मंडळी, आई बाबा व्हायला कुणाला आवडत नाही? प्रत्येक जोडप्याला आई-बाबा व्हावं असं नक्की वाटतं. आई-वडील होणे ही आनंदाची बाब असते. सामान्यतः लोक वयाच्या विशीत ते तिशीत अथवा अधिकतर पस्तीशीपर्यंत आई-वडील होणे पसंत करतात.
परंतु, काही असेही लोक आहेत जे वयाच्या पन्नाशीत पुन्हा आई-बाबा झालेत. आपण म्हणाल आज लेखासाठी हाच मुद्दा का? तर याचं कारण असं, गेल्यावर्षी अखेरीस दिनांक ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध भोजपुरी अभिनेते आणि गायक तसेच भाजपचे खासदार मनोज तिवारी हे दुसऱ्यांदा बाबा झाले तेही चक्का वयाच्या पन्नासाव्या वर्षी!
मनोज तिवारी यांना याआधीच एक मुलगी आहे जीचे नाव आहे जिया. बर पन्नाशीत बाबा होणारे मनोज तिवारी काही पहिलेच सेलिब्रिटी नाहीत. बॉलिवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत जे मनोज तिवारी यांच्याप्रमाणे पन्नाशीमध्ये बाबा झालेत. चला तर मग पाहुयात कोण कोण आहेत हे अभिनेते.
शाहरुख खान
बॉलिवूडच्या किंग खानने १९९१ मध्ये गौरी छिब्बरशी लग्न केलं होतं. त्यानंतर दोघेही १९९७ मध्ये मुलगा आर्यनचे पालक झाले. त्याच वेळी २००० मध्ये गौरीने मुलगी सुहानाला जन्म दिला. सुहानाच्या जन्मानंतर शाहरुख-गौरीचा तिसरा मुलगा अब्राहमचा जन्म २०१३ मध्ये झाला होता. त्यावेळी शाहरुख खान ४८ वर्षांचा होता.
खुद्द शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कामातील व्यस्ततेमुळे तो आर्यन-सुहाना यांचं बालपण पाहू शकला नव्हता, त्यांच्याबरोबर योग्य तो वेळ व्यतीत करू शकला नव्हता. म्हणूनच त्याने तिसर्या अपत्याचा विचार करायला सुरुवात केली. वय जास्त असल्यामुळे गौरीला गर्भवती होण्यास त्रास होत होता, म्हणून मग शाहरुख आणि गौरी या दांपत्याने अब्राहमच्या जन्मासाठी सरोगसीचा मार्ग निवडला होता. आज अब्राहम हा ७ वर्षांचा झाला आहे.
सैफ अली खान
वयाच्या ५० व्या वर्षी सैफ अली खान चौथ्यांदा बाबा होणार आहे. त्याची दुसरी पत्नी करीना कपूर खान वयाच्या ३९ व्या वर्षी पुन्हा गर्भवती राहिली आहे. यापूर्वी २०१६ मध्ये करीनाने तिचा पहिला मुलगा तैमूरला जन्म दिला होता.
सैफ अली खानने अमृता सिंह सोबत १९९१ मध्ये लग्न केलं होतं. त्यानंतर त्यांना सारा आणि इब्राहिम अशी दोन मुलं झाली. आज सारा ही बॉलिवूडमध्ये अभिनेत्री म्हणून कार्यरत आहे तर इब्राहिम हा १९ वर्षांचा असून त्याने टशन या सिनेमात बालकलाकार म्हणून काम देखील केलं आहे.
संजय दत्त
अभिनेता संजय दत्त हा तीन मुलांचा पिता आहे. १९८७ मध्ये त्याचं पाहिलं लग्न रिचा शर्माशी झालं होतं. त्यानंतर १९८८ मध्ये संजयची मुलगी त्रिशलाचा जन्म झाला. त्रिशला आता ३२ वर्षांची असून ती अमेरिकेत राहते. यानंतर संजयने रिया पिल्लईशी लग्न केलं पण त्यांना मूलबाळ नव्हतं.
त्यानंतर संजयने २००८ मध्ये तिसरं लग्न मान्यताशी लग्न केलं. २०१० मध्ये मान्यताने शाहरान आणि इक्रा या दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. यावेळी संजय ५१ वर्षांचा होता. आता शाहरान आणि इक्रा दहा वर्षांचे आहेत आणि संजय आता ६१ वर्षांचा झाला आहे.
अक्षय कुमार
बॉलिवूडचा खिलाडी कुमार, अक्षय कुमारने २००१ मध्ये ट्विंकल खन्नाशी लग्न केलं आणि त्यानंतर २००२ मध्ये मुलगा आरवचा जन्म झाला. आरवच्या जन्मानंतर दहा वर्षांनी अक्षय आणि ट्विंकल हे दांपत्य पुन्हा पालक झाले.
वर्ष २०१२ मध्ये त्यांची मुलगी निताराचा जन्म झाला होता. जेव्हा अक्षय दुसऱ्यांदा बाबा झाला तेव्हा त्याचं वय ४५ वर्षे होतं. आज अक्षय ५३ वर्षांचा आहे.
सोहेल खान
१९९८ मध्ये सोहेलने सीमा खानसोबत लग्न केलं. त्यांचा मुलगा निर्वाणचा जन्म साल २००० मध्ये झाला होता, परंतु सोहेल आणि सीमा यांना आणखी एक मूल हवं होतं, त्यामुळे त्यांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा आधार घेतला आणि साल २०११ मध्ये दुसरा मुलगा योहानचा जन्म झाला. योहानच्या जन्मावेळी सोहेल ४२ वर्षांचा होता.
आमिर खान
आमिर खानने दोन लग्न केली. मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरने १९८६ मध्ये रीना दत्ता हिच्याशी पहिलं लग्न केलं. यानंतर हे दोघही मुलगा जुनैद आणि मुलगी इरा यांचे पालक झाले. २००२ मध्ये रीनाशी घटस्फोट घेतल्यानंतर आमीरने २००५ मध्ये किरण रावशी लग्न केलं होतं.
त्यानंतर आमिर २०११ मध्ये तिसऱ्यांदा बाबा झाला. आमिर-किरण यांनी सरोगसीच्या माध्यमातून आझाद राव खान याला जन्माला घातलं. त्यावेळी आमिरचं वय ४८ वर्षे होतं.