Monday, July 1, 2024

हॅपी बर्थडे उर्मिला: ‘रंगीला गर्ल’ ते राजकीय नेतृत्व; वाचा उर्मिला मातोंडकरचा थक्क करणारा जीवनप्रवास

हिंदी चित्रपटसृष्टीत ‘रंगीला गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री ‘उर्मिला मातोंडकर’ आज आपला ४३ वा वाढदिवस साजरा करत आहे. उर्मिलाचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ रोजी मुंबईत झाला होता. तिने चित्रपटानंतर आपला मोर्चा आता राजकारणाच्या दिशेने वळवला आहे. तिने १ डिसेंबर २०२० रोजी शिवसेनेत प्रवेश करत तिच्या नव्या इंनिंगला सुरुवात केली. तिच्या वाढदिवसानिमित्त आज आपण बालकलाकारापासून सुरु झालेला उर्मिलाचा हा प्रवास जाणून घेणार आहोत.

उर्मिला ही पहिलीच अभिनेत्री नाही जिने राजकारणात प्रवेश केला. याआधी देखील अनेक बॉलीवूड कलाकारांनी अभिनयासोबतच राजकारणातही सहभाग दाखवला काहींचा हा सहभाग यशस्वी झाला तर काहींना अपयश मिळाले. आता उर्मिला राजकारणात अभिनयाइतकीच पुढे जाते की नाही हे तर काळ ठरवेलच. तत्पूर्वी उर्मिलाचा शिवसेनेत प्रवेश हा तिच्या नव्या आयुष्याची नांदी आहे.

उर्मिला यांचा जन्म मुंबईत झाला. मानसशास्त्र हा विषय घेऊन तिने पुण्यातून पदवी संपादन केली. १९८० सालात ‘झाकोळ’ या मराठी चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी १९८१ सालच्या ‘कलयुग’ या चित्रपटातून एन्ट्री घेतली. १९८३ साली आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष लक्षात राहते. मुख्य भूमिका म्हणून उर्मिलाचा पहिला हिंदी सिनेमा म्हणजे १९९१ साली आलेला ‘नरसिम्हा’. पण तिला खरी ओळख मिळाली ती १९९५ च्या राम गोपाळ वर्मा यांच्या ‘रंगीला’ या चित्रपटामुळे.

या सिनेमाने उर्मिलाला ‘रंगीला गर्ल’ ही ओळख दिली. त्यानंतर उर्मिलाने कधीच मागे वळून पाहिले नाही. चमत्कार, चायना गेट, जुदाई, खूबसूरत, सत्या, भूत, पिंजर, कौन, मस्त आदी हे उर्मिलाचे विशेष गाजलेले सिनेमे आहेत. याशिवाय उर्मिलाने मराठी, तामिळ, मल्याळम, तेलगू या प्रादेशिक भाषेतील चित्रपटांमध्ये देखील काम केले. उर्मिलाने काही काळ टीव्हीवर देखील काम केले. ‘झलक दिखला जा’ या डान्स रियालिटी शो च्या दुसऱ्या पर्वात तिने जज म्हणून काम पाहिले होते.

उर्मिलाने २०१६ मध्ये काश्मिरी उद्योगपती आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीर सोबत लग्न केले. अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थित उर्मिलाने आपल्यापेक्षा ९ वर्ष लहान मोहसिनसोबत लग्न करत सर्वाना आश्चर्याचा झटका दिला. मोहसीनने देखील काही मोजक्या सिनेमात काम केले आहे.

तसे पाहिले तर उर्मिलाचा राजकीय प्रवास हा मागच्या वर्षीच सुरु झाला. मार्च २०१९ मध्ये उर्मिलाने काँग्रेस मध्ये प्रवेश केला आणि तिला उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून २०१९ची निवडणूक लढायचाही संधी मिळाली. मात्र भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्याकडून उर्मिलाचा पराभव झाला. त्यानंतर काही कारणांमुळे त्यांनी सप्टेंबर २०१९ ला काँग्रेसला रामराम ठोकला. मागील काही दिवसांपासून उर्मिलाला शिवसेनेकडून विधानपरिषद सदस्य बनवायच्या बातम्यांनी जोर धरला होता. आता अधिकृतरित्या उर्मिलाने उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे.
उर्मिलाच्या या नव्या वाटचालीसाठी दैनिक बोंबाबोंकडूनही उर्मिलाला खूप खूप शुभेच्छा.

हे देखील वाचा