दृष्टी धामी हे टीव्ही जगतातील एक असे नाव आहे, जिला आज परिचयाची गरज नाही. डॉ मुस्कान, गीत आणि मधुबाला यांसारख्या पात्रांच्या व्यक्तिरेखेसाठी ती खूप प्रसिद्ध आहे. दृष्टी केवळ तिच्या ऑन-स्क्रीन व्यक्तिमत्त्वामुळे आणि तिने साकारलेल्या पात्रांमुळेच नव्हे, तर तिच्या ऑफ-स्क्रीन व्यक्तिमत्त्वामुळे, तिचा डाउन टू अर्थ स्वभाव, सह-कलाकार आणि चाहत्यांशी चांगले संबंध यामुळेही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करण्यात यशस्वी झाली आहे. लाखो हृदयांवर राज्य करणारी दृष्टी सोमवारी (१० जानेवारी) तिचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या कारकिर्दीशी संबंधित काही किस्से.
‘या’ मालिकेतून केली करिअरला सुरुवात
दृष्टीचा (Drishti Dhami) जन्म १० जानेवारी १९८५ मध्ये झाला. काही म्युझिक अल्बम आणि जाहिरातींमध्ये दिसल्यानंतर अभिनेत्रीने तिच्या टीव्ही करिअरची सुरुवात केली. दृष्टीने ‘दिल मिल गये’ या लोकप्रिय मालिकेत बबली डॉ. मुस्कानची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिला ‘गीत-हुई सबसे पराई’मध्ये गुरमीत चौधरीसोबत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या शोमध्ये तिची गुरमीतसोबतची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. दृष्टीने ‘मधुबाला – एक इश्क एक जुनून’ मधून पुन्हा जादू निर्माण केली. त्यानंतर तिचे नाव विवियन डिसेनासोबत जोडले गेले.
जिंकला ‘हा’ रियॅलिटी शो
दृष्टीने डान्सिंग रियॅलिटी शो ‘झलक दिखला जा’चा सहावा सीझन जिंकून इंडस्ट्रीत तिचे नाव आणखीनच प्रसिद्ध केले. तिने तिच्या डान्सच्या कौशल्याने जगभरातील लाखो मने जिंकली. २०१४ मध्ये ती सर्वात मादक आशियाई महिलांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होती आणि यासह ती पुन्हा एकदा आघाडीची भारतीय टीव्ही अभिनेत्री म्हणून शीर्षस्थानी आली.
दृष्टी ‘या’ मोहिमेची होती ब्रँड ॲम्बेसेडर
दृष्टी २०११, २०१३ आणि २०१४ साठी ‘सेव्ह अवर प्लॅनेट’ च्या समर्थनार्थ ‘हिंदुस्तान टिन वर्क्स लिमिटेड’ ने सुरू केलेल्या पर्यावरण सप्ताहाची ब्रँड ॲम्बेसेडर होती. २०१४ मध्ये दृष्टी धामी मॅट्रिक्स इंडियाच्या हेअर कलर ब्रँड ‘सोकलर’ची ब्रँड ॲम्बेसेडर देखील बनली.
बॉयफ्रेंडसोबत केले लग्न
दृष्टी धामीने २०१५ मध्ये तिचा बॉयफ्रेंड नीरज खेमकासोबत लग्न केले. अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी सात फेरे घेतले. दृष्टी एक प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री आहे, तर तिचा पती नीरजचा टीव्ही इंडस्ट्रीशी काहीही संबंध नाही.
शेवटची दिसली ‘या’ शोमध्ये
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर दृष्टी शेवटची वेब सीरिज ‘द एम्पायर’ मध्ये दिसली होती. ज्यामध्ये तिने खानजादाची भूमिका केली होती. याशिवाय ती ‘एक था राजा एक थी रानी’, ‘सिलसिला बदलते रिश्तों का’ सारख्या टीव्ही शोमध्येही दिसली आहे.
कोरोनाच्या विळख्यात सापडली दृष्टी
दृष्टी धामीला नुकतीच कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिने याबाबत माहिती दिली. या पोस्टनंतर करण ग्रोव्हर, अरिजित तनेजा, डिनो मोरिया या सेलिब्रिटींनी दृष्टीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
हेही वाचा :