आमिर खानची सुपरहिट फिल्म ‘गजनी’ 2008 मध्ये प्रदर्शित झाली होती आणि आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. या चित्रपटाने रातोरात त्यातील नायिकेला स्टारडम मिळवून दिलं आणि ती देशाची नॅशनल क्रश ठरली. ही अभिनेत्री म्हणजे आसिन. तिचं सौंदर्य, निरागसता आणि अभिनय यामुळे प्रेक्षक तिच्यावर फिदा झाले होते.
साऊथ सिनेमात आधीच स्टार असलेल्या आसिनसाठी ‘गजनी’ हे जरी बॉलिवूड डेब्यू असलं, तरी तिच्या मेहनतीमुळे तिने पुढे अक्षय कुमार आणि सलमान खानसारख्या सुपरस्टार्ससोबत एकामागून एक हिट चित्रपट दिले. मात्र करिअरच्या शिखरावर असतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा सुरू झाली. आसिनने लग्न केलं आणि अचानकच बॉलिवूडला कायमचा रामराम ठोकला. त्यानंतर ती पूर्णपणे लाइमलाईटपासून दूर राहिली. अनेक वर्षे चाहत्यांना तिच्या कमबॅकची किंवा खासगी आयुष्याची एक झलक तरी पाहायला मिळेल का, याची उत्सुकता होती.
आता तब्बल 10 वर्षांनंतर आसिन पुन्हा चर्चेत आली आहे, पण यावेळी कारण तिचं काम नाही तर तिचं वैयक्तिक आयुष्य आहे. आसिन आणि तिचे पती राहुल शर्मा यांच्या लग्नाला 10 वर्षे पूर्ण झाली असून, या खास प्रसंगी राहुलने त्यांच्या लग्नातील काही न पाहिलेल्या फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर होताच व्हायरल झाले आहेत.
एका फोटोमध्ये लग्नातील सुंदर क्षण दिसतो, तर दुसऱ्या फोटोमध्ये आसिन आणि राहुल डिनर टेबलवर बसलेले दिसतात. आसिनचा चुलबुला आणि निरागस अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकत आहे. अनेकांनी “दहा वर्षे गायब असली तरी आसिनचं सौंदर्य अजिबात कमी झालेलं नाही,” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
हे फोटो राहुल शर्माने स्वतःच्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर शेअर केले आहेत. एका खास फोटोमध्ये आसिन पांढऱ्या वेडिंग गाऊनमध्ये मजेशीर अंदाजात जीभ बाहेर काढताना दिसते. या फोटोसोबत राहुलने कॅप्शन दिलं, “10 आनंदी वर्षे…”. इतकंच नाही तर राहुलने आसिनसाठी एक भावनिक नोटही लिहिली. त्यात त्याने आसिनला आपल्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या गोष्टीची को-फाउंडर म्हटलं आणि तिच्यासोबतचा प्रवास आपल्यासाठी किती खास आहे, हे व्यक्त केलं.
आसिननेही आपल्या लग्नाच्या 10व्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्राम स्टोरीजवर काही फोटो शेअर केले. एका फोटोमध्ये त्यांची मुलगी आरिन समुद्रकिनारी वाळूत खेळताना दिसते, तर दुसऱ्या फोटोमध्ये आसिन आणि राहुलने वाळूत आपल्या नावांची आद्याक्षरं लिहिली आहेत. यावर तिने लिहिलं, “10 वर्षे आणि पुढेही…”.
आसिन आणि राहुल शर्मा (Rahul Sharma)यांनी जानेवारी 2016 मध्ये लग्न केलं होतं आणि ऑक्टोबर 2017 मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला. 2023 मध्ये त्यांच्या नात्याबाबत घटस्फोटाच्या अफवा पसरल्या होत्या, मात्र आसिनने त्या पूर्णपणे खोट्या ठरवल्या. आता लग्नाच्या 10व्या वर्षानिमित्त समोर आलेल्या या फोटोंमुळे दोघांचं नातं आजही तितकंच मजबूत असल्याचं स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे, आसिन आणि राहुल यांच्या नात्यात अभिनेता अक्षय कुमार यांनी ‘क्युपिड’ची भूमिका बजावली होती, हेही अनेकांना माहिती आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
आलिया-रणबीर-विक्कीचा ‘लव अँड वॉर’ उशिरा येणार? भंसालींच्या चित्रपटाची डेट पोस्टपोन झाल्याची चर्चा










