Sunday, February 8, 2026
Home बॉलीवूड गोविंदाला कोण मारू पाहत आहे? मॅनेजरचा मध्यरात्रीच्या हल्ल्याचा धक्कादायक खुलासा

गोविंदाला कोण मारू पाहत आहे? मॅनेजरचा मध्यरात्रीच्या हल्ल्याचा धक्कादायक खुलासा

बॉलीवूड स्टार गोविंदा जरी सध्या चित्रपटांपासून दूर असले, तरी ते सतत चर्चेत असतात. अलीकडेच शाळेच्या कार्यक्रमात आणि लग्नसमारंभात स्टेजवर नाचतानाचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चा रंगल्या. आता गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी गोविंदाच्या जीवाला धोका असल्याचा दावा केला आहे.

शशी सिन्हा यांनी एका दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, गोविंदाला (Govinda)सतत जीव मारण्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. ते म्हणाले,“गोविंदाला सातत्याने धमकीचे कॉल येतात. ज्या दिवशी त्याच्यावर हल्ला झाला, त्या दिवशी सुदैवाने त्याच्याकडे बंदूक होती. त्याने सर्वांना पळवून लावले, नाहीतर काय झाले असते सांगता येत नाही. मी सकाळी 4 वाजता त्याच्याकडे पोहोचलो. आम्ही एफआयआरही दाखल केली आहे. त्या रात्रीच्या घटनेचा व्हिडिओही आमच्याकडे आहे.” शशी सिन्हा यांनी नेमकी कोणती घटना सांगितली, हे स्पष्ट केले नसले तरी त्यांनी असेही म्हटले की, गोविंदा आत्मसंरक्षण करताना जखमी झाले होते.

ऑक्टोबर 2024 मध्ये गोविंदाच्या पायाला गोळी लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या वेळी शशी सिन्हा यांनी वेगळेच स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार,“गोविंदा पहाटे 4.45 वाजता एअरपोर्टला जाण्यासाठी निघणार होते. सकाळी 6 वाजता कोलकात्यातील शोसाठी त्यांची फ्लाइट होती. त्याच वेळी कपाटात बंदूक ठेवताना चुकून त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर दाबला गेला आणि गोळी पायात लागली.” पोलिसांनी तेव्हा सांगितले होते की, या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

नंतर गोविंदाने स्वतः निवेदन जारी करून आपली प्रकृती सुधारत असल्याचे सांगितले होते. क्रिटिकेअर हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी पायातून गोळी काढली असून, चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे आपण लवकर बरे होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता मॅनेजरच्या नव्या दाव्यांमुळे गोविंदाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा बॉलीवूडमध्ये खळबळ माजली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

कॅन्सरशी झुंज देताना प्रसिद्ध अभिनेत्री जया वाहिनी यांचे निधन, चित्रपटसृष्टीत शोककळा

हे देखील वाचा