बॉलिवूडच्या एवढ्या मोठ्या शतकीय इतिहासात आपण डोकावले तर आपल्या लक्षात येईल अनेक अभिनेत्यांनी ऍक्शन हिरो म्हणून त्यांची प्रतिमा तयार केली. अनेक ऍक्शन सिनेमे आणि त्यात असणाऱ्या जबदस्त ऍक्शनमुळे अभिनेत्यांना लोकांनी ऍक्शन हिरो नाव दिले. या ऍक्शन हिरोंमध्ये अनेक कलाकारांची नावे सामील आहेत, मात्र यात एक नाव सर्वात वर आणि मोठे झाले ते नाव म्हणजे सनी देओल. बॉलिवूडमध्ये 80-90 चा काळ सनी देओलने तुफान गाजवला. ‘ये ढाई किलो का हाथ जब किसी पे पड़ता है न, तो आदमी उठता नहीं उठ जाता है’ या आणि अशा अनेक दमदार संवादामुळे त्याने अनेकांच्या मनावर राज्य केले. आज (19 ऑक्टोबर) सनी त्याचा 66 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.
सनी देओलचा जन्म 19 ऑक्टोबर 1965 रोजी पंजाबमध्ये झाला. त्याचे खरे नाव अजय सिंग देओल असले तरी त्याला सनी देओल नावानेच ओळखले जाते. धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या घरी सनीचा जन्म झाला. सनीला बॉबी देओल हा भाऊ, विजेता आणि अजिता या दोन सख्ख्या बहिणी तर ईशा, अहाना देओल या दोन सावत्र बहिणी आहेत.
सनीला अभिनयच वारसा त्याच्या वडिलांकडून मिळाला. सुरुवातीपासूनच त्याचा अभिनयाकडे कल होता. 1983 साली त्याने ‘बेताब’ या रोमँटिक सिनेमातून अमृता सिंगसोबत काम करत मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. हा सिनेमा सुपरहिट झाला. सोबतच त्याचे या सिनेमातील अभिनयासाठी खूप कौतुक झाले. त्याला पदार्पणासाठी फिल्मफेयरचे नामांकन मिळाले. सनी पहिल्या सिनेमातून जेवढा लोकप्रिय झाला, त्यापेक्षा अधिक लोकप्रियता त्याला 1985 साली आलेल्या ‘अर्जुन’ सिनेमाने दिली. 90 च्या दशकापर्यंत सनीने बॉलिवू़डमध्ये स्वतःचे अबाधित स्थान निर्माण केले. 1990 साल सणासाठी खूप मोठे आणि महत्वाचे ठरले. यावर्षी त्याचा ‘घायल’ सिनेमा आला. हा चित्रपट खूप हिट झाला आणि त्याला या सिनेमासाठी फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुस्काराने सन्मानित करण्यात आले.
सनीबद्दल अनेक किस्से आणि अनेक गोष्टी प्रचलित आहेत. सनी नेहमीच त्याच्या रंगासाठी ओळखला गेला. असाच एक किस्सा यशराजचा 1993 साली आलेला सुपरहिट ‘डर’ सिनेमावेळी घडला आहे. या सिनेमात शाहरुख खान, जुही चावला आणि सनी देओल मुख्य भूमिकेत होते. शाहरुख जरी नकारात्मक भूमिकेत झळकला असला, तरी तोच या सिनेमात भाव खाऊन गेला. सनीला या चित्रपटाचा क्लायमॅक्सचा सीन अजिबात पटला नाही. मात्र तो शांत राहिला आणि त्याने एक मोठा निर्णय घेतला. हा निर्णय होता की, इथून पुढे कधीही दोन अभिनेते असलेल्या सिनेमात काम करणार नाही.
मात्र तरीही त्याला साजिद नाडियाडवाला यांनी एक स्क्रिप्ट ऐकवली. ही स्क्रिप्ट ऐकून सनी खुश झाला मात्र या चित्रपटात अजून एक अभिनेता काम करणार होता. एक अभिनेत्री आणि दोन अभिनेते अशी या चित्रपटाची कहाणी होती. या सिनेमातील एक भूमिका सनीला आणि दुसरी सलमानला ऑफर करण्यात आली. मात्र तेव्हा सलमान ‘करण अर्जुन’मध्ये व्यस्त होता. तरीही त्याने कहाणी ऐकली आणि या चित्रपटासाठी नकार दिला. कारण महत्वाचा रोल हा सनीला देण्यात आला होता. तरीही साजिदने सलमानला या भूमिकेसाठी तयार केले. तर करिश्मा कपूरने या चित्रपटात मुख्य अभिनेत्रीची भूमिका निभावली होती. हा चित्रपट होता ‘जीत.’ त्या वर्षीचा सर्वात हिट आणि लोकप्रिय सिनेमांपैकी हा एक सिनेमा ठरला.
सनीने त्याच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले, मात्र ‘गदर’ या चित्रपटाने लोकप्रयतेचा एक वेगळाच इतिहास रचला. या चित्रपटातील सनीचा अवतार, त्याचे दमदार संवाद, त्याची व्यक्तिरेखा तुफान भाव खाऊन गेली. आजही या सिनेमाला लोकं आवडीने बघतात. आजही सिनेमातील संवाद सर्वांच्या लक्षात आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या पुढच्या भागाची घोषणा केली गेली. या सिनेमाने जी लोकप्रियता सनीला मिळवून दिली कदाचित ती त्याला मिळाली नसती. कारण ही भूमिका आधी गोविंदाला ऑफर करण्यात आली होती, गोविंदाने नकार दिल्यानंतर सिनेमा सनीकडे गेला आणि त्याने या संधीचे सोने केले.
सनी चित्रपटांमध्ये जेवढा रागीट, दमदार ऍक्शन, अनेक गुंडांचा सामना एकटा करताना दिसतो. असाच तो त्याच्या खऱ्या आयुष्यात आहे. बॉबी देओलने कपिल शर्मामध्ये एक किस्सा सांगितलं होता. किस्सा असा होता की, एकदा सनी त्याच्या मित्रांसोबत पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गेला होता. तिथे काही नशेत असलेल्या लोकांनी त्यांच्यासोबत मारहाण सुरु केली. तेव्हा एकट्या सनीने त्या सर्व गुंडांचा सामना केला. त्याचा कोणताही मित्र कारमधून बाहेर आला नाही. त्याने सर्व गुंडांना प्रचंड मारहाण केली होती.
सनीने पूजा नावाच्या मुलीसोबत लग्न केले. सनीला त्याचे वैयक्तिक आयुष्य मीडियासमोर आणायला अजिबात आवडत नाही. त्याला करण आणि राजवीर ही दोन मुलं आहेत. करणने बॉलिवूडमध्ये पादर्पण केले आहे, तर राजवीर करणार असल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वीच सनीने राजकारणात प्रवेश केला आहे. तो भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत तो खासदार झाला आहे.
सनी देओलच्या संपत्ती विषयी बोलायचे झाले तर तो जवळजवळ 365 कोटींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. एका चित्रपटासाठी तो 8-10 कोटी रुपये मानधन घेतो. सनी त्याच्या चित्रपटांसोबतच, जाहिराती आणि त्याचे ‘विजेता प्रोडक्शन हाऊस’मधून कमाई करतो. सनी देओल मुंबईतील जुहूमध्ये आलिशान बंगल्यात राहतो, तर त्याचे यूकेतसुद्धा एक घर आहे, जिथे त्याने अनेक सिनेमांचे शूटिंग केले आहे. या व्यतिरिक्त त्याच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. ज्यात पोर्शे, ऑडी ए8 आणि रेंज रोवरसारख्या गाड्यांचा समावेश आहे.
हेही नक्की वाचा-
–‘या’ कारणामुळे लोक नर्गिस फाखरीला म्हणायचे ‘प्रेग्नेंट’; अभिनेत्रीने केला हैराण करणारा खुलासा
–‘तुमचे पैसे कधीही…’ ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; लोक म्हणाले, ‘तू खरंच…’