बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदाने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने गोविंदाने मुंबईत एका शानदार पार्टीचे आयोजन केले होते. अनेक कलाकारांनी त्याच्या या पार्टीला हजेरी लावली. त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये गोविंदा तिच्या पत्नीसोबत त्याच्या खास शैलीत डान्स करतांना दिसत आहे. गोविंदाच्याच चित्रपटांमधील हिट गाण्यांवर सर्व जणं डान्स करत आहेत.
त्याच्या डान्सच्या व्हिडिओमध्ये गोविंदासोबत शक्ती कपूर, गोविंदाची पत्नी सुनीता आहूजा, गणेश आचार्य यांनी देखील जोरदार डान्स करत गोविंदाला साथ दिली. गणेश आचार्य आणि गोविंदा या जोडीने ‘हुस्न हैं सुहाना’ या गाण्यावर खास डान्स करत पार्टीला रंगत आणली. यावेळी गोविंदाने त्याची ओळख असलेले काही एक्सप्रेशन देत देखील डान्स केला. ‘व्हायरल भयानीने’ आपल्या इंस्टाग्रामवरून शेयर केलेल्या या व्हिडिओला लोकांच्या भरभरून लाईक्स आणि शुभेच्छा मिळत आहे.
गोविंदाने 1986 मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ‘विरारचा छोरा’ ते विनोदाचा बादशहा’ हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता. अनेक चढ उतार पार करत त्याने विनोदी भूमिकांचा बादशाह अशी ओळख तयार केली. गोविंदाने आजपर्यंत १६५ चित्रपटांमध्ये काम केले. गोविंदाने जरी विनोदी भूमिकांमध्ये जास्त काम केले असले, तरी तो त्या भूमिकांमध्ये अडकून राहिला नाही. विनोदीसोबत त्याने गंभीर, ऍक्शन सिनेमेदेखील केले आणि ते सुद्धा सुपरहिट. २००३ साली गोविंदाने राजकारणात प्रवेश केला. २००३-०४ सालच्या लोकसभा निवडणुकांसाठी तो काँग्रेसकडून उभे राहत खासदार म्हणून निवडून आला. मात्र त्याचे मन राजकारणात रमले नाही. राजकारणातून बाहेर येत त्याने पुन्हा चित्रपटांकडे त्याचा मोर्चा वळवला.
गोविंदाने आतापर्यंत कुली नं १, हिरो नं १, शोला और शबनम, पार्टनर, हसीना मान जायेगी, आँखे, राजा बाबू, स्वर्ग, हत्या, बडे मिया छोटे मिया, ऑन्टी नं १, सजन चले सासुराल, महाराजा, जोडी नं १ अशा अनेक चित्रपटात एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत.










