×

गौरवशाली इतिहास असलेल्या ताराचंद बडजात्या यांनी ‘राजश्री प्रॉडक्शन’ची सुरुवात करत सांभाळी संस्कारांची शिदोरी

हिंदी सिनेसृष्टीमधे ‘राजश्री प्रॉडक्शन’चा एक वेगळाच दबदबा आणि नाव आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि लोकप्रिय प्रॉडक्शन आणि डिस्ट्रिब्युशन कंपनी असलेल्या राजश्रीने अनेक दर्जेदार आणि आशयसंपन्न सिनेमे आजपर्यंत लोकांना दिले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी ताराचंद बड़जात्या यांनी ‘राजश्री पिक्चर्स’ नावाने या कंपनीची सुरुवात केली. या प्रोडक्शन कंपनीने आतापर्यंत बॉलीवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले. दोस्ती (1964), अंखियों के झरोखे से (1978), नदिया के पार (1982), सारांश (1984), मैंने प्यार किया (1989) हम आपके हैं कौन (1994) आणि हम साथ साथ हैं (1999) आदी अनेक चित्रपटांचा समावेश या यादीत होईल.

ताराचंद बड़जात्या यांनी ‘राजश्री पिक्चर्स’ ही कंपनी सुरु करून हिंदी सिनेसृष्टीमधे जणू काही एक मोठे विश्वच निर्माण केले ज्यात मागील ७५ वर्षणापासून सतत पारिवारिक आणि सामाजिक सिनेमे तयार होत आहे. ‘राजश्री’ हे त्यांच्या मुलीचे नाव होते जी सध्या जयपूरमध्ये असते. राजस्थानच्या कुचामन शहरात १४ मे १९१४ मध्ये जन्म झालेल्या ताराचंद बड़जात्या यांनी केवळ वयाच्या १९ व्या वर्षी अर्थात १९३३ साली चित्रपटांमध्ये प्रवेश केला आणि ‘मोती महल थियेटर्स’मध्ये काम चालू केले.

ताराचंद बडजात्या यांनी सर्वात आधी त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचे नाव त्यांचे दोन्ही मुलं असलेल्या ‘राज’ आणि ‘कमल’ यांच्या नावावर ‘राजकमल’ ठेवले होते. मात्र तेव्हाच व्ही. शांताराम यांनी याच नावाने त्यांचे प्रोडक्शन हाऊस चालू केले. तेव्हा ताराचंद बड़जात्या यांनी त्यांच्या मुलीच्या राजश्रीच्या नावावर त्यांच्या प्रोडक्शन हाऊस चालू केले. या प्रोडक्शन हाऊसमध्ये जेव्हा जेव्हा नवीन सिनेमे तयार व्हायचे तेव्हा ते घरातील सदस्यांना आणि ड्रायव्हर लोकांना देखील दाखवले जायचे. त्यानंतर या लोकांची चित्रपटावर मत घेतली जायची. मग गरज असेल तर तसे बदल करून सिनेमे प्रदर्शित केले जायचे. आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत बसून पाहण्यासारखे सिनेमे ‘राजश्री’चे असायचे.

ताराचंद बड़जात्या यांनी चेन्नई आणि हैद्राबादमधून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. साऊथ इंडियामधील अनेक निर्मात्यांना बॉलिवूडमध्ये आणण्याचे श्रेय त्यांनाच दिले जाते. त्यांनी सर्वात आधी चित्रपटाचे डिस्ट्रिब्युशन चालू केले आणि सर्वात आधी उत्तर आणि दक्षिण भारतात जालंधरपासून विशाखापट्टनमपर्यंत जवळपास २० प्रमुख शहरांमध्ये त्यांनी त्यांचे कार्यालय चालू केले. त्यांनी अनेक ब्लॉकबस्टर अशा चित्रपटांचे डिस्ट्रिब्युशन केले. यात ‘शोले’, ‘धर्मवीर’, ‘अमर-अकबर-एंथनी’, ‘विक्टोरिया नं. 203’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘कुली’, ‘खिलौना’, ‘बैजू बावरा’, ‘आनंद’, ‘गुड्डी’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘देवदास’, ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आदी हिट चित्रपटांचा समावेश आहे.

ताराचंद बड़जात्या यांनी नंतर १९६०मध्ये ‘राजश्री प्रॉडक्शन’ची स्थापना केली आणि हिंदी सिनेसृष्टीला एकापेक्षा एक सुंदर, हिट सिनेमे दिले. त्यांचा ‘आरती’ हा पहिला सिनेमा सुपरहिट झाला. १९६४ साली आलेल्या ‘दोस्ती’ चित्रपटाने चांगलाच धमाका केला. या सिनेमाला ६ फिल्मफेयर पुरस्कार मिळाले. त्यानंतर राजश्रीचा अविरत यशस्वी प्रवास चालू झाला. पुढे भारत सरकारने ताराचंद बड़जात्या यांना चित्रपट समितीचे सदस्य देखील बनवले. या समितीच्या अध्यक्ष त्याकाळी इंदिरा गांधी होत्या. पुढे १९९२ साली मुंबईमध्ये ताराचंद बड़जात्या यांचे दुःखद निधन झाले.

 

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post