नवीन वर्ष सुरु झाल्यावर अनेक चांगल्या गोष्टी घडत आहेत. २०२० ने अनेक वाईट आठवणी सर्वांना दिल्या. मात्र २०२१ सर्वांसाठी सकारात्मता घेऊन आले आहे. २०२१ च्या पहिल्याच महिन्यात अनेक चांगल्या बातम्या येत आहेत. एकीकडे वरूण, नताशाची लग्नाची तारीख पक्की झाली आहे तर दुसरीकडे अभिनेता हरमन बावेजाची लग्नाची तारीख देखील समोर येत आहे.
हरमन हेल्थ कोच असलेल्या साशा रामचंदानीसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. हरमन आणि साशाने डिसेंबर २०२० मध्ये एका खाजगी समारंभात साखरपुडा केला होता. आता ह्या दोघांच्या लग्नाची तारीख पुढे आली आहे. २१ मार्चला ही दोघे कोलकातामध्ये सात फेरे घेणार असून, हा विवाह सोहळा साखरपुड्यासारखाच खाजगी स्वरूपाचा असणार आहे. जवळच्या ५०/६० लोकांमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत, जवळचे मित्रमैत्रिणी आणि इंडस्ट्रीमधील काही लोक यात आमंत्रित असणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र अजूनपर्यंत पाहुण्यांची यादी समोर आली नाहीये.
हरमनने मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात अचानक साखरपुडा करत सर्वानाच सुखद धक्का दिला. हरमनच्या साखरपुड्याची बातमी त्याची बहीण रोवेनाने सोशल मीडियावर दिली. रोवानाने हरमन आणि साशाचा रोका झाल्यानंतरचा एक फोटो पोस्ट करत तिने लिहिले, ‘साशा रामचंदानी तुझे कुटुंबात स्वागत आहे. तुमच्या लग्नासाठी मी खुप उत्सुक आहे.’
हरमन हा प्रसिद्ध दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा आहे. हॅरी यांनी ‘दिलवाले’, ‘दिलजले’, ‘कर्ज’, ‘मैं ऐसा क्यों हूं’ आणि ‘कयामत’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. हरमनने २००८ साली ‘लव स्टोरी २०५०’ सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या सिनेमात हरमनच्या सोबत प्रियांका चोपडा मुख्य भूमिकेत होती. या सिनेमांनंतर या दोघांच्या अफेयरच्या चर्चा देखील खूप रंगल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आशुतोष गोवारीकरच्या ‘व्हाट्स युअर राशी?’ सिनेमातही सोबत काम केले होते. मात्र हरमनला या इंडस्ट्रीत यश मिळाले नाही. ३/४ चित्रपटांनंतर हरमन चित्रपटांमधून गायब झाला. हरमन ऋतिक रोशन सारखा लूक्स असल्यामुळे देखील खूप बातम्यांमध्ये आला होता.