दमदार आवाज, जबरदस्त अभिनय आणि असंख्य वाद! वयाच्या अठराव्या वर्षापासूनच जोरदार चर्चेत राहिलेली डॉली बिंद्रा


हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आणि टेलिव्हिजन सृष्टींमध्ये कलाकारांनी निभावलेल्या भूमिका त्यांची ओळख बनत जातात. हा नियम जसा अभिनेत्यांना लागू आहे तशाच अभिनेत्रींनादेखील लागू पडतो. अशीच एक अभिनेत्री जी तिच्या नकारात्मक भूमिकांसोबतच, तिच्या दमदार आणि मोठ्या आवाजामुळे सुद्धा ओळखली जाते ती आहे डॉली बिंद्रा. डॉली बिंद्रा हे नाव ऐकताच डोळ्यासमोर येतात ते अनेक विवाद.  डॉली तिच्या कामापेक्षा जास्त विवादांमुळेच चर्चेत राहिली आहे. डॉली आणि भांडण हे मागील अनेक काळापासून चालत आलेले समीकरण आहे.

आज डॉली तिचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच निमित्ताने आपण जाणून घेऊया तिच्या आयुष्यातील काही गाजलेले वाद.

डॉलीचा जन्म २० जानेवारी १९७० रोजी पंजाबमध्ये झाला. डॉली बिंद्राने वयाच्या १८ व्या वर्षी खिलाडियों का खिलाडी चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. गदर: एक प्रेम कथा, यादें, जो बोले सो निहाल, ता रा रम पम, डॉली की डोली आदी सिनेमांमध्ये काम केले आहे. शिवाय तिने छोट्या पडद्यावरही काम केले. डॉलीला नेहमीच सहाय्यक भूमिका मिळत गेल्या, तरी देखील तिने या क्षेत्रात स्वतःची ओळख तयार केली.

बिग बॉसच्या घरात होता डॉलीचा दबदबा
डॉली बिग बॉसच्या चौथ्या पर्वात सहभागी झाली होती. भांडणं, वादविवाद करण्यात माहीर असलेली डॉली बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांसाठी डोक्याला ताप ठरली होती. बाप पर मत जाना हे तिचे पालुपद होते. नेमक्या कुठल्या गोष्टीवरुन तिचा पारा चढेल, ही गोष्ट घरातील सदस्यांच्या समजण्यापलीकडे होती. श्वेता तिवारीसोबतचे आणि मनोज तिवारीसोबतचे तिचे भांडण चांगलेच गाजले होते.

डॉलीला त्रासले होते शेजारी
२०१४ साली मालाड मधल्या भूमी हाउसिंग सोसायटीने डॉली बिंद्राविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. तिच्यावर शेजा-यांना शिवीगाळ करण्याचा आरोप होता. प्राप्त माहितीनुसार, डॉलीच्या गैरवर्तणुकीमुळे सोसायटीतील लोक त्यांच्या मुलांना गार्डनमध्ये खेळायला सुद्धा पाठवत नव्हते. शिवाय जिमच्या एका कर्मचाऱ्याला देखील दमदाटी केल्याचा आरोप तिच्यावर होता.

राधे माँवर लावलेल्या आरोपांमुळे खळबळ
डॉली बिंद्रा एकेकाळी राधे माँची परम भक्त होती. जागरण आणि धार्मिक कार्यक्रमात ती राधे माँच्या शेजारी दिसत होती. मात्र अचानक राधे माँने आपल्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप डॉली बिंद्राने करत एकच खळबळ माजवली होती. डॉली बिंद्रा हिने राधे माँ विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती.


Leave A Reply

Your email address will not be published.