Friday, March 29, 2024

मुलीच्या चेहऱ्यावर आहेत पुरुषांपेक्षा जास्त केस; पण लाज घेऊन जगण्यापेक्षा, ती जगासमोर बनलीय उदाहरण

जेव्हा स्त्रियांच्या लूक्सचा विचार केला जातो, तेव्हा त्यांच्यासाठी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सौंदर्याचे असे नियम सेट केलेले पाहायला मिळतात, जे पूर्ण न केल्यावर त्यांना लक्ष्य केले जाते. स्त्रीच्या शरीराला एखाद्या वस्तूसारखे वागवणे हे काही नवीन नाही. त्यांच्या फिगरपासून ते फेस कट आणि केसांच्या रंगापर्यंत, ते कसे असावेत, यासाठी प्रत्येक देशात सौंदर्याची वेगवेगळी मानके ठरवलेली आहेत. मात्र, आधुनिक काळात केवळ या विचारसरणीतच बदल होत नाही, तर स्वत: मुलीही सौंदर्याचे हे निश्चित मानक तोडताना दिसत आहेत.

सौंदर्य मानकांना आव्हान देणारी अशीच एक मुलगी हरनाम कौर (Harnaam Kaur) आहे. एकेकाळी आपल्या नको असलेल्या शरीरावरील केसांमुळे प्रचंड ट्रोल झालेली ही मुलगी, अलीकडच्या काळात इतर अनेक मुलींसाठी मोठी प्रेरणा बनली आहे. सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग मिळवण्यापासून ते इंस्पिरेशन स्पीकर बनण्यापर्यंत आणि मासिकाच्या मुखपृष्ठावर येण्यापर्यंत, हरनामने हे सिद्ध केले आहे की जर एखाद्यामध्ये इच्छाशक्ती असेल आणि स्वतःला पूर्णपणे स्वीकारले, तर जगातील कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही. (harnaam kaur hairy beauty who is an inspiration for millions of women)

वयाच्या ११व्या वर्षी सुरू झाले बदल
हरनाम जेव्हा फक्त ११ वर्षांची होती, तेव्हा तिच्या रिपोर्ट्सवरून तिला पीसीओएस (PCOS) असल्याचे समोर आले आणि त्यामुळे तिच्या शरीरात वेगवेगळे बदल दिसू लागले. प्रथम तिच्या चेहऱ्यावर दाट केस येऊ लागले आणि नंतर छाती, पाठ आणि इतर भागांवरही ही गोष्ट दिसू लागली. यामुळे तिला शाळेतच नव्हे, तर वाटेतही लोकांचे टोमणे सहन करावे लागले.

मनात आला जीव देण्याचा विचार
अंगावरील केस, लोकांचे टोमणे, प्रश्न यामुळे हरनाम वैतागली होती. ती १६ वर्षांची होती जेव्हा एका व्यक्तीने तिला इंटरनेटवर जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. यामुळे तिच्यात न्यूनगंडाची भावना निर्माण झाली आणि ती डिप्रेशनमध्ये गेली. लाजिरवाणेपणामुळे तिने घराबाहेर पडणे बंद केले. या सर्व प्रकारामुळे स्वत:चा जीव देण्याचा विचार तिच्या मनात अनेकदा आला होता.

अशी बनली इतरांसाठी प्रेरणा
पुरुषांसारखे केस लपविण्यासाठी हरनाम वॅक्सिंग ते ब्लीचिंगचा अवलंब करत असे. मात्र, हळूहळू तिच्यात निर्माण झालेली न्यूनगंडाची भावना दूर करून ती स्वत:ला स्वीकारू लागला. तिने दाढी लपवण्याऐवजी ती नैसर्गिकरित्या वाढू दिली आणि अशा प्रकारे ती आत्मविश्वासाने सर्वांसमोर जाऊ लागली. लोक तिला प्रश्न विचारायचे आणि तिची टिंगल करायचे, पण या सगळ्यांसमोर लाज वाटून घेणे हरनामने सोडले.

गिनीज बुकमध्ये नोंद
हरनाम ही संपूर्ण चेहऱ्यावर दाढी असलेली पहिली महिला ठरली आणि यासाठी तिचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले. यानंतर भारतीय वंशाची ही ब्रिटीश मुलगी मॉडेलिंग जगतात आल्यापासून शरीर सकारात्मकतेबद्दल बोलणारी व्यक्तिमत्त्व बनली. तिने अनेक मॉडेलिंग प्रोजेक्ट्समध्ये स्थान मिळवले आणि अनेक मासिकांच्या मुखपृष्ठावर तिला स्थान मिळाले.

हेही वाचा-

हे देखील वाचा