मंडळी अभिनेता कोणताही असो, त्याला हॉलीवूडमध्ये एकदा तरी काम करण्याची इच्छा असतेच. आपणही अनेकदा हॉलिवूडमध्ये काम केलेल्या ऍक्टर्सला जरा जास्तच मान देतो, हे देखील नाकारुन चालणार नाही, बरोबर ना… तर मित्रांनो आपलेही काही भारतीय ऍक्टर्स आहेत, ज्यांनी हॉलिवूडमध्ये काम करताना आपली छाप पाडली आहे. आता असेही काही भारतीय ऍक्टर्स आहेत, जे आगामी हॉलिवूड चित्रपट, सिरिजमधून आपल्याला दिसणार आहेत. या ऍक्टर्सला आपण भारतीय सिनेसृष्टीत गाजताना पाहिले आहे, पण आता ते हॉलिवूडमध्येही आपला प्रभाव टाकण्यास सज्ज आहेत. याच ऍक्टर्सबद्दल आपण जरा जाणून घेऊयात
कोलावरी डी गाणं आठवतंय का? प्रचंड गाजलेल्या या गाण्याने धनुषला मोठी लोकप्रियता मिळवून दिलेली. त्याच्या आवाजातील गाण्याने सर्वांवर जादू केली होती. पण धनूष आहे मुळात एक अभिनेता. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये गाजलेला धनुष आता हॉलिवूडमध्ये दिसणार आहे. तो रुसो ब्रदर्स यांच्या द ग्रे मॅन या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट १५ जुलै रोजी थेअटरमध्ये आणि २२ जुलै रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात रायन गोसलिंग, ख्रिस इवान्स, ऍना द आर्मस, रेगे-जीन पेज, बिली बॉब थोर्टन हे अभिनेतेही असणार आहे. यांच्यासह धनुषचेही नाव प्रमुख कलाकारांमध्ये झळकले आहे. त्यामुळे आता सर्वजण धनुषचे हॉलिवूड चित्रपटातील काम पाहाण्यास उत्सुक आहेत.
आलिया भट, बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे करणारी ही अभिनेत्री आता हॉलिवूडमध्ये काम करण्यास सज्ज आहे. काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सने एक ट्वीट केले होते, ज्यात सांगितलेले की आलिया हार्ट ऑफ स्टोन चित्रपटात गॅल गॅडोट आणि जेमी डोरनन यांच्यासह दिसणार आहे. यावरून आता आलिया हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडण्यास सज्ज असल्याचे दिसत आहे.
गँग्स ऑफ वासेपूर फेम पंकज त्रिपाठीने आत्तापर्यंत आपल्या अभिनयाने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. आता तो हॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करण्यास सज्ज आहे. यापूर्वी पंकज त्रिपाठी ख्रिस हेम्सवर्थ आणि रनदीप हुडा यांच्या एक्सट्रॅक्शनमध्ये छोटी भूमिका निभावल्यानंतर आता अनेक रिपोर्ट्सनुसार एक मोठा हॉलिवूड प्रोजेक्ट करत आहेत. तसेच असे समजत आहे की या हॉलिवूड चित्रपटासाठी पंकज त्रिपाठी यांचे शूट पूर्ण झाले आहे. याशिवाय सुनील शेट्टीही आता हॉलिवूडमध्ये दिसणार आहेत. सुनील शेट्टीने यापूर्वी डोन्ट स्टॉप ड्रिमिंग या चित्रपटातून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले आहे. आता सुनील शेट्टी कॉल सेंटर या हॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो शिख पोलिसाच्या भूमिकेत दिसेल.
हँडसम हिरो हृतिक रोशनने बॉलिवूडमध्ये विविध प्रकारचे चित्रपट केले आहेत. पण आता तो हॉलिवूड चित्रपटात दिसू शकतो. अनेक रिपोर्ट्सनुसार तो एका अमेरिकन स्पाय थ्रिलर चित्रपटात प्रमुख कलाकार असणार आहे. पण आता याबद्दल अधिकृत घोषणा कधी होणार याची वाट पाहावी लागणार आहे.
स्लमडॉग मिलेनियर आणि लायन या चित्रपटांतून आपली छाप पाडलेल्या देव पटेल आता मंकी मॅन या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल टाकत आहे. त्याच्याच चित्रपटात शोभिता धुलिपाला प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सिकंदर खेरपण दिसणार आहे.
इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ: धनुष ते आलिया, हे भारतीय ऍक्टर्स दिसणार हॉलिवूडमध्ये | Indian Actors Will Soon be Seen In Hollywood