Tuesday, January 13, 2026
Home अन्य प्रशासनातून संगीताकडे; IITian ते IAS प्रवास असलेल्या कशिश मित्तलच्या सुरांवर बी-प्राक फिदा

प्रशासनातून संगीताकडे; IITian ते IAS प्रवास असलेल्या कशिश मित्तलच्या सुरांवर बी-प्राक फिदा

भारतात NEET, UPSC आणि JEE Advanced या परीक्षा उत्तीर्ण होणे ही मोठी कामगिरी मानली जाते. यापैकी एक परीक्षा जरी पास झाली, तरी तो व्यक्ती यशाच्या मार्गावर असल्याचे मानले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची ओळख करून देणार आहोत, ज्यांनी IIT JEE आणि UPSC या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करूनही वेगळाच मार्ग निवडला. ही कहाणी आहे माजी IAS अधिकारी आणि गायक कशिश मित्तल यांची आहे.

कशिश मित्तल यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्यापूर्वी IIT JEE मध्ये अखिल भारतीय क्रमांक 6 मिळवत IIT दिल्लीमधून संगणक विज्ञानात बी.टेक पूर्ण केले. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्या IAS अधिकारी झाल्या. मात्र प्रशासकीय सेवेत उज्ज्वल कारकीर्द असूनही, त्यांच्या मनात संगीताची ओढ अधिक होती.

सध्या सोशल मीडियावर कशिश मित्तल यांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या मरून रंगाच्या कुर्त्यात, संपूर्ण तन्मयतेने गाताना दिसत आहेत. त्यांच्या शेजारी प्रसिद्ध गायक बी-प्राक  (B Praak,)बसले असून, डोळे मिटून कशिशचे गायन ऐकत असल्याचे दिसते. कथावाचक इंद्रेश उपाध्यायही तितक्याच भक्तिभावाने हे सादरीकरण अनुभवत आहेत. हे सत्र केवळ गाणे नसून, एक जिवंत जॅमिंग सेशन असल्याचा अनुभव देते.

नोव्हेंबरमध्ये कशिशने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता, जो आता ट्रेंड करत आहे. व्हिडिओवर लाखो व्ह्यूज मिळाले असून, नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. “अद्भुत, अप्रतिम, भावस्पर्शी,” अशा शब्दांत लोकांनी कशिशच्या आवाजाचे कौतुक केले आहे.

1989 मध्ये जालंधर येथे जन्मलेल्या कशिश मित्तल यांचे वडील वरिष्ठ IPS अधिकारी आहेत, तर आई संगीता मित्तल यांनी त्यांना लहानपणापासून संगीताची आवड लावली. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला सुरुवात केली आणि अवघ्या अकराव्या वर्षी हरिवल्लभ संगीत संमेलनसारख्या प्रतिष्ठित मंचावर सादरीकरण केले. त्या आग्रा घराण्याच्या परंपरेत पंडित यशपाल यांच्याकडून प्रशिक्षित आहेत.

IAS अधिकारी म्हणून त्यांनी चंदीगडमध्ये अतिरिक्त उपायुक्त, अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये उपायुक्त आणि नीती आयोगात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. मात्र 2019 मध्ये, नऊ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला. त्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये पाच वर्षे काम करत, मार्च 2025 मध्ये ‘दिशा AI’ या स्टार्टअपची स्थापना केली.आज कशिश मित्तल यांची ओळख केवळ माजी IAS अधिकारी म्हणून नाही, तर संगीत आणि आत्म्याची अभिव्यक्ती जपणारी कलाकार म्हणून होत आहे. त्यांची ही वाटचाल अनेक तरुणांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

दुसऱ्या रविवारी ‘धुरंधर’ची सर्वाधिक कमाई; 350 कोटी क्लबमध्ये एन्ट्री, जाणून घ्या इतर चित्रपटांचे कलेक्शन

हे देखील वाचा