Monday, March 4, 2024

पुर्णपणे दारुच्या आहारी गेलेल्या बॉबी देओलने ‘त्या’ दिवशी दाढी केली नसती तर परत सिनेमात दिसलाच नसता!

आज बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल त्याचा ५३ वा वाढदिवस साजरा करत आहे. २७ जानेवारी १९६९ मध्ये बॉबीचा मुंबईत जन्म झाला. बॉबी हा धर्मेंद्र आणि त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर यांचा मुलगा. त्याचे खरे नाव विजय सिंह देओल असे असले तरी तो बॉबी या नावानेच प्रसिद्ध झाला. बॉबीला लहानपणांपासूनच धर्मेंद्र, आणि सनी देओल यांच्यामुळे घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळाले. बॉबी त्याच्या वडिलांच्या आणि भावाच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टींमध्ये एन्ट्री केली.

बॉबीने त्याच्या अभिनयाची सुरुवात १९७७ साली आलेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटातून केली. ८ वर्षाच्या बॉबीने त्या सिनेमात धर्मेंद्रच्या लहानपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर बॉबीने १९९५ साली मुख्य अभिनेता साकारत ‘बरसात’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये धमाकेदार पदार्पण केले. या सिनेमातून ट्विंकल खन्नाने देखील चित्रपट सृष्टीत पदार्पण केले. या सिनेमातला उंच, गोरा रंग, कुरळे केस असलेला बॉबी सर्वानाच भावला.

बॉबीचा हा पहिला सिनेमा चांगलाच हिट झाला आणि बॉबी इंडस्ट्रीसोबतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करु लागला. बॉबीसाठी ९० चा काळ हा सुवर्णकाळ होता. त्याने ‘बरसात’ नंतर ऐश्वर्या रायसोबत ‘और प्यार हो गया’ हा सिनेमा केला. त्यानंतर तो ‘गुप्त’ या सस्पेन्स थ्रिलर सिनेमात दिसला. हा सिनेमा प्रचंड लोकप्रिय झाला. त्याच्या अभिनयाचे रसिकांसोबतच, समीक्षकांनीही कौतुक केले. त्यानंतर बॉबी करीब, सोल्जर, दिललगी, अपने, चमकू, अजनबी, बिच्छू, यमला पगला दीवाना अशा काही सिनेमांमध्ये दिसला मात्र तो पूर्वीसारखी जादू प्रेक्षकांवर दाखवण्यात अपयशी ठरला.

त्यानंतर आधे मधे चित्रपटांमध्ये दिसणारा बॉबी अचानक गायब झाला. त्याच्या आयुष्यतील हि वेळ खूपच त्रासदायक होती. यातच तो दारूच्या आहारी गेला. तो नेहमी विचारात आणि काळजीत असायचा, त्यामुळे त्याने लोकांपासून दूर जात दारूला जवळ केले.

एकदा त्याने सांगितले होते की, “जेव्हा मी सतत दारूच्या नशेत असायचा तेव्हा मला स्वतःलाच स्वतःची दया यायची. एकदा मी माझ्या मुलांकडे पहात होतो तेव्हा अचानक विचार आला की, मी माझ्या मुलांसमोर कोणता आदर्श ठेवत आहे? हे माझ्याबद्दल काय विचार करत असतील? माझी पत्नी जीने मला या पडत्याकाळात साथ दिली तिला माझी अवस्था पाहून काय वाटत असेल? यासर्वांचा विचार करून मी ठरवले की आता या निराशेतून बाहेर यायचे. त्यानंतर मी स्वतःवर काम केले व्यायाम केला आणि कमबॅक साठी तयार झालो.”

“मला माझ्या कमबॅकसाठी सलमान खानने मदत केली. सलमान आणि माझी भेट सीसीएल (सेलिब्रिटी क्रिकेट लीग) च्या दरम्यान झाली. त्यावेळी त्याने मला विचारले ‘तू दाढी का करत नाही. मला माहितीय सध्या तुझी वेळ योग्य नाही, मात्र ही वेळ प्रत्येकाच्या नशिबात येते. पण गिव्ह अप करणे योग्य नाही.’  त्यानंतर त्याने मला पुन्हा विचारले की ‘तू दाढी काढणार का?’ मी त्याला हो म्ह्टल्यावर त्याने मला रेस ३ सिनेमाची ऑफर दिली,” असेही बॉबी पुढे म्हणाला.

हा सिनेमा भलेही ठिक ठाक असला तरीही बॉबीचा बदलेला लुक आणि त्याची बॉडी तेव्हा चर्चेचा विषय होता. हाच चित्रपट बॉबीसाठी टर्निंग पॉइंट ठरला. या सिनेमानंतर तो ‘यमला पगला दीवाना फिर से’ आणि ‘हाउसफुल ४’ सिनेमात दिसला. बॉबीने OTT प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केले. तो नेटफ्लिक्सच्या ‘क्लास ऑफ 83’ आणि एमएक्स प्लेयरची सीरीज ‘आश्रम’ मध्ये दिसला. आश्रम सिरीजने त्याचे नशीबच पालटून टाकले. बॉबीच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. ह्या सिरिजचे दोन्ही भाग प्रचंड गाजले.

२०२१ मध्ये बॉबी ‘लव हॉस्टल’ आणि ‘अपने २’ या सिनेमात दिसणार आहे. बॉबीला दैनिक बोंबाबोंबकडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!!

हे देखील वाचा