मंडळी, आपल्या भारतात कधी काय होईल हे सांगता येत नाही. काही वर्षांपूर्वी उत्तरेतल्या एक महाभागाने ऐश्वर्या रॉय बच्चन ही त्याची आई असल्याचं उघडपणे सांगितलं होतं. यावर सर्व क्षेत्रातून काय प्रतिक्रिया आल्या होत्या, याची आता उजळणीची गरज नाही. माध्यमांनुसार पुढे जाऊन प्रसिद्धीसाठी हे सगळं खोटं नाटक केलं गेलं होतं, हे सिद्ध देखील झालं. असाच काहीसा प्रकार आता पुन्हा बिहारमध्ये घडला आहे.
एका महाभागाने सनी लिओनी ही त्याची आई तर इम्रान हाश्मी हा त्याचा पिता असल्याचं सांगत खळबळ उडवून दिली आहे. चला तर मग पाहुयात हे प्रकरण नेमकं काय आहे ते !
बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एका विद्यार्थ्याच्या महाविद्यालयाच्या फॉर्मचा फोटो व्हायरल झाला आहे. या फॉर्ममध्ये, विद्यार्थ्याने त्याच्या आईचं नाव सनी लिओनी लिहिलं आहे. तर, वडिलांचं नाव इमरान हाश्मी नमूद केलं आहे.
हा विद्यार्थी बीआरए बिहार विद्यापीठाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे. फॉर्ममध्ये सनी लिओनी आणि इमरान हाश्मीची यांची नावं जेव्हा कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी पाहिली तेव्हा तेदेखील बुचकळ्यात पडले.
कोण आहे हा मुलगा…
या महाभागाचं नाव आहे कुंदन कुमार! आणि हा धनराज मोहतो महाविद्यालयात पदवीच्या द्वितीय वर्षांचं शिक्षण घेत आहे. माध्यमांनुसार बिहारमध्ये यावर्षी द्वितीय वर्षाच्या परीक्षांचे फॉर्म ऑनलाइन भरले जात आहेत. या विद्यार्थ्याच्या फॉर्म वरील पत्त्यावर चतुर्भुज असं लिहिलेलं आहे. जो बिहारमधील रेड लाईट एरिया आहे.
जेव्हा ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली तेव्हा साहजिकच इम्रान हाश्मी आणि सनी लिओनी यांनी आपापल्या प्रतिक्रिया ट्विटर वर दिल्या आहेत.
याबद्दल सनीने एक ट्विट केले आहे. ज्यात ती म्हणते की, ‘हा मुलगा विलक्षण आहे. मोठी स्वप्नं पाहण्याची त्याची ही पद्धत आहे. हाहाहा…’
तर इम्रान हाश्मीनेही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना इम्रान म्हणतो की ‘मी शपथ घेऊन सांगतो की हा माझा मुलगा नाहीये’ असं ट्विट केलं आहे.
महाविद्यालयाचं या संपूर्ण प्रकरणावर मात्र वेगळंच मत आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा फॉर्मचा फोटो खोटा असू शकतो. कुणीतरी फोटोशॉप च्या मदतीने एडिट करण्याचं कारस्थान रचलं आणि हा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे.
हे असं घडणारी भारतातील ही काही पहिली घटना नव्हे याअगोदर ऐश्वर्या रॉय सोबत देखील हा प्रकार घडला होता. उगाच म्हणत नाहीत मंडळी, ‘ऐकावं ते नवलंच!’