Friday, July 5, 2024

बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यामुळे झाली होती साजिद नाडियाडवाला आणि दिव्या भारतीची भेट; वाचा रहस्यमयी मृत्यू झालेल्या अभिनेत्रीची कहाणी

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारतीने, 90 च्या दशकात इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले होते. यावेळी अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीत प्रवेश घेताच आश्चर्यकारक कामगिरी करायला सुरुवात केली. त्याकाळी सर्वत्र फक्त तिचीच चर्चा होती. अगदी कमी कालावधीत तिला बरीच प्रसिद्धी मिळाली.

दिव्याने तिच्या 4 वर्षांच्या लहान कारकीर्दीत विविध भाषांमध्ये, जवळपास 20 चित्रपटांमध्ये काम केले, सुपरहिट चित्रपट दिले आणि लग्नही केले. पण कदाचित तिच्या नशिबात वेगळेच काहीतरी लिहले होते. अचानक अभिनेत्रीचे निधन झाले. दिव्याच्या निधनाच्या बातमीने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला.  दिव्या भारतीची ५ एप्रिल रोजी २९ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त जाणून घेऊया दिव्या भारतीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया.

‘विश्वात्मा’द्वारे केले बॉलिवूडमध्ये पदार्पण
दिव्या भारतीचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी मुंबई येथे झाला होता. तिने फक्त 9 वी पर्यंतचे शिक्षण घेतले होते. त्यानंतर तिने अभिनयात कारकीर्द करण्याचे ठरवले. काही दाक्षिणात्य चित्रपट केल्यानंतर, 1992 साली दिव्याला सनी देओल आणि नसीरुद्दीन शाह यांच्या ‘विश्वात्मा’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

 

एकाच वर्षात दिले अनेक हिट चित्रपट
तिचे 1992 या वर्षी तिचे ‘दिल का क्या कसूर’, ‘शोला और शबनम’, ‘दीवाना’, ‘जान से प्यारा’, ‘बलवान’, ‘दुश्मन जमाना’, ‘गीत’ आणि ‘दिल ही तो है’ हे चित्रपट आले. एकाच वर्षात तिने इतके बॉलिवूड चित्रपट दिले आणि ते सर्व यशस्वी ठरले. चित्रपटाच्या इतिहासात क्वचितच एखाद्या कलाकाराने, एका वर्षाच्या आत आपल्या अभिनयाची इतकी खोल छाप सोडली असेल. दिव्या भारतीने अल्पावधीतच प्रत्येकाच्या मनात आपले स्थान निर्माण केले.

मृत्यूनंतर रिलीझ झाले दोन चित्रपट
सन 1992 मध्ये बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणाऱ्या दिव्याच्या आयुष्यातील, 1993 हे शेवटचे वर्ष ठरले. जणू ती जोरदार वादळासारखी इंडस्ट्रीमध्ये आली आणि लगेच निघून गेली. तिने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी अभिनयाची सुरुवात केली आणि वयाच्या 19 व्या वर्षी तिचे निधनही झाले. दिव्याचे निधन अद्याप रहस्यच आहे. तिच्या मृत्यूची गाठ अजूनही कोणी सोडवू शकले नाही. विशेष म्हणजे, निधनानंतर तिचे दोन चित्रपट रिलीझ झाले. हे चित्रपट होते, ‘रंग’ आणि ‘शतरंज’. तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

गोविंदाने करून दिली दिव्या आणि साजिद नाडियाडवालाची भेट
वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले, तर दिव्याची गोविंदाशी चांगली मैत्री होती. दोघांनी ‘शोला और शबनम’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. चित्रपटाला खूप पसंतीही मिळाली होती. गोविंदानेच साजिद नाडियाडवालासोबत दिव्याची भेट करून दिली होती. 10 मे, 1992 रोजी या दोघांचे लग्न झाले. या दोघांचे लग्न अगदी खासगी पद्धतीने झाले होते. हे लग्न मुंबईतील वर्सोवा येथील साजिद नाडियाडवालाच्या घरी झाले होते. साजिदशी लग्नानंतर दिव्याने तिचे नाव बदलून सना नाडियाडवाला ठेवले. लग्नाच्या काही महिन्यांनंतर, तिच्या घराच्या बाल्कनीमधून पडल्याने, दिव्याचा मृत्यू झाला. आजही दिव्या भारतीचे निधन एक रहस्य बनून राहिले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘तारक मेहता…’च्या दयाबेन यांचा नवीन व्हिडिओ व्हायरल, कुटुंबासोबत दिसल्या अभिनेत्री दिशा वाकाणी

‘रामायण’मध्ये ‘मंथरा’ बनण्यापूर्वी ‘या’ सर्वोत्तम भूमिका साकारत ललिता पवार यांनी गाजवले प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य, टाका एक नजर

हे देखील वाचा