हिंदी सिनेसृष्टीमध्ये ६० आणि ७० च्या दशकात अतिशय प्रतिभावान अभिनेत्री होऊन गेल्या. त्या अभिनेत्रींनी त्यांच्या सौंदर्यासोबतच त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना मोहिनी घातली होती. याच अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नूतन. नूतन यांनी त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयासोबतच बोल्डनेस देखील प्रेक्षकांना घायाळ केले. हिंदी चित्रपटसृष्टीतील या अतिशय सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नूतन यांची शुक्रवारी (४ जून) जयंती आहे. नूतन यांनी त्यांच्या करिअरमध्ये ७० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी…
नूतन यांचा जन्म ४ जून, १९३६ साली मुंबईमध्ये झाला. नूतन यांचे वडील कुमार सेन समर्थ हे प्रसिद्ध दिग्दर्शक, तर आई शोभना समर्थ या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री होत्या. बालपणापासूनच घरात चित्रपटमय वातावरण असल्याने नूतन या क्षेत्रात आल्या नसत्या तर नवलंच. नूतन यांनी वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजेच १९५० साली ‘हमारी बेटी’ सिनेमातून अभिनयात पदार्पण केले. हा सिनेमा त्यांच्या आईने शोभना समर्थ यांनी दिग्दर्शित केला होता.
वयाच्या १६ व्या वर्षी म्हणजे १९५२ साली नूतन यांनी मिस इंडियाचा ताज त्यांच्या नावावर केला. एका मुलाखतीदरम्यान शोभना समर्थ यांनी सांगितले की, “खूप जणं तिला बोलायचे की नूतन खूपच बारीक आहेत. मग मला वाटले की तिला ग्रूमिंगची गरज आहे. त्यासाठी मी तिला मसुरीला पाठवले. तिथे तिच्या ग्रूमिंगच्या वेळेला तिला एका ब्युटी कॉन्टेस्टमध्ये घेतले आणि ती ‘मिस मसुरी’ म्हणून निवडली गेली.”
‘सीमा’ हा सिनेमा त्यांच्या करिअरला कलाटणी देणारा आणि त्यांना एक अभिनेत्री म्हणून अढळ स्थान देणारा ठरला. त्यांनी खूप कमी वयात मोठे स्टारडम मिळवले होते. देव आनंद आणि त्यांची जोडी प्रेक्षकांना सर्वात जास्त भावली आणि ही जोडी खूप हिट आणि लकी देखील ठरली. सोबतच त्यांनी अशोक कुमार, किशोर कुमार, मनोज कुमार, सुनील दत्त, राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, धर्मेंद्र, संजीव कुमार, अमिताभ बच्चन आणि राज कपूर यांच्यासोबत देखील सिनेमे केले.
नूतन या करिअरच्या अगदी य़शाच्या शिखरावर असतानाचं त्यांनी रजनीश बहल यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. १९५९ साली नूतन यांनी रजनीश यांच्याशी लग्न केले. रजनीश यांचा चित्रपटसृष्टीशी काहीही संबध नव्हता. ते एक लेफनंट नेव्ही कमांडर होते. मात्र, लग्नानंतर नुतन यांच्या फिल्मी करिअरवर कोणातच परिणाम झाला नाही. त्यांनी त्यांचे काम सुरूच ठेवले होते.
साठ आणि सत्तरच्या दशकातल्या सिनेमांमध्ये महिलांना अतिशय साधे, सालस आणि आज्ञाधारी दाखवले जायचे. याच ६० च्या दशकात नूतन यांनी ‘दिल्ली का ठग’ या सिनेमात पहिल्यांदा स्विम सूट घालून सीन केला होता. अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी हे आव्हान पेलले आणि यशस्वीरित्या पूर्ण देखील केले. नूतन यांचा हा सीन पाहून त्याकाळी फक्त आणि फक्त नूतन यांच्याच चर्चा रंगल्या होत्या.
नूतन त्यांच्या लग्नानंतर देखील चित्रपटांमध्ये काम करत होत्या. त्यांनी संजीव कुमार यांच्यासोबत ‘देवी’ हा सिनेमा साईन केला होता. सुरुवातीला नूतन सेटवर संजीव यांच्यासोबत बोलत नव्हत्या. मात्र, काही काळाने त्यांच्यात छान मैत्री झाली. त्यानंतर ते सीन दरम्यान भरपूर गप्पा मारायचे. एकदा त्या सेटवर असताना त्यांनी एक मासिक वाचायला घेतले त्यात नूतन आणि संजीव कुमार यांच्या अफेयरबद्दल छापले होते. ते वाचून नूतन खूप चिडल्या आणि रागाच्या भरात त्यांनी सेटवरच सर्वांसमोर संजीव यांना जोरात कानाखाली मारली. त्याकाळी वृत्तपत्रात छापलेल्या बातमीनुसार, नूतन यांना त्यांचे पती रजनीश यांनीच संजीव यांना मारण्याचे सांगितले असल्याच्या बातम्या आल्या होत्या. आपले लग्न वाचवण्यासाठी त्यांनी असे केल्याचे देखील त्यात लिहिले होते. पुढे एका मुलाखतीदरम्यान नूतन यांनी या घटनेबद्दल सांगितले होते की, त्यांना या घटनेबद्दल खूप पश्चाताप झाला होता. पण काही दिवसांनी त्यांना समजले की, संजीव कुमार स्वतःच त्यांच्या अफेअरची अफवा इंडस्ट्रीमध्ये पसरवत होते.
अभिनयाच्या क्षेत्रात उंच शिखरावर असताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्या मात्र खूप उदास होत्या. कारण ज्या आईने त्यांना बोट धरून या क्षेत्रात आणले. त्यांच्यासोबतच नूतन यांचे नाते खराब झाले होते. त्यानी त्यांच्या आईवर शोभना समर्थ यांच्यावर पैशाच्या हेराफेरीचा आरोप लावला होता. यामुळे या मायलेकींमध्ये जवळपास २० वर्ष अबोला होता. मोहनीश बहल हे नूतन यांचे सुपुत्र असून ते देखील सिनेमांमध्ये कार्यरत आहे. आता बहल यांची तिसरी पिढी प्रनूतन बहलने देखील चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आहे.
नूतन यांनी त्यांच्या करियरमध्ये ‘नगीना’, ‘हमलोग’, ‘लैला मजनूं’, ‘सीमा’ ,’चंदन’ ,’ बंदिनी’ ,’छलिया’, ‘सरस्वतीचंद्र’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’, ‘सौदागर’, ‘छलिया’, ‘देवी’ आदी हिट सिनेमांमध्ये काम केले. नूतन यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांनी सलग ५ वर्ष उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकत रेकॉर्ड केला. सोबतच त्यांना १९७४ साली पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले होते.
नूतन यांना १९९० साली ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले. या आजाराशी लढतानाच त्यांनी २१ फेब्रुवारी, १९९१ या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर आज इतक्यावर्षानीही एक प्रतिभावान अभिनेत्री म्हणून त्यांना आठवले जाते.
प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या अशोक मामांना दैनिक बोंबाबोंबकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-हटाई अशी झाली की अशोक सराफ यांनी ब्लॅंकेटमध्ये तोंड लपवून केला होता कोल्हापूरपर्यंतचा प्रवास
-बॉलिवूडचा तो खलनायक, ज्याने बदलला सिनेमाचा अर्थ; हिरोपेक्षाही घ्यायचा अधिक मानधन










