ढोल-ताशांचा निनाद, झांजेचा लयबद्ध ताल, ढोल-ताशाच्या तालावर थिरकणारी पताका अन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष अशा भक्तिमय वातावरणात पुणे अंध मुलींच्या शाळेतील ढोलपथकाने केलेल्या वादनाने ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान भारावून गेल्या. ३० ते ४० दृष्टीहीन मुलींनी ढोल-ताशा व झांज वादन करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
ग्रॅव्हिट्स फाउंडेशनच्या संस्थापिका उषा काकडे यांच्या घरी बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हस्ते गौरी-गणपतीची महाआरती करण्यात आली. झीनत अमान यांच्यासह अभिनेत्री तनिषा मुखर्जी, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या व कोरियोग्राफर लक्ष्मी नारायण त्रिपाठी, बिगबॉस फेम शिव ठाकरे, सिम्बायोसिसच्या कार्यकारी संचालक डॉ. विद्या येरवडेकर यांच्यासह उद्योग व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर महिलांनी आरती व महाप्रसादाचा लाभ घेतला. मनोहारी ढोलवादन करणाऱ्या या दृष्टीहीन मुलींच्या पथकाला उषा काकडे यांनी ५१ हजार रुपयांचे बक्षीस दिले.
झीनत अमान म्हणाल्या, “या सर्व अंध भगिनींनी अतिशय सुंदर ढोलवादन करून स्वागत केल्याने भारावून गेले आहे. मनापासून जोशपूर्ण वातावरणात ढोल, ताशा, झांज वादन करत माझा दिवस विशेष बनवला आहे. उषा काकडे यांनी खूप सुंदर पद्धतीने गौरी व बाप्पांची आरास केली आहे. भक्तिमय वातावरणात रंगलेल्या या सोहळ्यात मला आज समाधान मिळाले आहे.”
उषा काकडे म्हणाल्या, “गेल्या तीस वर्षांपासून माझ्याकडे गौरी-गणपती असतात. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी याची शोभा वाढवतात. पण आज या डोळस व सुंदर भगिनींनी आपल्या कलाकारीने सर्वांचीच मने जिंकली आहेत. या मुलींना दृष्टी नसली, तर त्यांच्यात अंगभूत कला व गुण काठोकाठ भरले आहेत. त्याचे मनोहारी दर्शन त्यांनी घडवले आहे. त्यांच्या रूपाने साक्षात माझ्या घरी खरोखर गौरींचा सहवास लाभल्याची भावना माझ्या मनात आहे.”
अधिक वाचा –
– स्टंट पडला महागात, ‘या’ अभिनेत्याने ३० वर्ष घालवले अंथरुणात, वाचा तो किस्सा
– रॉकी आणि राणीच्या लव्हस्टोरीचा आनंद मिळणार आता ओटीटीवर, ‘या’ ठिकाणी बघू शकता चित्रपट
– ‘हा’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी विकी कौशल का घाबरला होता? खुद्द अभिनेत्यानेच सांगितले कारण म्हणाला , ‘प्रत्येकजण म्हणत होता…’