सध्या सगळीकडे लग्नाचा सिझन सुरू आहे. यात सामान्य लोकं तर सोडाच पण भारतीय सिनेमातील सेलिब्रिटीजही मागे नाहीत. देशात जसं अनलॉक करण्यास सुरुवात झाली, अनेकांनी आपल्या लग्नाचा बार उडवायला सुरुवात केली. अनेक सेलिब्रिटींनी गुपचूप आपली लग्न उरकून घेतली आणि काहींची तर या नव्या वर्षात येत्या काही काळात होणार आहेत. या यादीत आता सुप्रसिद्ध पंजाबी गायक गुरू रंधावा याचं देखील या यादीत नाव येण्याची शक्यता आहे. गायक गुरू रंधावाने गुपचूप साखरपुडा उरकल्याच्या चर्चा सगळीकडे होऊ लागल्या आहेत. चला तर मंडळी पाहुयात नेमकं काय आहे हे प्रकरण…
गायक गुरू रंधावाबद्दल त्याने गुपचूप साखरपुडा केल्याची बातमी सगळीकडे पसरली आहे. गुरूने एका महिलेसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्याने त्या फोटो मध्ये नव्या वर्षात नवीन सुरुवात याबद्दलही सांगितलं आहे. यानंतर मात्र चित्रपटसृष्टीशी संबंधित अनेक कलाकारांनी त्याचं अभिनंदन केलं आहे.
गुरु रंधावाचा साखरपुडा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. गुरूने एक फोटो शेअर केला आहे. त्यात तो एका तरुणीसोबत दिसतोय परंतु गंमतीचा भाग म्हणजे त्या तरुणीचा चेहरा त्यात दिसत नाही. फोटोमध्ये ती फक्त हसताना दिसतेय मात्र तिचा चेहरा दिसत नाहीये. या फोटोतील तरुणीने केशरी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये गुरू रंधावा याने लिहिलं आहे की, ‘नवीन वर्ष, नवीन सुरुवात’. गुरूने दिलेल्या या कॅप्शनमुळे त्यांच्या चाहत्यांना असं वाटतंय की त्याने साखरपुडा केला आहे. एका चाहत्याने तर सरळ प्रश्न विचारलाय की, ‘तुम्ही लग्न करणार आहात काय गुरु रंधावा?’
यानंतर इंडस्ट्रीतील गुरू रंधावाच्या अनेक मित्रांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. यामध्ये जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचादेखील समावेश आहे, तर सचेत टंडन आणि निर्माती प्रज्ञा ठाकूर यांनीही त्यांचं अभिनंदन केलं आहे. अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने ‘अभिनंदन’ लिहुन अनेक बदामाचे इमोजी पाठवले आहेत. नोरा फतेहीने ‘अभिनंदन बाबा’ लिहिलं आहे.
गुरू रंधावा याने गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला इतक्यात लग्नाची घाई नाहीये. तो म्हणाला होता, ‘मला सेटल व्हायचं आहे. आयुष्यात सेटल होण्याकडे माझा जास्त कल आहे. माझ्यावर लग्न करण्यासाठी आता कुठलाही दबाव नाही.’
पुढे तो असंही म्हणाला की,’मी याक्षणी चांगलं काम करत आहे. मला जे प्रेम आणि आदर मिळतोय तो खूप चांगला आहे परंतु अद्याप लग्न करण्याचा माझा हेतू नाही.’
गुरू रंधावाने त्याचा साखरपुडा झाल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अजूनही केलेली नाही. त्यामुळे सध्या तरी त्याचा साखरपुडा झाल्याची बातमी ही एक अफवाच आहे असंच म्हणावं लागेल. परंतु या अफवेला बळ देणारा देखील स्वतः गुरूच आहे. त्याच्या त्या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे या फुकटच्या चर्चांना आणखीन उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी नेहाने तिच्या नव्या गाण्याचं ज्यापद्धतीने प्रमोशन केलं होतं तसा तर काही हा प्रकार नाही ना असा संशय देखील आता नेटकऱ्यांना येऊ लागला आहे.