दिग्दर्शक प्रीतम एसके पाटील यांच्या ‘ढिशक्याव’च्या पाठमोऱ्या पोस्टरचे गुपित लवकरच उलगडणार

Director Pritam S K Patil's New Movie


लॉक डाऊन नंतर रुळावर येणाऱ्या चित्रपटसृष्टीने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरला आहे. एका मागोमाग एक प्रदर्शनाच्या वाटेवर असणाऱ्या चित्रपटांची रांगच लागली आहे. यातच भर म्हणजे दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांचा नवाकोरा ‘ढिशक्याव’ चित्रपट. विनोदी आणि विसंगत प्रकारची कथा घेऊन हा चित्रपट सिनेसृष्टीत रुजू होण्यास सज्ज झाला आहे. विनोदासह या चित्रपटाच्या कथेला जोड मिळाली आहे ती रोमँटिक कथेची. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधणारा आणि नाद या शब्दाला धरून कथानक रंगवणाऱ्या या चित्रपटाचा पोस्टर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. चित्रपटाचे पोस्टर पाहता पोस्टर मध्ये उभी असलेली सुंदर, अदाकारी अभिनेत्री आणि बंदूकीसह पोस्टरमध्ये दाखवण्यात आलेला हात नक्की कोणत्या कलाकारांचा आहे हे गुपित भंडावून सोडणारे आहे.

दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील दिग्दर्शित ‘ढिशक्याव’ हा चित्रपट मूळचे लातूरला राहणारे निर्माते मोहम्मद देशमुख, उमेश विठ्ठल मोहळकर यांनी निर्मित केला असून त्यांचे निर्मिती क्षेत्रातील पदार्पण नक्कीच वाखाणण्याजोगे आहे. याशिवाय दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांची ही निर्मिती असून राजीव पाटील, सुनील सूर्यवंशी आणि उमाकांत बरदापुरे यांची सह निर्मिती असलेला हा विषयघन चित्रपट आहे. प्रीतम एस के पाटील यांनी दिग्दर्शक आणि निर्मिता अशी दुहेरी कामगिरी या चित्रपटासाठी बजावली आहे. दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील यांच्या खिचीक, डॉक्टर डॉक्टर आणि जिऊ या तीन महत्वपूर्ण चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर त्यांचा हा चौथा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाची कथा लेखक संजय नवगिरे लिखित आहे.

‘ढिशक्याव’ चित्रपटाच्या पोस्टर लाँच नंतर उत्सुकता लागून राहिली आहे ती कलाकारांची. नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार, ते कोणती भूमिका साकारणार याकडे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा वळल्या आहेत. चित्रपटाचे पोस्टर पाहता लागलेली उत्कंठा नक्कीच खुर्चीत खिळवून ठेवणारी आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.