आज आहे ‘कलरफुल’ अभिनेत्रीचा ‘झकास’ वाढदिवस, वाचा पूजा सावंतचा हटके सिनेप्रवास


मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची आणि ग्लॅमरस नायिका म्हणून पूजा सावंत ओळखली जाते. आज पूजा तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. पूजाने तिच्या अभिनयाने आणि नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. पूजाचे खळखळणारे हसू अनेकांना घायाळ करते. पूजाने तिच्या प्रभावी अभिनयाने मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीमधे तीचे स्थान पक्के केले आहे. आज पूजाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्या या क्षेत्रातल्या प्रवासाबद्दल.

२५ जानेवारी १९९० ला मुंबईमध्ये पूजाचा जन्म झाला. पूजाने तिचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिरमधून पूर्ण केले. त्यानंतर तिने पदवीचे शिक्षण SIWS सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमधून पूर्ण केले. पूजाने तिच्या शाळा आणि कॉलेजच्या दिवसांमध्ये अनेक डान्स स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. कॉलेजमध्ये असतानाच तिने २००८ साली महाराष्ट्र टाइम्स आयोजित ‘श्रावणक्वीन’ या सौंदर्यस्पर्धेत भाग घेतला. पूजाने तिच्या सौंदर्य आणि बुद्धिमतेच्या जोरावर ही स्पर्धा जिंकली. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टींमध्ये अभिनय करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.तेव्हा तिला २०१० साली आलेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमात सहायक भूमिका मिळाली. तिला खरी ओळख २०११ साली आलेल्या ‘झकास’ या सिनेमातून मिळाली. या चित्रपटात तिने अंकुश चौधरी, सई ताह्मणकर, अमृता खानविलकर अशा हिट कलाकारांसोबत काम केले. हा सिनेमा २०११ चा सर्वात हिट सिनेमा बनला आणि पूजाला महाराष्ट्रात एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली.त्यानंतर तिची अभिनयाची गाडी सुसाट धावायला लागली. तिने एकामागोमाग अनेक हिट सिनेमे दिले. त्यात सतरंगी रे, पोश्टर बॉईज, नीलकंठ मास्टर, दगडी चाळ, वृंदावन, भेटली तू पुन्हा आदी चित्रपटांचा समावेश आहे.पूजाला २०१७ साली आलेल्या ‘लपाछपी’ चित्रपटातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार देण्यात आला. २०१८ साली पूजाची महाराष्ट्राची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून निवड देखील करण्यात आली होती. यासोबतच पूजाने टेलिव्हिजनवर देखील अनेक रियालिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे पूजा अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असणाऱ्या ‘बुगी उगी’ या कार्यक्रमात देखील स्पर्धक म्हणून आली होती.पूजाने २०१९ साली विद्युत जमवलं सोबत ‘जंगली’ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टींमध्ये पदार्पण केले. या सिनेमात तिने ‘शंकरा’ ही महिला माहुताची भूमिका साकारली होती. पूजाच्या या वेगळ्या आणि चांगल्या भूमिकेचे सर्वच प्रेक्षकांनी खूप कौतुक केले.पूजाचे वडील विलास सावंत देखील याच क्षेत्रात असून त्यांनी अनेक लोकप्रिय आणि प्रसिद्ध मालिकांची निर्माती केली आहे. त्यांची झी मराठीवरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका खूप गाजली.

सध्या पूजा सोनी मराठीवरील महाराष्ट्राज बेस्ट डान्सर या डान्स रियालिटी शोची जज म्हणून आपल्याला दिसते. आगामी काळात पूजा अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला दिसणार आहे. अशा या कलरफुल अभिनेत्रीला दैनिक बोंबाबोंम कडूनही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


Leave A Reply

Your email address will not be published.