Monday, May 27, 2024

Ashok Saraf |हटाई अशी झाली की अशोक सराफ यांनी ब्लॅंकेटमध्ये तोंड लपवून केला होता कोल्हापूरपर्यंतचा प्रवास

Ashok Saraf | चित्रपटसृष्टीमध्ये असंख्य कलाकार होऊन गेले, आहेत आणि येत राहतील. मात्र, काही कलाकार असे असतात, जे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या काळजावर कायमचं आपलं नाव कोरतात. असेच एक अभिनेते आहेत, ज्यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवला आहे. भूमिका कोणतीही असो, त्यामध्ये जिवंतपणा आणण्याचे काम त्यांनी केले आहे. अभिनय तर असा ठसकेबाज की, त्यांचा सिनेमा विसरणे हे एखाद्या चाहत्यासाठी अशक्यच गोष्ट म्हणावी लागेल. हे अभिनेते म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके ‘अशोक मामा’ अर्थातच अशोक सराफ. त्यांचा इथपर्यंतचा जीवनप्रवास खूपच रंजक होता. आज या लेखातून आपण तोच जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

मुंबईत झाला जन्म
भारतीय चित्रपटसृष्टीला आपली दखल घ्यायला लावणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म 4 जून, 1947 रोजी दक्षिण मुंबईतील चिखलवाडी येथे झाला होता. मुलगा जेव्हा मोठा होतो, तेव्हा प्रत्येक बापाला वाटत असतं की, आता त्याने नोकरी केली पाहिजे. तसंच अशोक सराफ यांच्या वडिलांनाही वाटत होतं. पण अशोक यांना अभिनयात शिरायचं होतं आणि भविष्यात त्यांना चंदेरी दुनियेचा प्रवास घडलाही. त्यांनी आपल्या वडिलांच्या हट्टापायी बँकेतील नोकरी करण्याचं ठरवलं. त्यांनी प्रतिष्ठित बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली ती एक अन् दोन वर्षे नाही, तर चांगली 10 वर्षे. पण नाण्याला जशा दोन बाजू असतात, तशा अशोक यांच्यासुद्धा दोन बाजू होत्या. त्यांनी नोकरी करत असताना दुसरीकडे आपली अभिनयाप्रती असलेली आवडही जोपासली. ते नाटकातही भाग घ्यायचे. केवळ 18 वर्षांचे असताना त्यांनी मराठी नाटकांत काम करायला सुरुवात केली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत विदूषकाच्या भूमिकेने विनोद क्षेत्रात एक वेगळेच स्थान मिळवले. त्यांनी वि. वा. शिरवाडकर यांच्या ‘ययाती’ नाटकात विदूषकाची भूमिका साकारली. खरं तर प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणाऱ्या अशोक सराफ यांचा अभिनयाचा प्रवास इथूनच सुरू झाला होता.

अशाप्रकारे सुरू झाला चित्रपटप्रवास
‘ययाती’मधील भूमिका साकारून प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी पुढे चित्रपटाच्या दिशेने आपलं पाऊल टाकलं. या नाटकातील त्यांच्या भूमिकेने प्रभावित होऊन दिग्गज दिग्दर्शक गजानन जहागीरदार यांनी अशोक सराफ यांना एक रोल दिला होता. त्यांचीही नुकतीच सुरुवात होती, त्यात रोलही छोटा आणि पैसाही जास्त नव्हता. मात्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण करून प्रत्येकाला आपल्या उपस्थितीची जाणीव करून दिली होती. सन 1971मध्ये प्रदर्शित झालेला ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हाच त्यांचा पहिला वहिला चित्रपट होता.

ब्लँकेटमध्ये डोके घालून केला होता प्रवास
अशोक सराफ एकदा कोल्हापूरला महालक्ष्मी एक्सप्रेसच्या सेकंड क्लासच्या डब्याने प्रवास करत होते. त्याकाळी अभिनेत्यांना सिनेमातील कामासाठी अतिशय कमी मानधन मिळत असे. दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना प्रवासात ओळखले व त्यांची मिळणाऱ्या मानधनावरुन चांगलीच खेचली. त्यानंतर संपूर्ण प्रवासात अशोक सराफ यांनी ब्लॅंकेटमध्ये डोके घालून प्रवास केला होता. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात असा एक तरी दिवस येतोच. मात्र, त्यातील खूप कमी कलाकार त्यावर मात करून आपल्या आयुष्यात यशस्वी होतात.

चित्रपट दुनियेच्या दिशेने पावलं टाकायला त्यांनी सुरुवात केली खरी, पण त्यांना यशाची चव चाखायला तब्बल 4 वर्षे लागली. चित्रपट क्षेत्रातील मोठ्ठं नाव असलेले दादा कोंडके यांच्या सन 1975मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पांडू हवालदार’ चित्रपटामुळेच त्यांनी खऱ्या यशाची चव चाखली. त्यांना या चित्रपटाने मिळालेले यश हे इतके अफाट होते की, पुन्हा त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. यादरम्यान अनेक विनोदी कलाकार आले, पण टिकले ते फक्त अशोक सराफ आणि सर्वांचे लाडके अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे.

लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या जोडीने घातला धुमाकूळ
होय, बरोबर वाचलंत तुम्ही. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडीने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. ऐंशी आणि नव्वदच्या दशकात या जोडीने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खदखदून हसायला भाग पाडलं. विशेष म्हणजे ते दोघेही अनेक वर्षे एकमेकांचे शेजारी होते. अंधेरीतील अंबोली येथील एका इमारतीत ते एकमेकांच्या शेजारी राहायचे. पुढे अशोक लोखंडवाला येथे, तर लक्ष्मीकांत बेर्डे वर्सोवाला राहायला गेले. त्या दोघांनीही काम केलेल्या चित्रपटांच्या यादीत ‘अशी ही बनवाबनवी’, ‘धुम धडाका’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘शेजारी शेजारी’, ‘फेका फेकी’, ‘धमाल बबल्या गणप्याची’, ‘टोपी वर टोपी’ यांसारख्या 50पेक्षा अधिक चित्रपटांचा समावेश आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या व्यतिरिक्त त्यांना सचिन पिळगावकर यांचीही साथ मिळाली. त्यांनी सोबत केलेल्या अनेक चित्रपटांनी धमाल केली. आजही त्यांचे चित्रपट प्रेक्षक आवडीने पाहतात.

अशोक सराफ यांनी 250 पेक्षाही अधिक मराठी चित्रपटांमध्ये केले काम
चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेल्या अशोक सराफ यांनी 1969 सालापासून 250पेक्षा जास्त मराठी सिनेमांत काम केलं आहे. यातील 100 सिनेमे हे कर्मशिअल हिट्स आहेत. त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ‘अशी ही बनवाबनवी’, ‘गम्मत जम्मत’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘धुम धडाका’, ‘एक डाव भुताचा’, ‘बिन कामाचा नवरा’ आणि ‘एका पेक्षा एक’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटातून त्यांनी स्वत: ला सिद्ध केले.

हिंदी चित्रपटातही उमटवला आपला ठसा
मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर अशोक सराफ यांनी हिंदी चित्रपटांमध्येही आपला ठसा उमटवला. हिंदीच्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यात ‘करण अर्जुन’, ‘कोयला’, ‘बेनाम बादशाह’, ‘घर घर की कहाणी’, ‘प्यार किया तो डरना क्या’, ‘सिंघम’, ‘गुप्त’, ‘एस बॉस’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच अजय देवगण, गोविंदा, जॉनी लिव्हर, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केले.

भोजपुरी चित्रपटातही झळकले
अशोक सराफ यांनी ‘माईका बिटुआ’ या भोजपुरी सिनेमातही काम केले आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील भुमिकेसाठी त्यांना भोजपुरी फिल्मचा मानाचा पुरस्कारही मिळाला आहे.

अशोक सराफ यांचे पुरस्कार
सन 1977मध्ये ‘राम राम गंगाराम’ सिनेमासाठी अशोक सराफ यांना पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यांना संपूर्ण कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 5 फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

वयाच्या 43व्या वर्षी लग्न
आपल्या कारकिर्दीत यशाच्या पायऱ्या चढताना अशोक सराफ यांना एक सुंदर जोडीदारही मिळाला. ती जोडीदार म्हणजेच निवेदिता जोशी होय. आपल्यापेक्षा तब्बल 18 वर्षे लहान असणाऱ्या निवेदिता यांच्याशी अशोक यांनी वयाच्या 43व्या वर्षी सन 1990मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाची गोष्टही रंजक आहे.

प्रसिद्ध कलाकार असल्यामुळे अशोक आणि निवेदिता हे मुंबईसारख्या शहरातच लग्न करतील असे सर्वांना वाटले होते. मात्र, त्यांनी लग्न केले ते थेट गोव्यात. गोव्यातील मंगेशी मंदिरात त्यांनी लग्न केले. विशेष म्हणजे मंगेशी देवी ही अशोक सराफ यांचे कुलदैवत आहे. म्हणूनच त्यांनी मुंबईत नाही, तर थेट गोव्याला जाऊन मंगेशीच्या मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना एक मुलगाही आहे. त्याचं नाव अनिकेत सराफ आहे. तो एक शेफ असून आपल्या यूट्यूब चॅनेलवर नेहमीच जेवण बनवतानाचे व्हिडिओ शेअर करत असतो. विशेष म्हणजे त्यांनी एकत्र अनेक चित्रपटांत काम केले. यात ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘अशी ही बनवाबनवी’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

अपघाताचाही केलाय सामना
कलाकाराचे आयुष्य सर्वांनाच सुखाचे आणि ऐशआरामाचे वाटते, पण अनेकदा कलाकाराला बऱ्याच भयानक गोष्टींचा सामना करावा लागतो. असेच काहीसे अशोक सराफ यांच्याबाबतही झाले होते. त्यांचे आजपर्यंत दोन वेळा मोठे अपघात झाले आहेत. पहिल्या अपघातात त्यांच्या नाकाला मोठी जखम झाली होती. त्यादरम्यान त्यांनी तब्बल 6 महिने कोणत्याही चित्रपटाचे काम केले नव्हते. यानंतर त्यांनी गणेश चतुर्थीला आपल्या कामाला सुरुवात केली होती.

याव्यतिरिक्त त्यांचा दुसरा अपघात हा ‘गोल गोल डब्यातला’ या सिनेमाच्या पत्रकार परिषदेला जाताना झाला होता. सन 2012 साली मुंबई- पुणे महामार्गावर झालेल्या त्या मोठ्या अपघातात ते थोडक्यात वाचले होते. झाले असे होते की, त्यांची गाडी वेगाने जात असतानाच गाडीचा मागील टायर फुटला होता. या गाडीमध्ये अशोक सराफ, अभिनेता संतोष जुवेकर तसेच चित्रपटाचे दिग्दर्शक असित रेडीज आणि संगीतकार सतीश चंद्रही होते.

मामा नाव कसं पडलं?
जन्मलेल्या बाळापासून ते दिग्गज व्यक्तींपर्यंत अनेकांना प्रेमाने काही नावे मिळतात, तर टोपणनावानेही ओळखले जाते. अशोक सराफ यांनाही मराठी चित्रपटसृष्टीत ‘मामा’ या नावाने ओळखले जाते. एकदा खुद्द अशोक सराफ यांनीच यापाठीमागचा राज सांगितला होता. त्यांचा एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर कॅमेरामन प्रकाश शिंदे यांची मुलगी आली होती. जेव्हा तिने अशोक सराफ यांना काय म्हणून हाक मारायची विचारलं? तेव्हा शिंदे यांनी तिला अशोक सराफ यांना मामा म्हणायला सांगितलं. तेव्हापासून त्यांना अशोक सराफ यांना मामा या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले.(special story about veteran marathi actor ashok saraf)

प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या अशोक मामांना दैनिक बोंबाबोंबकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
इश्क का रंग सफेद! साराचे प्रेमात पाडणारे फोटोशूट, एकदा पाहाच
190 कोटींच्या आलीशान घराबद्दल उर्वशीच्या आईने साेडले मौन; म्हणाल्या, ‘इंशाअल्लाह…’

हे देखील वाचा