‘हम अंग्रेजो के जमाने के जेलर है।’ हा संवाद आजही कानावर पडला तरी आपल्या डोळ्यामसमोर समोर एकच चेहरा येतो तो म्हणजे ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असराणींचा ज्यांना आपण सगळेच फक्त असराणी या नावानेच ओळखतो. आज पुन्हा एकदा या संवादाची आठवण झाली कारण नुकताच १ जानेवारी रोजी असराणी यांनी त्यांचा ८० वा वाढदिवस साजरा केला. याच असराणीजींनी हिंदी चित्रपटांमध्ये पाच दशकांहूनही अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आज असराणी यांच्या करकीर्दीबद्दल आपण थोडक्यात आढावा घेऊयात.
बॉलिवूडचे दिग्गज विनोदी अभिनेते गोवर्धन असराणीजी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला आहे. जयपूरच्या राजस्थान कॉलेजमधून त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि त्यांनी १९६२ मध्ये मुंबई गाठली. या दरम्यान एकदा अचानक त्यांची भेट दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी यांच्याशी झाली. त्यावेळी त्यांनी असराणी यांना अभिनय गांभीर्याने शिकण्याचा सल्ला दिला. मग यानंतर असराणी यांनी १९६४ मध्ये थेट पुणे गाठलं. पुण्यातल्या एफटीआयआय या संस्थेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. १९६६ मध्ये दोन वर्षांत त्यांनी कोर्स पूर्ण केला. हिंदी सिनेमांमध्ये त्यांना पहिला ब्रेक १९६७ मध्ये हरे कांच की चुडीया या चित्रपटामधून मिळाला. या चित्रपटात त्यांची भूमिका ही मुख्य अभिनेते बिस्वजित यांच्या मित्राची होती.
१९६७ मध्ये त्यांना गुजराती सिनेमामध्ये मुख्य अभिनेत्याच्या भूमिका मिळू लागल्या. पुढील काही वर्षे गुजराती सिनेमातच काम केल्यानंतर एक दिवस त्यांना मुंबईहून हृषीकेश मुखर्जी यांचं बोलावणं आलं. हृषीकेश यांनी त्यांना सत्यकाम या चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका दिली. यानंतर त्यांना मेरे आपने या चित्रपटात पाहिलं गेलं. या चित्रपटानंतर असराणी यांना मागे वळून पाहावं लागलंच नाही. ७० आणि ८० च्या दशकात त्यांनी सलग १०० हुन अधिक चित्रपटांमध्ये काम करण्याचा विक्रम प्रस्थापित केला. या वीस वर्षांमध्ये त्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख विनोदी भूमिका मिळत गेल्या.
याच दरम्यान त्यांची ओळख राजेश खन्ना यांच्याशी झाली. बावरची या सिनेमानंतर नमक हराम या चित्रपटाच्या सेटवर पुन्हा एकदा असराणी आणि खन्ना यांची भेट झाली आणि यानंतर त्यांची घट्ट मैत्री झाली. ही मैत्री इतकी घट्ट होती की राजेश खन्ना त्यांच्या प्रत्येक चित्रपटात मुख्य विनोदी अभिनेता म्हणून निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना असराणी याचंच नाव सुचवत असत. असं करता करता असराणी यांनी राजेश खन्ना यांच्या सोबत तब्बल २५ चित्रपट केले.
यानंतरचा काळ असराणी यांच्यासाठी थोडा कठीण गेला. चित्रपटातील नायकांकडूनच विनोद निर्मिती नव्वदीच्या दशकात होऊ लागली. त्यामुळे असराणी यांना त्यांच्या योग्यतेच्या भूमिका मिळत नव्हत्या. परंतू हादेखील काळ निघून गेला. पुन्हा साल २०००च्या नंतर असराणी यांना त्यांच्या कौशल्यानुसार भूमिका मिळू लागल्या. या दरम्यान त्यांनी हेरा फेरी, चूप चूप के, हलचल, गरम मसाला, दिवाने हुए पागल, मालामाल विकली, धमाल, दे दाणादाण, बोल बच्चन असे अनेक चित्रपट त्यांनी आतापर्यंत केले.
२०१९ मध्ये आलेल्या द लायन किंग या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनमध्ये त्यांनी झाझु या पात्रासाठी आपला आवाज दिला होता. असराणीजी यांना आज की ताजा खबर आणि बालिका वधू या सिनेमातील विनोदी भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. या शिवाय त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता असे दोन पुरस्कार सात कैदी या गुजराती सिनेमासाठी गुजरात राज्य सरकारकडून देण्यात आले.










