Saturday, June 29, 2024

स्वत: श्रीदेवींना शोधायचा होता जान्हवी कपूरसाठी जोडीदार, पण अधुरी स्वप्नं घेऊन अभिनेत्रीने सोडलं जग

जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या बॉलिवूडमध्ये ठसा उमटवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. ‘धडक’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण करणाऱ्या जान्हवीकडे सध्या बॉलिवूडचे अनेक चित्रपट आहेत. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) आणि बोनी कपूर (Boney Kapoor) यांची ती मुलगी आहे. अभिनेत्री मुलाखतींमध्ये तिची आई श्रीदेवीबद्दल अनेकदा बोलली आणि एकमेकांसोबतच्या चांगल्या बाँडिंगबद्दल अनेक खुलासेही केले. त्याच वेळी, एका मुलाखतीत जान्हवी कपूरने सांगितले होते की, श्रीदेवी मुलांच्या निवडीच्या बाबतीत त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेवत नसत.

होय, एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी कपूरने सांगितले होते की, “ती मला सांगायची की कोणत्याही मुलाबद्दलच्या माझ्या निर्णयावर तिचा विश्वास नाही. त्यामुळे ती स्वतः माझ्यासाठी जोडीदार शोधेल. कारण मी कोणाच्याही सहज प्रेमात पडते.” जान्हवीच्या जोडीदारामध्ये कोणते गुण असावेत, या प्रश्नावर जान्हवी कपूर म्हणाली होती की, “तो प्रतिभावान असावा. त्यासाठी उत्साही असायला हवा. त्याला पाहून मी उत्साहित होऊ शकेल आणि त्याच्याकडून काहीतरी शिकू शकेल. यासोबतच विनोदाची चांगली जाणही खूप महत्त्वाची आहे. आणि हो, त्याला माझे वेड लागलेले असावे.” (janhvi kapoor talked about mom sridevi)

जान्हवी कपूरला कसे लग्न करायचे आहे?
जान्हवी कपूरने तिला कोणत्या प्रकारचे लग्न करायचे आहे, हेही सांगितले. ती म्हणाली, “मला मोठे आणि फॅन्सी लग्न नको आहे. तिरुपतीमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न करणार, हे मी आतापासूनच ठरवले आहे. मी कांजीवरम साडी नेसेन आणि लग्नानंतर पूर्ण मेजवानी असेल. ज्यामध्ये माझ्या आवडीचे दक्षिण भारतीय पदार्थ जसे की इडली-सांबार, दही-भात आणि खीर दिली जाईल.”

२४ फेब्रुवारी २०१८ रोजी श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले. त्या एका कौटुंबिक लग्नात सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. जान्हवी कपूरचा पहिला चित्रपट येण्यापूर्वीच श्रीदेवी हे जग सोडून गेल्या.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर जान्हवी कपूर ‘मिली’ व्यतिरिक्त ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसणार आहे. सिद्धार्थ सेनगुप्ताचा ‘गुड लक जेरी’ आणि वरुण धवनसोबतचा ‘बवाल’ हे तिचे आगामी चित्रपट आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा