घरी डिनरसाठी आलेल्या मैत्रीणीच्याच प्रेमात पडला होता आयुष्मान, पुढे तिच्याशी लग्न करत थाटला सुखी संसार


बॉलिवूडचा अतिशय उत्कृष्ट अभिनेता म्हणून आयुष्मान खुराणाकडे पाहिले जाते. तो त्याच्या जिवंत आणि प्रभावी अभिनयाने चित्रपटाला चारचाँद लावतो. पठडीबाहेरील सिनेमे करण्यात आयुष्मानचा हातखंडा आहे. अशा या अष्टपैलू अभिनेत्याच्या पत्नीचा ताहिरा काश्यपचा नुकताच ३६वा वाढदिवस झाला. ताहिरा ही उत्तम लेखिका आणि दिग्दर्शिका आहे. आज ताहिराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण जाणून घेणार आहोत आयुष्मान आणि ताहिरा यांची लव्हस्टोरी.

ताहिरा आणि आयुष्मान यांची ओळख त्यांच्या शालेय जीवनातच झाली. या दोघांचेही कुटुंब एकमेकांना आधीपासूनच ओळखत होते. ताहिरा १६ वर्षांची असताना आयुष्मान आणि तिची पहिली भेट झाली होती. वयाच्या सोळाव्या वर्षीच आयुष्मान ताहिराच्या प्रेमात पडला. हे दोघेही एकाच शाळेत होतो.

आयुष्मान अकरावीत शिकत असताना ताहिरा बारावीत शिकत होती. कोचिंग क्लासेसला देखील हे दोघं एकत्र जायचे. आयुष्मानचे वडील ज्योतिषी होते, त्यांची आणि ताहिराच्या वडिलांची राजन कश्यप यांची चांगली ओळख होती. एक दिवस ताहिराचे कुटुंब आयुष्मानकडे जेवायला आले, त्यानंतर ताहिरा आणि आयुष्मानचे नाते खास तयार झाले.

शालेय जीवनातील आयुष्मान आणि ताहिराची प्रेमकथा कॉलेज आणि थिएटरच्या दिवसांमध्ये सुद्धा सुरु होती. आयुष्मान आणि ताहिरा चंडीगडमध्ये एकत्र थिएटर करायचे. या दोघांनी बराच वेळ एकमेकांना डेट केले आणि मग एक दिवस आयुष्मानने ताहिराला लग्नाची मागणी घातली. दोन्ही परिवारात कौटुंबिक संबंध असल्याने या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध झाला नाही.

या दोघांनी १२ वर्षांच्या मैत्रीनंतर २०११ मध्ये लग्न केले. ताहिरा आयुष्मानसाठी खूप लकी ठरली. लग्नानंतर आयुष्मानच्या बॉलिवूडमध्ये यशस्वी करिअरला सुरुवात झाली. ‘विक्की डोनर’ हा आयुष्मानचा पहिलाच बॉलिवूड सिनेमा सुपरहिट ठरला. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.

ताहिराला २०१८ मध्ये पहिल्या स्टेजचा स्तनाचा कर्करोग झाल्याचे समजले. मात्र योग्य उपचारानंतर ती बरी झाली. ताहिराने कर्करोगाचा पराभव करत जोरदार पुनरागमन केले. ती सध्या तिच्या पुढच्या चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहे.

ताहिराला अनोख्या शुभेच्छा देताना आयुष्मानने सोशल मीडियावर एका पोस्ट शेयर केली. त्याने या पोस्टमध्ये लिहिले, ” ही गोष्ट २० वर्ष जुनी आहे, २००१ मधली, रविवारचा दिवस होता आणि मी पहिल्यांदाच तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये आलो होतो. त्यादिवशी पहिल्यांदाच माझ्या वडिलांनी मला त्यांची कार तुझ्या पार्टीत आणायची परवानगी दिली होती. तू त्यादिवशी सर्वांसमोर माझ्या गाडीत बसली. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी होती. त्यादिवशी सर्वांसमोर माझ्या गाडीत बसल्याबद्दल खूप धन्यवाद. मी तुझ्या प्रत्येक कलेसाठी वेडा आहे. तुझी सहानभूती, तुझा सेंस ऑफ ह्यूमर, तुझे लिखाण सर्व. मला माहित आहे की तू सर्वात सुंदर व्यक्ती आहेस. अशा या सुंदर व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.”

 

 


Leave A Reply

Your email address will not be published.