मुंबई : स्प्लिट्सविला 13 चा विजेता आणि बिग बॉस मराठी 3 चा प्रथम उपविजेता जय दुधाने याला ठाणे पोलिसांनी 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात अटक केली आहे. रविवारी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. जय दुधाने आपल्या कुटुंबासह परदेशात जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जय दुधाने (Jay Dudhane) याच्यावर बनावट कागदपत्रांच्या आधारे एकाच दुकानाची अनेक जणांना विक्री केल्याचा आरोप आहे. या फसवणुकीमुळे अनेक खरेदीदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
जय दुधाने पत्नी, भाऊ आणि भावजय यांच्यासह परदेशात जाणार होता. मात्र, विमानतळावरच पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर पोलिसांनी जय दुधानेच्या कुटुंबीयांचीही चौकशी सुरू केली आहे.
अटकेनंतर जय दुधानेने आरोप फेटाळून लावत हे प्रकरण खोटे असल्याचे सांगितले. तो पळून जात नसून न्यायव्यवस्थेवर आपला पूर्ण विश्वास असल्याचेही त्याने स्पष्ट केले. दुकान विक्रीबाबत पसरवण्यात येणाऱ्या अफवा चुकीच्या असल्याचे सांगत, आरोप सिद्ध करण्याचे आव्हान त्याने दिले आहे.
पोलिस चौकशीत जय दुधानेने आपण हनीमूनसाठी परदेशात जात होतो आणि आपल्या नावावर अटक वॉरंट असल्याची माहिती नव्हती, असा दावा केला आहे. देश सोडण्यास मज्जाव झाल्यानंतर आपण तपासात पूर्ण सहकार्य करू, असेही त्याने सांगितले.
ठाणे येथील रहिवासी असलेला जय दुधाने जिम व्यवसायाशी संबंधित असून तो प्रसिद्ध फिटनेस ट्रेनर, अॅथलीट, मॉडेल आणि अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याने 24 डिसेंबर 2025 रोजी त्याची दीर्घकालीन मैत्रीण हर्षला पाटील हिच्याशी विवाह केला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ऋषभ शेट्टीने हिंदीमध्ये ‘शंभाला’चा ट्रेलर केला रिलीज, रहस्य आणि विज्ञानाचा थरारक संगम प्रेक्षकांसमोर










