या क्षेत्रात जवळपास सर्वच कलाकार त्यांच्या अभिनयात काम करण्याचे उद्देश समोर ठेऊन मुंबईत आले आणि मोठा संघर्ष करून त्यांनी या ग्लॅमर जगात स्वतःचे नाव आणि जागा कमावली आहे. आपल्याला नेहमीच कलाकारांबद्दल आणि त्यांच्या मानधनाबद्दल खूप अप्रूप वाटते. मात्र, जेव्हा आपण त्यांचा सिनेमासाठी आणि या क्षेत्रात येण्यासाठीचा त्यांचा संघर्ष बघू, तेव्हा आपल्याला त्यांना मिळणारे पैसे कवडीमोलच वाटतील. या क्षेत्रात येणारे कलाकार त्यांचा सुरुवातीचा काळ संघर्षात व्यतीत करत, मेहनतीने आणि चिकाटीने इंडस्ट्रीमध्ये यशस्वी होतात. आता अभिनेता रवी किशनचेच बघा ना. फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आलेल्या या अभिनेत्याने शून्यातून त्याचे अस्तिव निर्माण केले असून, आज तो हिंदी, साऊथ, भोजपुरी चित्रपटांमध्ये टॉपच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. दि. १७ जुलै रवी किशन याचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.

रवी किशनचा जन्म १७ जुलै, १९६९ रोजी मुंबईत झाला. त्याच्या वडिलांचा डेअरीचा व्यवसाय होता. त्याचे बालपण अतिशय हलाखीत गेले. वडिलांचा व्यवसाय डबघाईला आला आणि त्यांनी त्यांचे मुंबईतले बस्तान हलवले. ते पुन्हा जौनपूरला परत गेले. रवी किशनला लहानपणापासूनच चित्रपट आणि अभिनयाबद्दल खूपच आकर्षण होते. मात्र, त्याच्या वडिलांना त्याची ही आवड अजिबात मान्य नव्हती. ते सतत रवीला अभिनयापासून दूर करायचे. याच अभिनयासाठी त्याने अनेकदा वडिलांचा मारसुद्धा खाल्ला, पण त्याच्या आईने त्यांची ही आवड समजून घेतली आणि वयाच्या १७व्या वर्षी तो आईकडून ५०० रुपये घेऊन मुंबई आला.
अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने रवी एवढा प्रेरित झाला होता की, त्याने रामायणात सीताची भूमिका देखील केली. तो अमिताभ यांचे सर्वच सिनेमे पाहायचा. मुंबईला आल्यावर त्याचा संघर्ष सुरु झाला. अनेकदा रवी पैसे वाचवण्यासाठी पायीपायी फिरून लोकांच्या भेटी घ्यायचा. कधी उपाशी पोटी झोपायचा, तर कधी वडापाव खाऊन झोपायचा. अनेक प्रयत्न आणि मेहनत करून त्याने १९९२ साली ‘पितांबर’ या बी ग्रेड सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. यानंतरही त्याचा संघर्ष तसाच चालू होता. काही वर्षांनी रवी किशनला सलमान खानच्या ‘तेरे नाम’ सिनेमात काम करायची संधी मिळाली आणि त्याचे नशीब चमकले. या सिनेमात त्याने भूमिका चावलाच्या होणाऱ्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. त्याचा हा सिनेमा आणि त्याची भूमिका तुफान गाजली. सोबतच यशाने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला. या सिनेमाने त्याच्या आयुष्याला एक चांगले वळण दिले. यानंतर त्याने ‘मुक्ति’, ‘शेयर बाजार’, ‘अग्नि मोर्चा’ आदी चित्रपटांमध्ये काम केले.
आज असा एकही व्यक्ती सापडणार नाही, ज्याला रवी किशन हे नाव माहित नाही. त्याने त्याच्या अभिनयाने हिंदी, साऊथ आणि भोजपुरीमध्ये मोठे स्थान प्राप्त केले आहे. भोजपुरीमध्ये तर त्याला भोजपुरी अमिताभ ही उपाधी देण्यात आली आहे. हिंदीमध्ये सहायक मात्र महत्वाच्या भूमिका, साऊथमध्ये खलनायक साकारणारा रवी भोजपुरीमधला नंबर १ स्टार आहे.
जिथे मुंबईमध्ये तो चाळीत राहायचा, आज त्याच मुंबईत त्याने गोरेगावमध्ये एका बिल्डिंगच्या १४व्या मजल्यावर स्वत: चे घर घेतले आहे. हे घर त्याने दोन डुप्लेक्स एक करून बनवले आहे. त्याच्या या घराचा आकार ८ हजार स्क्वेयर फूट एवढा असून यात १२ बेडरूम, दुप्पट उंचीचे छत असणारे टेरेस, जिम आदी अनेक गोष्टी आहेत. रवीच्या या संघर्षाच्या प्रवासात त्याची पत्नीने रिवाने त्याची पूर्ण साथ दिली.
रवीने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “मी आज फक्त माझ्या वडिलांमुळे इथे आहे. जर त्यांनी मला मारले नसते, तर आज मी पुरुष वैश्या बनलो असतो. मला सकाळी लवकर उठण्यापासून रात्री लवकर झोपण्यापर्यंतच्या सर्व चांगल्या सवयी माझ्या वडिलांनी लावल्या. ते पुरोहित असल्यामुळेच माझ्या मनात देवाबद्दल श्रद्धा जागृत झाली. मी आज शंकराचा कट्टर भक्त आहे. मी संघर्षाच्या काळात अनेक वाईट अनुभव घेतले, मात्र माझा तोल कधीही ढासळू दिला नाही.”

रवी किशन यांना ‘तेरे नाम’साठी सर्वोत्कृष सहायक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, तर त्याला त्याच्या ‘कब होई गवनवा हमार’ या भोजपुरी सिनेमासाठी देखील राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. भोजपुरी आणि हिंदीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला तो एकमेव अभिनेता आहे.
त्याच्याकडे आजच्या सुमारास १८ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. शिवाय त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, बीएमडब्लू, जग्वार आदींसारख्या आलिशान गाड्या आणि हर्ले डेविडसन सारखी महाग बाइक देखील आहे. सध्या रवी किशन अभिनयासोबतच राजकारणात देखील सक्रिय असून, ते भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले आहे.