र त्यांना खरे प्रेम कधी लाभले नाही. अशातच त्यांना पॅरानायड स्कित्जोफ्रेनिया हा मानसिक आजार झाला. २० जानेवारी २००५ मध्ये घरातच त्यांचा मृत्यू झाला. तीन दिवस त्यांचा मृतदेह घरात पडून होता. शेजारच्यांना तीन दिवस घरातून कोणतेच आवाज न आल्याने पोलिसांना बोलावून दरवाजा तोडल्यावर परवीन यांचा मृत्य झाल्याचे समजले.

दिव्या भारती:
केवळ १९ वर्षाच्या छोट्या आयुष्यात दिव्या एक स्वप्नवत जीवन जगली. या कमी वयात तिने आपल्या सुपरहिट चित्रपटांमुळे खूप लोकप्रियता मिळवली होती. ५ एप्रिल १९९३ रोजी ती राहत असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून पडून दिव्याचा मृत्यू झाला. त्यावेळी ती फक्त १९ वर्षाची होत्या. दिव्याच्या अशा जाण्यामागे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. काहींना हा घातपात तर काहींना आत्महत्या वाटत होती. पोलिसांना देखील शेवटपर्यंत दिव्याच्या मृत्यूचे रहस्य सोडवता आले नाही.

नफिसा जोसेफ:
मिस इंडिया यूनिवर्स हा ‘किताब पटकावणारी नफिसा जोसेफ ९०च्या दशकात एक मोठी, यशस्वी आणि आघाडीची मॉडेल होती. इतके असूनही वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी नफिसा तिच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. काही दिवसातच तिचे उद्योगपती गौतम खंडूजा सोबत लग्न होणार होते. मात्र आधीच तिने हे मोठे पाऊल उचलले. नफिसाच्या मृत्यू बदल गौतमला तिच्या आई वडिलांनी जबाबदार ठरवले होते, पण काही सिद्ध झाले नाही. नफीसाचा मृत्यू देखील एक रहस्य बनून राहिला आहे.

प्रत्यूषा बैनर्जी:
‘बालिका वधू’ या लोकप्रिय अशा धारावाहिक मध्ये मोठ्या आनंदीची भूमिका प्रत्यूषाने साकारली होती. या भूमिकेमुळे प्रत्युषा घराघरात पोहचली आणि तिला तुफान लोकप्रियता मिळाली. यशाच्या शिखरावर असताना १ एप्रिल २०१६ ला प्रत्युषा तिच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडली. तिला रुग्णालयात दाखल केल्यावर तिचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. इतके यश मिळत असताना अचानक वयाच्या २४ व्या वर्षी इतके कठोर पाऊल उचलण्यामागे नक्की कोणते कारण होते हे अद्यापही समजले नाही.

जिया खान:
अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘नि:शब्द’ ह्या चित्रपटातून जिया खानने सिनेसृष्टीत प्रवेश केला. शिवाय जियाने ‘गजनी’, हाऊसफुल’ या चित्रपटात देखील काम केले. ३ जून २०१३ रोजी जियाने वयाच्या २५ व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली. जियाने आत्महत्या का केली हे आद्यपही समजू शकले नाही. मात्र जिया च्या आत्महत्येला सुरज पांचोलीला जबाबदार ठरवण्यात आले होते. तरीही अजूनपर्यंत जियाच्या आत्महत्येचे खरे कारण समोर आले नाहीये.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा