Saturday, June 29, 2024

करिअरमध्ये1699 मॅच जिंकणाऱ्या अंडरटेकरला अक्षय कुमारने चारलेली धूळ? एका क्लिकवर कळेल खरं की खोटं

अंडरटेकर, हे नाव तसं सर्वांच्याच ओळखीचं. कारण तो डब्ल्यूडब्ल्यूई आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ पाहणाऱ्या नव्वदच्या दशकातील सर्वांचाच आवडता होता. तो किती वेळा मेला आणि किती वेळा परत जिवंत झाला, हा तर सर्वांनाच पडलेला प्रश्न. त्याला रिंगमध्ये हरवणं म्हणजे जणू अशक्यच, आणि ज्यांनी हरवलंय त्या ट्रिपल एच, ब्रॉक लेस्नर, केन, शॉन मायकल, बटिष्टा या दिग्गज रेसलर्सनी तर पार जीवाचं रान केलं होतं, पण तुम्हाला जर असं सांगितलं की, या सर्वांच्या आधी बॉलिवूडचा खिलाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अक्षय कुमार (Akshay kumar) याने अंडरटेकरला हरवलं होतं, तर तुमचा विश्वास बसणार नाही. आता यामागील सत्य काय आहे ते आपण जाणून घेऊया…

अक्षयला असा मिळाला ‘खिलाडी’ टॅग
तारीख होती 5 जून, 1922. थिएटरमध्ये नवीन सिनेमा लागला होता. नाव होतं ‘खिलाडी.’ अक्षयने यापूर्वी ‘सौगंध’ आणि ‘डान्सर’ यांसारखे सिनेम दिले होते. तरीही हे दोन्ही सिनेमे त्याला आपला ब्रेकथ्रू मिळवून देण्यात अपयशी ठरले. अशात त्याला अब्बास- मस्तान यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमाकडून अपेक्षा होती. हा सिनेमाही अपेक्षेनुसार कमालीचा हिट ठरला. या सिनेमानंतर अक्षयनं परत कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘खिलाडी’ हिट झाला. पुढील काही महिने हा सिनेमा ज्या थिएटरमध्ये लागला, त्याच्यापुढं हाऊसफुलची पाटी लागणं सामान्य झालं होतं. अक्षय आपलं बस्तान बसवलं होतं. याच सिनेमामुळे अक्षयला ‘खिलाडी’ हा टॅग मिळाला.

अक्षयने ‘खिलाडी’ची साथ पुढेही सुरूच ठेवली. ‘मैं खिलाडी तू अनाडी’ आणि ‘सबसे बडा खिलाडी’ हे त्याचे 90च्या दशकातील यशस्वी सिनेमे. त्यानंतर उजाडलं 1996वर्ष. तारीख होती 14 जून. रिलीझ झाला होता ‘खिलाडियों का खिलाडी.’ हा त्या काळातील सर्वात हिट सिनेमांपैकी एक. त्यावेळी सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीतील पाचव्या क्रमांकावरील सिनेमा. ‘खिलाडियों का खिलाडी’ हा असा सिनेमा आहे, ज्याच्याशी आपल्या बालपणीच्या आठवणी जोडल्या आहेत. जसं की अक्षयने अंडरटेकरला हरवणे. आलो आपण आपल्या विषयाकडं.

‘खिलाडियों का खिलाडी’ या सिनेमात अक्षयने अक्षय मल्होत्रा हे पात्र साकारलं होतं. यातील अक्षयचं ‘हम है सीधे- साधे अक्षय-अक्षय’ हे गाणे चांगलेच गाजले होते. आजही प्रेक्षकांच्या ओठावर हे गाणे आहे. असो, सिनेमात अक्षयचा भाऊ हरवलेला असतो. त्याला शोधण्यासाठीच अक्षय कंबर कसून निघतो. सिनेमात त्याच्या भावाची भूमिका दिवंगत अभिनेता इंदर कुमारने केली होती. इंदरने ‘घुंघट’, ‘मासूम’ आणि ‘वाँटेड’ यांसारख्या सिनेमात काम केलं होतं. अक्षयला समजतं की, त्याचा भाऊ मॅडम मायासाठी काम करायचा. त्यामुळे भावासाठी अक्षयही मॅडम मायाच्या टीमचा भाग बनतो.

मॅडम माया या नावावरून एक नाव सतत डोक्यात येतं. ते म्हणजे ‘माया, तेरी तो मैं बदल दूंगा काया.’ हा डायलॉग म्हणत असतो मायाचा दुश्मन ‘किंग डॉन.’ मॅडम माया आणि किंग डॉन बेकायदेशीरपणे रेसलिंगचे सामने भरवत असतात. जिथे दोन्ही बाजूच्या रेसलर्समध्ये फाईट होते. त्यावेळी अक्षय मायाचा खास फायटर बनलेला असतो. त्यामुळे मायाकडून तो रिंगमध्ये उतरतो. किंग डॉनकडून रिंगमध्ये येतो ६ फुट उंच असलेला गोरा-गोमटा अंडरटेकर. ज्याचा चेहरा दाढीने झाकलेला असतो, आणि तो मध्ये मध्ये ‘पंगा’ बोलत असतो. रिंगमध्ये दोघेही एकमेकांच्या आमने-सामने येतात. दोघांमध्ये जोराची फाईटही होते. अक्षयने अंडरटेकरला खाली पाडल्यानंतर. तो फेमस असलेल्या त्याच्या स्टाईलमध्येच उठतो, पण शेवटी अक्षय त्याला हरवतोच.

खरंच होता का अंडरटेकर?
‘खिलाडियों का खिलाडी’ या सिनेमाच्या रिलीझवेळी एक मोठा ऍडव्हर्टायझिंग पॉईंट होता की, सिनेमात तुम्हाला अक्षयसोबत अंडरटेकर भांडण करताना दिसेल. त्यावेळी काय इंटरनेट सगळीकडं आलं नव्हतं. भारतात इंटरनेट आलं ते 15ऑगस्ट, 1995रोजी. विदेश संचार निगम लिमिटेडद्वारे. त्यामुळे तेव्हा इंटरनेटचा फार काही वापर नव्हता. त्यामुळे प्रेक्षकांच्या ताटात जे वाढलं, तेच त्यांनी खरं समजलं. मात्र, नंतर याचा खुलासा झाला.

अक्षयसोबत फाईट करणारा अंडरटेकर खरोखरचा अंडरटेकर नव्हताच. उगाच नव्वदीच्या पोरांना वाटायचं की, अक्षयने अंडरटेकरला हरवलंय. खरं तर तो अमेरिकेचा प्रोफेशनल रेसलर ब्रायन ली होता. त्याने अंडरटेकरचा कॉस्च्युम घालून अक्षयसोबत फाईट केली होती. हा खुलासा अक्षय कुमारनेही केला होता. त्याने एक मीम शेअर करून सांगितलं होतं. खरं तर त्या सिनेमात अक्षय कुमारने ज्या अंडरटेकरला हरवलं होतं, तो खरा अंडरटेकर नव्हताच.अंडरटेकरबद्दल रंजक माहिती अशी की, तो 26 जून, 1987 रोजी रेसलिंगमध्ये आला होता. त्यानंतर तो 22 नोव्हेंबर, 2020रोजी रिटायर झाला. तो त्याच्या करिअरमध्ये एकूण 2193 मॅचेस खेळला, त्यापैकी त्याने 1699मॅचेस जिंकल्या होत्या.

हेही वाचा-
मराठी अभिनेत्री रितिका श्रोत्रीचा हॉट लूक, फोटो पाहून चाहते घायाळ
‘आत्मपॅम्फ्लेट’चा दमदार टीझर रिलीझ; ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा