Thursday, December 26, 2024
[aioseo_breadcrumbs]

सलग तीन सुपरहिट सिनेमा देणारे प्रविण तरडे मराठी सिनेमाचे राजामौली होऊ शकतात का? टाका एक नजर

‘बाहुबली’,’ बाहुबली २’ आणि नुकताच रिलीझ झालेला ‘आरआरआर’ हे दक्षिणेतील सुपरहिट सिनेमे. या तीनही सिनेमांचं दिग्दर्शन केलंय ते एसएस राजामौली यांनी. ते दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय चेहरा. त्यांना भव्यदिव्य सिनेमांच्या निर्मितीसाठी जगभर ओळखलं जातं. मित्रांनो, त्यांच्या सिनेमांनी बॉलीवूडकरांना अक्षरश: नको नको केलंय. काहींची तर झोपच उडवलीय. मी जे काही करेल ते हिटच करेल असंच काहीसं राजामौलींचं झालंय. असंच काहीसं एका मराठी दिग्दर्शकाच्या बाबतीतही सध्या होताना दिसतंय.

अगदी राजामौलींइतकं नसलं तरीही आपल्या मराठी सिनेमाच्या मानाने नक्कीच मोठं. त्या दिग्दर्शकाचा सिनेमा येतो, सगळीकडं वातावरण निर्मिती होते, लोकं चर्चा करतात, सिनेमा तुफान हिट होतं असंच समीकरण झालंय. त्याच्या खतरनाक स्टाईलने, जबरदस्त अभिनयाने व दिग्दर्शनातील भवदिव्यतेने सगळेच अचंबित होत आहेत. मंडळी तो दिग्दर्शक दुसरा तिसरा कुणी नसून मुळशी पॅटर्न फेम प्रविण तरडे आहेत. त्यांना मुळशी पॅटर्न फेम म्हणणं तसं योग्य होणार नाही. कारण त्यांचे जवळपास सगळेच सिनेमे तेवढेच हिट झाले आहेत. अगदी मराठी सिनेमातील एसएस राजामौली म्हणावे की काय असं काम सध्या प्रविण तरडे करताय. हेच प्रविण तरडे भविष्यातील मराठीतील एसएस राजामौली होऊ शकतात का? याचा उहापोह आपण या लेखामध्ये करणार आहोत.

नुकताच रिलीझ झालेला धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे चित्रपट चांगलाच गाजतोय. याच दिग्दर्शन केलंय ते प्रविण तरडे यांनी. अगदी रिलीझ झाल्यावर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जवळपास २ कोटी रुपये कमावले. चित्रपट समीक्षकांनाही हा सिनेमा तुफान भावला. हा सिनेमा सहज १० कोटींची कमाई करू शकतो, असा अंदाज अनेकांनी वर्तवलाय. सध्याची परिस्थिती पाहाता हा तरडेंचा सलग तिसरा हिट सिनेमा ठरणार आहे. यापुर्वी देऊळ बंद व मुळशी पॅटर्न या त्यांच्या सिनेमांनी तुफान कमाई केलीय. तर सरसेनापती हंबीरराव मोहिते प्रदर्शानाच्या वाटेवर आहे. तरडेंचे व्यक्तिमत्व जितके रांगडे आणि भारदस्त, तितक्याच ताकदीच्या त्यांच्या कथा आणि चित्रपटांचे दिग्दर्शन. आपल्या बिनधास्त आणि डॅशिंग व्यक्तिमत्वामुळे ते नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू असतात.

तरडेंच्या सिनेमाची एक मोठी खासीयत आहे. त्यांना सिनेमे भव्यदिव्य करायला आवडतात. ते सिनेमात कोणतीही चुक खपवून घेत नाही. एखादा शॉट अनेक वेळा शुट करण्याची त्यांची तयारी असते. मराठीत अनेक ऐतिहासीक सिनेमे येतात परंतू तरडेंच्या सिनेमाची गोष्टच वेगळी असते. ते सिनेमासाठी पुर्णपणे झोकून देतात. याचा प्रत्यय धर्मवीर पाहून तर येतोच पण सरसेनापती हंबीरराव मोहिते सिनेमाच्या टिझरमध्येही हे दिसते. तरडेंचे लोकेशनही हटके असतात. ते किचकट विषय सोप्पा करुन सांगतात. जे करायचं ते चांगलं आणि भवदिव्य असा तरडेंचा सिंपल फंडा. सध्याच्या मराठी सिनेमांची अवस्था पाहात तरडे इथेच अनेकांना उजवे ठरतात. काहीसं या गोष्टींत त्यांच्यात व राजामौलींमध्ये नक्कीच साम्य आहे.

दुसरी गोष्ट सिनेमाच्या मार्केटिंगची. तरडे जेवढा सिनेमा जिवतोडून बनवतात, तेवढंच त्याचं मार्केटिंग जोरात करतात. अगदी नुकत्याच रिलीझ झालेल्या धर्मवीरचंच पाहा ना. या सिनेमाच्या ट्रेलर लॉंचसाठी चक्क महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आले होते. सोबतीला दबंग खान सलमानही होता. शिवसेना नेते किती होते विचारु नका. त्यापुर्वी काही दिवस आधी अगदी राजामौलींच्याच हातात सिनेमाचं पोस्टर दिलं. तसेच मुंबईत धर्मवीरचं सर्वात मोठं पोस्टर लावलं होतं. कोणतीही शहर फिरा तुम्हाला तरडेंच्या सिनेमाचे पोस्टर दिसतेच. याच काळात ते सिनेमाची चर्चा सोशल मीडियावरही घडवून आणतात. त्यासाठी ते अनेक प्रकारच्या आयडिया वापरतात. अनेक रियॅलिटी शोमध्ये ते हजेरी लावतात. मराठी सिनेनिर्मात्यांकडे कमी दिसणारी गोष्ट म्हणजे प्रोमोशन, मार्केटिंगसाठी दिलेला वेळ. तरडे सिनेमा निर्मितीसाठी जेवढा वेळ देतात, त्याहून जास्त वेळ प्रोमोशनसाठी देताना दिसतात.सिनेमा सिनेमागृहात येण्यापुर्वी सगळीकडेच जोरदार वातावरण निर्मिती करण्यात त्यांचा हातखंडा आहे. फोमो नावाचा फॅक्टर ते लोकांचा ट्रिगर करतात. त्यामुळे आपण हा सिनेमा नाही पाहिला तर काहीतरी मोठं मिस करु असं लोकांना वाटतं.

प्रविण तरडे हे गावाशी नाळ जोडलेला व्यक्ती आहे, असे अनेकांना वाटते. शेतात काम करतानाचे त्यांचे अनेक व्हिडीओ आहेत. तसेच व्हिडीओच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्याही मांडत असतात. सडेतोड बोलणं त्यांना पसंत आहे. भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. या गोष्टी चाहत्यांना नक्कीच भावणाऱ्या आहेत. मुळशी पॅटर्नमध्ये त्यांनी एका प्रदेशाला नजरेसमोर ठेवून आख्ख्या देशाची व्यथा मांडली. धर्मवीरमध्ये एका लोकप्रिय व्यक्तीमत्त्वाला समोर ठेवून त्यांचे ज्ञात-अज्ञात पैलू लोकांसमोर आणले. तर हंबीरराव मोहितमध्ये त्यांनी एका योद्धाच्या गोष्ट सांगून इतिहासाची उजळणी केलीय. म्हणजे विषय हटके, त्याची मांडणी हटके, त्याचं मार्केटिंग हटके आणि त्यामुळे होणार बॉक्स ऑफिस गल्लाही हटके. हंबीरराव रिलीझ झाल्यावर तुमचा पुढचा प्रोजेक्ट कोणता? असा प्रश्न विचारल्यावर ते चटकन म्हणतात. मी आता पुढे सहा महिने खूप झोपणार आहे. यावरुन कळतं की त्यांनी या सिनेमासाठी रात्रंदिवस खर्च केलेला आहे.

मराठी सिनेमांची सध्याची अवस्था वाईट दिसत असताना एक माणूस मात्र जबरदस्त काम करताना दिसतोय. त्याकडे पाहिल्यावर या इंडस्ट्रीतही ती क्षमता असल्याचे दिसते. ही इंडस्ट्री जी दिवसेंदिवस मागे जात आहे, ती अशा लोकांमुळे नक्कीच पुन्हा उभारी घेईल असे वाटते. मराठी सिनेमाला अशा अनेक तरडेंची गरज आहे. तसेच प्रविण तरडेंकडूनही राजामौलींसारख्या भवदिव्य सिनेमांची अपेक्षा आहे. त्यांच्यात ती क्षमता आहे आणि ती भव्यदिव्य सिनेमांची, हटके विषय घेऊन केलेल्या चित्रपटांची अपेक्षाही ते पुढे पुर्ण करतील हा सर्वांनाच विश्वास आहे.

हेही वाचा-
एकट्या सिद्धांत सुर्यवंशीने नाही, तर ‘या’ कलाकारांनीही वर्कआउट करताना गमावले प्राण
24 तास सोबत राहूनही श्रीदेवी यांनी बोनी कपूर यांच्याशी ‘या’ कारणासाठी तब्बल 3 महिने धरला होता अबोला

हे देखील वाचा