Monday, July 1, 2024

व्यसनाच्या आहारी गेल्याने अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते ‘हे’ कलाकार, काही नावे वाचून धक्का बसेल

व्यसनाच्या आहारी गेल्यास राजाचा रंक होतो, असं सर्वसाधारणपणे म्हटले जाते. काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बाबतीतही हे तितकंच खरं ठरलेलं आहे. मात्र, काहींनी नंतर त्यातून स्वतःला सावरलं देखील आहे.

यातही काही सेलिब्रिटी हे मरणाच्या दारातून वाचलेले आहेत तर काही सेलिब्रिटींनी वेळीच व्यसनं सोडून स्वतःचं आयुष्य सुखी आणि समाधानी केलेलं आहे. काही जण तर व्यसनमुक्तीची ऍनिव्हर्सरी साजरी करत आहे. असे कोण कलाकार आहेत जे व्यसनाधीन झाले होते त्यांच्या बाबतीत आज आपण जाणून घेणार आहोत.

पूजा भट

नुकतीच पूजा भट हिने तिची व्यसनमुक्तीची चौथी ऍनिव्हर्सरी साजरी केली. २०१६ ला तिने दारूच व्यसन सोडलं. तिच्या सोबत असं काय झालं होतं यावर एक नजर टाकूयात. माध्यमांनुसार पूजा भट हिने वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच दारू प्यायला सुरुवात केली होती. तिला दारूची इतकी सवय झाली की ती प्रमाणाबाहेर दारू पिऊ लागली होती.

वयाच्या पंचेचाळीशीत तिला उमगलं की आपण जर दारू सोडली नाही तर आपण जास्त दिवस जगू शकणार नाही. तिला तिच्या मृत्यूची चाहूल लागली होती जणू! त्यामुळे या अभिनेत्रीने वेळीच पण सावध पवित्रा घेतला आणि २०१६ मध्ये अखेर तिने दारू सोडली. आता ती एक आनंदी आणि सुकर आयुष्य जगत आहे.

जावेद अख्तर

एकेकाळची प्रसिद्ध लेखक जोडी सलीम-जावेद मधील जावेद अख्तर, जे स्वतः एक उत्तम लेखक, शायर, कवी, गीतकार, विचारवंत आहेत त्यांचं नाव या यादीत वाचून आपल्याला थोडा धक्का बसला असेल नाही. पण हीच तर बॉलिवूडची खरी खासियत आहे. इथे कुणीही लपून राहत नाही.

जावेद अख्तर यांनी स्वतःच हे अमीर खानच्या सत्यमेव जयते शोच्या पहिल्या पर्वातील एका भागात सर्वांसमोर मान्य केलं की, त्यांना एकेकाळी दारूचं भयंकर व्यसन लागलं होतं. ते दारूच्या इतके आहारी गेले होते की त्यांच्यावर त्यांचं कुटुंब आणि करियर दोन्ही गमावण्याची वेळ आली होती. त्यांच्या याच व्यसनाधीनतेमुळे त्यांच्या पहिल्या पत्नी हनी इराणी यांनी त्यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. परंतु आता जावेद अख्तर हे संपूर्णरित्या ठीक आहेत.

धर्मेंद्र

बॉलिवूडचे हीमॅन अर्थात अभिनेते धर्मेंद्र हे सध्या ८५ वर्षांचे झाले आहेत. त्यांची दारू पिण्याची सवय ही बॉलिवुड तर सोडाच परंतु सामान्य जनतेलाही बऱ्यापैकी ठाऊक आहे.

एका रिऍलिटी शो मध्ये स्वतः धर्मेंद्र यांनी हे कबुल केलं आहे की ते चित्रपटाच्या सेट वर दारू पिऊन जात असत परंतु एक दिवस अभिनेत्री आशा पारेख यांनी मनाई केल्यानंतर त्यांनी त्यांची ही सवय तात्काळ मोडली होती. धर्मेंद्र यांच्या म्हणण्यानुसार १९६६ साली प्रदर्शित झालेल्या आये दिन बहार या सिनेमाचं चित्रीकरण दार्जिलिंग ला सुरू होतं.

रात्री दिवसभराचं पॅकअप झालं की चित्रपटाच्या सेटवरील क्रू मेंबर्स हे पार्टी करायचे. आणि या पार्टीत धर्मेंद्रदेखील सहभागी व्हायचे. रात्रभर दारू प्यायल्यानंतर तिचा दुर्गंध हा तोंडाला यायचा तो लपवण्यासाठी धर्मेंद्र कांदा खायचे. दुसऱ्या दिवशी सेटवर अभिनेत्री आशा पारेख याना धर्मेंद्र यांच्या तोंडाला कांद्याचा वास येऊ लागला आणि मग सगळी खरी परिस्थिती समोर आली. यावर आशा पारेख यांनी मनाई केल्यावर धर्मेंद्र यांनी त्यानंतर पुन्हा अशी चूक कधीच केली नाही.

कपिल शर्मा

कपिल हा सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील सर्वात आघाडीच्या विनोदी नटांपैकी एक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. परंतु त्याच्या दारू पिण्याच्या एक वाईट सवयीमुळे त्याच्यापासून त्याची जवळची माणसं दूर जाऊ लागली.

काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियावरून भारतात परतत असताना कपिल शर्माने भर विमानात दारूच्या नशेत अभिनेता सुनील ग्रोव्हर याचा अपमान तर केलाच वर त्याला शिवीगाळ देखील केली यामुळे कपिलच्या शो मध्ये आपल्याला आता सुनील ग्रोव्हर काम करताना दिसत नाहीत. कपिलची एक्स गर्लफ्रेंड प्रीती सीमोस सुद्धा कपिलच्या या गैव्यवहारामुळे दुखावली गेली आणि तिने इव्हेंट अर्ध्यातूनच सोडून दिला होता.

हनी सिंह

रॅपर हनी सिंगही दारूच्या व्यसनामुळे खूप त्रस्त झाला होता. त्याला उपचारासाठी पुनर्वसन केंद्रातही जावं लागलं होतं इथपर्यंत परिस्थिती गेली होती. २०१७ मध्ये हनीचे काही फोटोज व्हायरल झाले होते ज्यामध्ये त्याचं वजन झपाट्याने वाढत असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर तो दारूच्या व्यसनाधीन आणि बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त असल्याचं उघड झालं. परंतु आता हनी बऱ्यापैकी त्याच्या या अवस्थेतून रिकव्हर होत आहे.

हे देखील वाचा