Saturday, June 29, 2024

देसी गाण्यांवर व्हिडिओ बनवून भारतीयांचं लक्ष वेधून घेणारे ‘हे’ फॉरेनर्स आहेत तरी कोण? जाणून घ्याच

सोशल मीडिया हे किती प्रभावी माध्यम आहे, याची आपल्याला चांगलीच माहिती आहे. त्यातल्या त्यात सर्वाधिक वापरलं जाणारं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणतं असेल, तर ते म्हणजे इंस्टाग्रामच म्हणावं लागेल. भारतातील शेंबड्या पोरापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत आज सर्वजण रीलस्टार होऊ पाहतंय. त्यापैकी काहींचा कंटेंट हा खूपच प्रेरणादायी आणि आयुष्यात चांगलं काय करता येईल हे सांगणारा असतो, तर काहींचा खूपच घाणेरडा किंवा अपशब्द वापरून तयार केला जाणारा असतो. असे अपशब्द वापरून रील्स बनवलं की, काय होतं हे पुण्यात घडलेल्या एका घटनेवरून तुमच्याही लक्षात आलंच असेल. त्याची नाव सांगण्याचीही गरज नाही. ते जाऊद्या. भारतीयांसोबतच आजकाल जगभरातील लोक आपल्या क्रिएटिव्ह कंटेंटने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. यातील काही फॉरेनर्स हे भारतीय गाण्यांवर डान्स करून किंवा वेगळा हटके कंटेंट तयार करून भारतीय प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत, पण कोण आहेत ते फॉरेनर्स, त्यांच्याचबद्दल जाणून घेऊया.

किली पॉल आणि निमा पॉल
सोशल मीडियानं जग किती जवळ आलंय, हे आपल्याला किली पॉल आणि निमा पॉल या भावंडांकडून समजतं. आता तुम्ही म्हणाल ते कसं? तर ते असं की, हे भावंडं आहेत टांझानियामधील मिंडू टुलिनी या छोट्याशा गावातले. त्यांच्या अंगावर कुठलेही महागडे कपडे किंवा पायात चांगल्या दर्जाच्या चपलाही नाहीत. फक्त एका स्मार्टफोनच्या जोरावर त्यांनी आपल्या कंटेंटने सर्वांची मने जिंकलीत. विशेषत: भारतातील लोकांची. किली आणि नीमा हे भावंडं टिक टॉक स्टार बनले आहेत. त्यासोबतच ते इंस्टाग्रामवरही तितकेच प्रसिद्ध आहेत.

ते त्यांचे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी स्मार्टफोन वापरतात, आणि वीज नसलेल्या टांझानियामधील एका छोट्या गावात असल्याने, किली फोन चार्ज करण्यासाठी दररोज जवळच्या शहर लुगोबालात जातो. २६ वर्षीय किली व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी त्याची २३ वर्षीय बहीण नीमाची मदत घेत असतो. त्यांची हीच मेहनत आपल्याला सहज मोबाईल चाळताना दिसते, आणि त्यांचे व्हिडिओ पाहून आपणही आनंदी होतो. साध्या पेहरावात हे भावंडं बॉलिवूड सिनेमातील गाण्यांचे लिप- सिंक करत डान्स करत असतात. त्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे ते रातोरात सोशल मीडिया स्टार बनले होते. त्यानंतर त्यांच्या प्रसिद्धीत वाढच वाढ होतेय. ते सतत व्हिडिओ बनवत असतात. त्यांनी आतापर्यंत इमरान हाश्मी, गोविंदा यांसारख्या कलाकारांच्या गाण्यांवर लिप- सिंक आणि डान्स करून सर्वांची मने जिंकली आहेत. किलीला इंस्टाग्रामवर १.७ मिलियन लोक फॉलो करतात.

‘डान्सिंग डॅड’ रिकी पाँड
बॉलिवूड ही जगातील सर्वात मोठ्या सिनेइंडस्ट्रींपैकी एक आहे. इथे दरवर्षी शेकडो सिनेमे बनतात. जरी ऍक्शन किंवा सायन्स फिक्शन सिनेमांच्या बाबतीत, अनेकांना फक्त हॉलिवूड आवडत असेल, पण भारतातील सिनेमे देखील त्यांच्या उत्कृष्ट आणि जबरदस्त गाण्यांमुळे जगभरात ओळखले जातात. काही परदेशी लोक भारतीय सिनेमांतील गाण्यांवर लिप-सिंक करत डान्स करताना दिसतात. यापैकीच एक म्हणजे रिकी पाँड. अमेरिकेचा रहिवासी असलेल्या रिकीला ‘डान्सिंग डॅड’ म्हणूनही ओळखले जाते. रिकीदेखील हिंदी आणि मराठी सिनेमांतील गाण्यांवर आपले व्हिडिओ बनवतो आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करतो. विशेष म्हणजे त्याला इंस्टाग्रामवर साडे पाच लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. हे फॉलोव्हर्स त्याच्या व्हिडिओंना भरभरून प्रेम देतात. त्याने आतापर्यंत ‘चक दे इंडिया’, ‘मस्त चाललंय आमचं’, ‘जुम्मे की रात है’ यांसारख्या अनेक गाण्यांवर परफॉर्मन्स करत भारतीयांच्या मनात घर केलंय.

पॉला मॅकग्लिन
पॉला मॅकग्लिनबद्दल तर आपण जाणून घेऊया. कदाचित तुम्ही सर्वजण ‘भाडिपा’ पाहत असालच. कारण, जर तुम्ही ‘भाडिपा’ म्हणजेच ‘भारतीय डिजिटल पार्टी’ जर पाहत असाल, तर याची कल्पना ही पॉलाचीच होती. पॉला ही तशी कॅनडाची बरं का, पण तिचा जीव जडला तो पुण्याच्या सारंग साठेवर. सुरुवातीला पॉलाला मराठी कळत नसल्याने सारंगला तिच्याशी बोलताना फारच अडचण व्हायची, पण हळूहळू ती मराठी शिकली. अठराव्या वर्षी जपानची वारी करणारी पॉला जगातील कुठल्याही संस्कृतीत मिसळते. आपला बॉयफ्रेंड सारंग साठेसोबत ती अनेक मजेशीर व्हिडिओ बनवत असते. कधी डान्सचे, तर कधी कॉमेडी व्हिडिओ ती शेअर करत असते. तिला कॉमेडी व्हिडिओत मराठी बोलताना पाहून प्रेक्षकही चांगलीच मजा घेतात. पॉलाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे, ती एक अभिनेत्री देखील आहे. तिने बॉलिवूडच्या ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि मराठीच्या ‘खिचिक’ आणि ‘पिंडदान’ सिनेमातही काम केलंय.

रूही दोसानी
इंस्टावर स्वत:च्या बायोमध्ये ‘पंजाब दी कुडी नाऊ इन फॉरेन’ असं लिहिणारी रूही दोसानी तशी जवळपास सर्वांच्याच परिचयाची असेल. महामारीच्या काळात तिला तिच्या मित्रांसोबतच ‘आम्ही देसी’ म्हणून अमाप लोकप्रियता मिळाली. रूहीचा हा ग्रूप भोजपुरी ते पंजाबी गाणी ऐकण्यासाठी आणि त्यांचे मॅशअप करण्यासाठी लोकप्रिय आहे. खरं तर रूहीबद्दल थोडक्यात सांगायचंं झालं, तर ती आपल्या फॉरेनच्या मित्रांना घेऊन हिंदी, पंजाबी, भोजपुरी गाण्यावरील हटके डान्स व्हिडिओ तयार करते. आता तुम्ही म्हणाल, फॉरेनचे मित्र, मग त्यांना भारतीय भाषा कशा काय समजतात, तर याचं श्रेय जातं रूहीला. रूही काय करते की, जेव्हा तिला एखादा डान्स व्हिडिओ बनवायचा असतो, तेव्हा ती तिच्या मित्रांसमोर अशी परिस्थिती निर्माण करते की, ते फक्त बिट धरून त्यावर परफॉर्म करतील आणि ते त्यांच्या व्हिडिओशी कनेक्ट होतील. तिने ‘चिंता ता चिता चिता’ गाण्यावर, ‘वॉशिंग पावडर निरमा’ जाहिरातीवर, आणि शेहनाझ गिलच्या ‘क्या करू मैं मर जाऊ’वरही अनेक व्हिडिओ तयार केले आहेत.

२ फॉरेनर्स इन बॉलिवूड ग्रूप
आपल्या व्हिडिओंनी प्रेक्षकांचं मनोरंजन हटके पद्धतीनं कसं करायचं, हे या २ फॉरेनर्स इन बॉलिवूड ग्रूपकडून शिकलं पाहिजे. खरं तर २ फॉरेनर्स इन बॉलिवूड हा मुंबईतील एक प्रसिद्ध कॉमेडी ग्रूप आहे. या ग्रूपमध्ये जोहान बार्टोली, हॅम्पस बर्गक्विस्ट आणि विधान प्रताप सिंग हे तीन सदस्य आहेत. अनेक बॉलिवूड सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकलेल्या विधानने हॅम्पस आणि जोहान या दोन इंग्रज व्यक्तींसोबत एक युट्यूब चॅनल सुरू केला. ७ एप्रिल, २०१६ रोजी २ फॉरेनर्स इन बॉलिवूड या नावाने त्यांनी युट्यूब चॅनेल सुरू केला होता. त्यांच्या या चॅनेलला ५.४६ मिलियन सबस्क्रायबर्स आहेत. या चॅनेलवर त्यांनी ४६ व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्यांच्या चॅनेलची खास गोष्ट म्हणजे, असे व्हिडिओ बनवतात की, ज्यामुळे लोकांचे हसून हसून पोटच दुखलं पाहिजे. यावेळी ते फॉरेनर्सही हिंदीतच बोलतात, आणि यामुळे त्यांच्या व्हिडिओंना आणखी वाहवा मिळते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
लग्न, मुलं-बाळं होऊनदेखील साऊथच्या ‘या’ कलाकारांचे बाहेर होते अफेअर; यादीत बडे ऍक्टरही सामील
सनी देओल सोडाच, रजनीकांत यांच्यावरही भारी पडली होती श्रीदेवी; तिनंच ठरवलेलं सिनेमात कुणाला करायचं कास्ट
नर्गिसची मुलाखत घेताना दत्त साहेबांच्या तोंडातून का फुटला नव्हता एकही शब्द? तुम्हालाही आवडेल किस्सा

हे देखील वाचा