राजकारणाचा नाद लय बेक्कार, राजकारण म्हणजे येड्याखुळ्याचा खेळ नव्हे अशा अनेक ओळी आपण राजकारणाबद्दल ऐकत असतो. सत्तेसाठी रक्ताचीच नाती विसरणाऱ्या, खुर्चीसाठी समोर येईल त्याला सहज चिरडून टाकणार्या रगील, खुनशी माणसांची कथा म्हणजे 3 जूनला रिलीज झालेला इर्सल चित्रपट, तीन तास निखळ मनोरंजन करणारा आणि शेवटी बाहेर पडताना राजकारणाचा विळखा तरुणांना कशाप्रकारे उध्वस्त करतो हाच विचार करायला भाग पाडणारा असा हा चित्रपट गल्लीगल्लीतल्या युवा नेत्यांनी का आवर्जुन पाहावा, काय आहे या चित्रपटाची कथा, चला जाणून घेऊ.
राजकारणात विजयी गुलाल आपल्याच अंगावर पडला पाहिजे अशी प्रत्येक नेत्याची इच्छा असते, आणि यासाठी ते कसल्याही चाली खेळायला तयार असतात. सत्ता, खुर्चीसाठी हपापलेला नेता आणि यात भरडला जाणारा कार्यकर्ता याचीच गोष्ट या चित्रपटात रंगवली आहे. अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट शेवटपर्यंत तुम्हाला पडद्यावरुन लक्ष विचलित होऊ देत नाही, हेच या चित्रपटाच मोठ यश आहे. चित्रपटाची सुरुवात पपु आणि सायलीच्या नुकत्याच बहरत चाललेल्या प्रेम कथेने होते.
पपु म्हणजेच नंदकुमार घोलप एक साधा, सरळ गरीब मुलगा, काम करत करत शिक्षण घेत असतो. याच नंदुची सामाजिक कार्य करणाऱ्या भाऊ घरत यांच्याशी भेट होते. इथुनच त्याची राजकारणात झालेली एंट्री आणि शेवटी याच राजकारणाने घेतलेला जीव , अशी या चित्रपटाची मांडणी . पण राजकारण आणि प्रेमकथा या दोन्हींचाही मेळ या चित्रपटात घातला आहे. ज्यामुळे चित्रपट अजिबात कंटाळवाणा वाटत नाही. राजकारणाचे डाव, कुरघोड्या असा प्रवास करत करत चित्रपट एक सामाजिक संदेश देऊन जातो.
मध्यांतरापर्यंत चित्रपट प्रेमकथेवरुन हळुहळु राजकारणाकडे वळतो. कथेसोबत प्रेक्षकांची उत्सुकताही आणखीनच वाढत जाते. मजुरी करुन पोट भरणाऱ्या नंदुचा शेवटी नंदकुमार शेट होतो, ज्यांनी प्रेमाने डोक्यावर घेतलं त्यांनाच पायाखाली चिरडुन निवडुनही येतो, पण त्याचाही बरबटलेल्या राजकारणात विजयी मिरवणुकीतच जीव जातो, असा या कथेचा मन सुन्न करायला लावणारा शेवट. चित्रपटाचा हा शेवट जितका प्रेक्षकांना शेवटी भावूक करुन जातो. तितकाच राजकारण म्हणजे बिनकाळजाच्या माणसांचा धंदा हा अनमोल संदेशही देऊन जातो. थोडक्यात या चित्रपटाची कथा प्रेम, सुड, राजकारण अशा अनेक वळणे घेत संपते आणि बाहेर पडताना मात्र प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडते.
अनिकेत बोंद्रेच्या या सुंदर कथेला आकार देण्याच काम चित्रपटातील कलाकारांनी अत्यंत प्रभावीपणे केले आहे. चित्रपटात नंदकुमार च्या भूमिकेतील विक्रम सुर्यकांत आणि सायलीच्या भूमिकेत दिसणारी शिवानी मोझे पाटील. या नवोदितांनी आपल्या अभिनयाने सर्वांचीच मने जिंकली आहेत. सायलीच्या भूमिकेतील शिवानीच्या सहजसुंदर अभिनयाला दाद द्यावीच लागेल. त्याचप्रमाणे दादासाहेब या राजकीय नेत्याची भूमिका मोहन आगाशे यांनी उत्तमरित्या साकारली आहे. चित्रपटात खलनायक म्हणून काशिनाथच्या भूमिकेत अनिल नगरकरने जी कमाल केली आहे त्याला तोडच नाही. तर अभिनेते शशांक शेंडे यांनी भाऊ घरतची साकारलेली साधी सरळ भूमिका चांगलीच भाव खाऊन जाते. चित्रपटात इतरही अनेक छोटेमोठे कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या छोट्याशा भूमिकेतही दमदार अभिनय केला आहे. सुजाता मोगलने संगीताच्या भूमिकेत साकारलेली हळवी भूमिका आणि तिने त्याला केलेला साजेसा अभिनय तिची छोटीशी भूमिकाही शेवटपर्यंत लक्षात राहते.
चित्रपटाच्या यशात जितका वाटा या पडद्यावरील कलाकारांचा आहे, तितकाच पडद्यामागील शिल्पकारांचाही आहे. नाद केला ना बाद करीन, राजकारणात गुलालाशिवाय मज्जा नायं असे अनेक भन्नाट डायलॉग चित्रपटात आहेत. विश्वास सुतार यांनी लिहलेली रांगडी करारी भाषा, भन्नाट डायलॉग चित्रपटाच्या कथेला आणखीनच आकर्षक करतात. त्याचप्रमाणे चित्रपटाला दिनकर शिर्के यांच संगीत लाभलेल आहे. चित्रपटातील प्रत्येक गाणे कथेला साजेशे आहे त्यामुळे बसल्या बसल्या गाणी गुणगुणण्याचा मोह प्रत्येकालाच होतो.
मध्यांतरानंतर कंटाळलेल्या प्रेक्षकांच्या अंगात पुन्हा उर्जा आणण्याच काम माधुरी पवारने केलयं. तिची या बया दाजी ही लावणी पाहून तरुण प्रेक्षक शिट्या मारल्याशिवाय राहत नाही. तिचा तडफदार डान्स आणि अदा प्रेक्षकांना आपसूक नाचायला भाग पाडतात. थोडक्यात चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शकांनी एका संवेदनशील विषयाला या कथेतुन वाचा फोडण्याचा प्रामणिक प्रयत्न केला आहे. साहेबांच्या, दादांना दैवत माणणाऱ्या प्रामणिक कार्यकर्त्याने नक्की बघावा, बोध घ्यावा असाच तीन तासात निखळ मनोरंजनाचा डोस देणारा हा चित्रपट आहे.असच या चित्रपटाबद्दल म्हणाव लागेल.
हेही वाचा –
स्ट्रगलर असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या जया भादुरी, अशी होती प्रेमकहाणी
‘जवान’मध्ये दिसला अंगावर शहारे आणणारा शाहरुख खानचा लूक, एसआरकेच्या तिसऱ्या नवीन सिनेमाची झाली घोषणा