कॉपी-रायटरची नोकरी ते बॉलिवूड स्टार, तर असा होता ‘बेफिक्रे’ स्टार रणवीर सिंगचा सिनेप्रवास


हिंदी सिनेसृष्टीतील एनर्जीचे फुल्ल ऑन पॅकेज असणारा अभिनेता म्हणजे रणवीर सिंग. रणवीर हा बॉलिवूडमधील सध्याच्या सर्वात आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याने खूपच कमी काळात मेहनतीच्या जोरावर बॉलिवूड स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. सुपर एनर्जी, गुड लुक्स, उत्तम अभिनय, उत्तम डान्स आदी अनेक गोष्टींमुळे रणवीर ओळखला जातो. यासोबतच तो त्याच्या हटके, अतरंगी आणि विचित्र ड्रेसिंग स्टाईलसाठी देखील तितकाच प्रसिद्ध आहे. याच रणवीर सिंगचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही महत्वाच्या गोष्टी.

रणवीरचा जन्म ०६ जुलै १९८५ साली मुंबईत एका हिंदू सिंधी परिवारात झाला. त्याचे संपूर्ण बालपण मुंबईतच गेले. त्याचे पूर्ण नाव रणवीर सिंग भवनानी असे असून, भवनानी कुटुंब मूळचे कराची इथले. मात्र फाळणीनंतर ते भारतात येउन मुंबईत स्थायिक झाले. रणवीर लहान असताना तो त्याच्या आजीसोबत एका वाढदिवसाच्या पार्टीमध्ये गेला होता. तिथे त्याच्या आजीने त्याला सांगितले की, माझे मनोरंजन कर. त्यानंतर रणवीरने लगेचच अमिताभ बच्चन यांच्या ‘चुम्मा चुम्मा’ गाण्यावर जोरदार डान्स केला. त्यानंतर त्याला त्याचा रस अभिनय आणि डान्समध्ये असल्याचे जाणवले. मात्र मोठे झाल्यावर त्याला जाणवले की या क्षेत्रात येणे इतके सोपे नाही.

रणवीरचे लिखाण सुरुवातीपासूनच चांगले असल्याने त्याने त्याच्या लिखाणावर लक्ष केंद्रित करायचे ठरवले. पुढे कलाशाखेत पदवी मिळवण्यासाठी तो अमेरिकेत गेला. शिक्षण पूर्ण करून तो २००७ साली पुन्हा भारतात आला आणि बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करण्यापूर्वी, त्याने एका प्रसिद्ध जाहिरात कंपनीत कॉपी-रायटरची नोकरी सुरु केली. पुढे त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून देखील काम केले. मात्र अभिनय करण्याची त्याची इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो अनेक ठिकाणी ऑडिशन द्यायला जायचा, मात्र कुठूनही त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. एक दिवस अचानक त्याला यशराजकडून ऑडिशनसाठी बोलवले आणि त्याने त्याच्या अभिनयाच्या आणि प्रतिभेच्या जोरावर सर्वांचे मन जिंकले आणि भूमिका मिळवली. ही भूमिका होती ‘बँड बाजा बारात’ सिनेमातील नायकाची म्हणजेच बिट्टू शर्माची. हा सिनेमा सुपर हिट झाला आणि रणवीरची अभिनयाची गाडी सुसाट पळू लागली. पहिल्याच सिनेमासाठी त्याने पदार्पणाच्या फिल्मफेयर पुरस्कार देखील पटकावला.

रणवीरने केवळ १० वर्षांमध्ये त्याचे अबाधित स्थान या क्षेत्रात निर्माण केले. त्याने त्याच्या १० वर्षांच्या करियरमध्ये जवळपास १६ सिनेमे केले असून त्याचे ४ सिनेमे लवकरच प्रदर्शित होणार आहे. रणवीरने याच्या करियरमध्ये अनेक दमदार आणि अविस्मरणीय अशा भूमिका साकारल्या आहेत. ज्यात बाजीराव पेशवे (बाजीराव मस्तानी), नंदू (लुटेरा), राम (रामलीला), अलाउद्दीन खिलजी (पद्मावत), सिम्बा (सिम्बा), मुराद अहमद (गल्ली बॉय) आदी भूमिकांचा समावेश आहे.

या क्षेत्रात येण्याआधी रणवीरला त्याचे नाव बदलण्याचा सल्ला अनेकांनी दिला. कारण त्याचे नाव आणि रणबीरचे नाव यांच्यात खूप साधर्म्य आहे. मात्र त्याने असे केले नाही आणि स्वतःच्या खऱ्या नावानेच त्याची ओळख तयार केली. रणवीरने अनेक असे हिट सिनेमे दिले आहेत, जे रणबीर कपूरने नाकारले होते. यात ‘बँड बाजा बारात’, ‘रामलीला’, ‘बेफिक्रे’, ‘गल्ली बॉय’ आदी सिनेमांचा समावेश आहे.

रणवीरबाबतचा त्याच्या शालेय जीवनातील एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. शालेय जीवनात त्याला क्रिकेट खेळण्याची खूपच आवड होती आणि तो ‘गिल्स शिल्ड’ खेळण्यासाठी खुपच उत्सुक होता. एकदा तो त्याच्या सरावासाठी उशिरा पोहोचला होता, त्यामुळे प्रसिद्ध क्रिकेटर मोहिंदर अमरनाथ यांनी त्याला कोचिंग देण्यास नकार दिला होता.

बऱ्याच लोकांना रणवीर हा आउटसाईडर वाटतो. मात्र कमी लोकांना माहित असेल की, रणवीर हा प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूरचा भाऊ आहे. रणवीर सोनम आणि रिया यांचा मामेभाऊ आहे. मात्र असे असूनही त्याला या क्षेत्रात येण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला.

२०१८ साली रणवीरने दीपिका पदुकोणसोबत लग्न करत सर्वाना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. या दोघांची लव्हस्टोरी इंडस्ट्रीसोबतच फॅन्समध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. दीपिकाशी लग्न करण्याआधी रणवीरचे नाव हेमा मालिनी धर्मेंद्र यांची मुलगी अहाना देओल, अनुष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा, परिणीती चोप्रा आदी अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे.

आज रणवीर चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. एका रिपोर्टनुसार रणवीरची संपत्ती ३० मिलियन डॉलर म्हणजेच २२३ कोटी इतकी आहे. रणवीर महिन्याला २ कोटी आणि वर्षाला २१ कोटींपेक्षा जास्त कमवतो. तो एका चित्रपटासाठी २० कोटी रुपये घेतो. यासोबतच तो जाहिरातींमधून देखील बक्कळ पैसे कमवतो. एका माहितीनुसार त्याच्याकडे १००० शुजचे जोड आहेत, ज्यांची किंमत ६८ लाख इतकी आहे.

रणवीरला महागड्या आणि मोठ्या गाड्यांची खूप हौस आहे. त्याच्याकडे Aston Martin Rapid S, Mercedes Benz GLS, Jaguar XJ L, Lamborghini Urus, Ferrari यांसारख्या आलिशान गाड्या आहेत ज्यांची ऐकून १४ कोटी इतकी आहे. आगामी काळात रनवीर ‘८३’, ‘सर्कस’, ‘जयेशभाई जोरदार’, ‘सूर्यवंशी’ आदी चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.