मराठी मधील अष्टपैलू अभिनेता म्हणून जितेंद्र जोशी ओळखला जातो. चित्रपट, नाटकं, वेबसिरीज आणि मालिका या सर्वच माध्यमात जितेंद्रने त्याच्या अभिनयाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे.
जितेंद्र जोशी एक उत्तम अभिनेता तर आहेच शिवाय तो उत्तम कवी आणि चांगला सूत्रसंचालक देखील आहे. आता जितेंद्र एका नवीन क्षेत्रात पाऊल टाकत आहे, आणि ते क्षेत्र म्हणजे निर्मितीचे. जितेंद्र जोशींची निर्मिती असणारा ‘गोदावरी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जितूने त्याच्या या नवीन सिनेमाचा टिझर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेयर केला आहे. हा टिझर शेयर करतांना जितूने लिहिले की, ‘तुम्हाला ऐकू येत असेल तर नदी बोलते तुमच्याशी.. गोदावरी..’
यूट्यूबवरही गोदावरी सिनेमाच्या टीझरला तुफान प्रसिद्धी मिळत आहे. या टीझरमध्ये लग्न समारंभ आणि त्यातून घरातील लोकांबद्दल प्रत्येकाच्या मनात असणारे प्रेम दिसत आहे. सोबतच गोदावरीचे वाहणारे नितळ पाणी देखील दिसत आहे. ही नाती आणि गोदावरी यांच्यात असलेल्या संबंधावर हा चित्रपट असणार हे नक्की.
दिनांक १ मे २०२१ रोजी अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी गोदावरी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात जितेंद्र जोशीसोबतच नीना कुळकर्णी, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे, सखी गोखले, विक्रम गोखले आणि संजय मोने असे प्रतिभावान कलाकार झळकणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन पुणे ५२ या चित्रपटातून आपल्या दिग्दर्शनाची दखल घ्यायला लावणाऱ्या निखिल महाजनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
या चित्रपटाविषयी दिग्दर्शक निखिल महाजन म्हणाले की, मागील बऱ्याच काळात उत्तम कौटुंबिक कथा ही मराठी चित्रपटातून मांडण्यात आलेली नाही. नाशिकमधील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या एका कुटुंबाच्या आणि त्या नदीच्या जिव्हाळ्याची गोष्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात येणार आहे. जितेंद्र जोशीने त्याच्या प्रतिभेच्या जोरावर त्याने यश मिळवले. जितूने सैफ अली खान सोबत सिक्रेड गेम्स मध्ये आणि बेताल या सेरिजध्ये काम केले आहे.