Wednesday, July 3, 2024

BIRTHDAY SPECIAL चंदन पावडरच्या जाहिरातीतून ‘मॅडी’ने केली करिअरची सुरुवात; आज आहे तब्बल १०० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी ते हिंदीसिनेसृष्टी असा प्रवास करणारा सकस आणि दमदार अभिनेता म्हणजे आर माधवन. माधवनने त्याच्या अभिनयाच्या जोरावर देशासह संपूर्ण जगात त्याने त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोजक्याच मात्र कायम स्मरणात राहणाऱ्या अशा भूमिकांमधून माधवनने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

‘रहना है तेरे दिल में’ मधल्या ‘मॅडी’ पासून ते ‘३ इडियट्स’मधल्या ‘फरहान कुरेशी’ पर्यंत माधवच्या प्रत्येक भूमिकेने रसिकांची वाहवा मिळवली. माधवन या ग्लॅमरस क्षेत्रात निव्वळ योगायोगाने आला आहे. वयाच्या ५० वर्षी देखील त्याने स्वतःला अतिशय फिट आणि हेल्दी ठेवले आहे. आज माधवन त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच निमित्ताने जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी.

माधवनचा जन्म १ जून, १९७० रोजी झारखंडमधील जमशेदपूर येथे तमिळ कुटुंबात झाला. त्याचे पूर्ण नाव रंगनाथन माधवन असे आहे. त्याला रंगनाथन हे त्याच्या वडिलांचे नाव आहे. मात्र, त्याचे चाहते त्याला विविध नावांनी संबोधतात. त्यात ‘मॅडी’, ‘मॅडी भाई’, ‘मॅडी पाजी’, ‘मॅडी भाईजान’, ‘मॅडी सर’, ‘मॅडी चेट्टा’, ‘मॅडी अण्णा’ आदी अनेक नावांचा समावेश आहे.

माधवचे शालेय शिक्षण जमशेदपूर इथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी माधवन महाराष्ट्रात आला. त्याने त्याचे महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरमधून पूर्ण केले. कोल्हापूरमधील राजाराम कॉलेजमध्ये त्याने इलेक्ट्रॉनिक्समधून पदवी संपादन केली. शिवाय त्याने कल्चरल एंबेसेडर म्हणून देखील कॅनडामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. पुढे काही काळ माधवनने कोल्हापूरमध्येच प्रोफेसर म्हणूनही काम केले.

प्रोफेशनल पब्लिक स्पीकर म्हणून माधवनने १९९२ साली जपानमधील टोकियोत यंग बिझनेसमॅन कॉन्फरन्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. माधवनला भारतीय सेनेत सामिल होण्याची तीव्र इच्छा होती. परंतु त्याने इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतली आणि त्यानंतर देशभरात टेक कम्यूनिकेशन आणि पब्लिक स्पीकिंग शिकवण्याचे काही काळ काम केले.

माधवन एनसीसीचा बेस्ट कॅडेट होता. त्याला महाराष्ट्रतील सर्वोत्कृष्ट NCC Cadet म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. एनसीसी कॅडेट म्हणून त्याला इंग्लंडला जाण्याचीही संधी मिळाली होती. तिथे त्याला ब्रिटिश आर्मी, रॉयल नेव्ही आणि रॉयल एयरफोर्सचं प्रशिक्षणही देण्यात आले.

सन १९९६ मध्ये माधवनने त्याचा पोर्टफोलियो एका मॉडेलिंग एजन्सीमध्ये दिला होता. त्याच्या आकर्षक आणि चांगल्या व्यक्तिमत्वामुळे त्याला जाहिरातींच्या ऑफर्स मिळू लागल्या. माधवनने त्याच्या करियरची सुरुवात एका चंदन पावडरच्या जाहिरातीपासून केली. पुढे त्याने ‘बनेगी अपनी बात’, ‘साया’, ‘घर जमाई’, ‘सी हॉक्स’, ‘तोल मोल के बोल’, ‘घर जमाई’ यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम सुद्धा काम केले. त्याला खरी ओळख मणिरत्नमच्या ‘ईरुवर’ या तामिळ चित्रपटामुळे मिळाली. मात्र, या सिनेमासाठी मणिरत्नम यांनी माधवनला सुरुवातीला रिजेक्ट केले होते. पुढे त्याने मणिरत्नमच्या अनेक सिनेमांमध्ये काम केले.

माधवनने ‘इस रात की सुबह नहीं’ या सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत हिंदी सिनेमात पदार्पण केले. मात्र, त्याला हिंदी सिनेसृष्टीमध्ये खरी ओळख मिळाली ती ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातील ‘मॅडी’ या भूमिकेने त्याला एका रात्रीत स्टार केले. त्याचे अभिनयात असलेले निरागसता सर्वच प्रेक्षकांना खूपच भावली. या चित्रपटाची गाणी देखील तुफान गाजली.

त्यानंतर त्याने अनेक मोठ्या आणि गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले. तो राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या ‘रंग दे बसंती’, राजकुमार हिरानी यांच्या ‘३ इडियट्स’ आनंद एल राय यांच्या ‘तनू वेड्स मनू’ आणि ‘तनू वेड्स मनू २’ मध्ये देखील झळकला. या कमर्शियल चित्रपटांसोबतच त्याने ‘देल्ही हाइट्स’, ‘आर्या’, ‘मुंबई मेरी जान’, ‘सिंकदर अशा पठडीबाहेरील सिनेमांमध्ये देखील काम केले.

माधवनच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले, तर त्याने सरिता बिर्जेसोबत लग्न केले आहे. एका पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासमध्ये सरिता आणि माधवन यांची ओळख झाली. क्लासमध्ये माधवन सरिताचा मेंटॉर होता. दोघांनी एकमेकांना जवळपास ८ वर्ष डेट केले त्यानंतर १९९९ मध्ये दोघांनी लग्न केले. माधवन आणि सरिता यांना वेदांत नावाचा मुलगा आहे.

माधवनला त्याच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहेत. त्यात चार फिल्मफेयर साऊथ आणि तामिळनाडू स्टेट पुरस्कारांचा देखील समावेश आहे. माधवन अभिनयासोबतच अनेक सामाजिक कार्यांसाठी देखील ओळखला जातो. साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार असलेल्या माधवनने बॉलिवूडमध्ये देखील मोठे नाव कमावले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, आर माधवनची संपत्ती एकूण १०३ कोटी रुपयांच्या आसपास आहे. यासोबतच त्याच्याकडे मुंबईत आलिशान अपार्टमेंटही आहे. याचे फोटोही त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये फर्नीचर, आकर्षक लायटिंगचा समावेश आहे.

माधवनने नुकतेच दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे, त्याचा पहिला दिग्दर्शित सिनेमा ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’ पूर्ण झाला असून, प्रदर्शनासाठी सज्ज आहे. हा सिनेमा प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि एयरोस्पेस इंजीनियर एस. नांबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित असून यात माधवनने नंबी नारायणन ही मुख्य भूमिका निभावली आहे.  हा सिनेमा हिंदीसोबतच तेलुगु, मल्याळम, तमिळ, इंग्लिश, कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा