Friday, June 14, 2024

ब्रेकअपनंतर तब्बल ५५ वर्षांनी भेटले होते ‘ते’ दोघे, शेजारी बसले अन्….

बॉलीवुडमध्ये आपल्याला अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींच्या प्रेमकथा पाहायला मिळाल्या. यातील काही प्रेमकथा पुर्णत्वास जातात तर काही अधुऱ्याच राहतात. काही अभिनेत्यांच्या बॉलीवूडमध्ये ३-४ प्रेमकथा होतात. त्यातील एखादीच शेवटापर्यंत जाते. तर काही कलाकार अगदी सुरुवातीलाच प्रेमात पडतात व त्याच अभिनेत्रीशी पुढे संसार थाटतात. अशाच अपूर्ण प्रेमकथांपैकी एक कथा अशा दोन कलाकरांविषयी आहे ज्यांच्याविषयी आपण कल्पनादेखील केली नसेल. असो जास्त ताणत नाही सांगूनच टाकतो ही अधुरी प्रेम कहाणी आहे बॉलिवूडचे महानायक ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांची…

कामिनी कौशल आणि दिलीप कुमार यांची लव्ह लाइफ एकेकाळी फार चर्चेत आली होती. खरं पाहायला गेलं तर कामिनी या दिलीप कुमार यांच्या पहिल्याच प्रेयसी होत्या. १९४८ मध्ये रिलीज झालेल्या ‘शहीद’ चित्रपटाच्या सेटवर या दोघांच्या प्रेमाला सुरूवात झाली. दोघेही त्यावेळी लग्नाची योजनादेखील आखत होते. याशिवाय दोघांनीही नदिया के पार, आरझु, शबनम या इतर चित्रपटांमध्येही एकत्र काम केलं होतं.

माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या तेव्हाच्या बातम्यांनुसार कामिनी दिलीप कुमार यांना डेट करत होत्या. त्यावेळी त्या आधीपासूनच विवाहित होत्या. विशेष म्हणजे कामिनी यांचं लग्न त्यांच्या मोठ्या बहिणीच्या नवऱ्याबरोबर झालं होतं. खरं तर, कामिनी यांच्या बहिणीचा एका अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता शिवाय त्यांना एक मूलही होतं. म्हणून कुटुंबाच्या दबावाखाली कामिनी यांनी त्यांचे मेहुणे बी.एस. सूद यांच्याशी लग्न केलं होतं.

कामिनी यांच्या भावाला जेव्हा कळालं की त्याची विवाहित बहीण दिलीप कुमार यांना डेट करीत आहे, तेव्हा तो रागाने लालबुंद झाला. त्याने दिलीपकुमार यांना कामिनी यांच्याशी सारे संबंध तोडण्याची धमकी दिली. शिवाय कामिनी यांनाही त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात जाता आलं नाही.

२०१४ मध्ये ग्लॅमर मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये कामिनी म्हणाल्या होत्या की , “त्यांनी (दिलीप कुमार) आपल्या चरित्रामध्ये लिहिले आहे की ते माझ्यापासून विभक्त झाल्यानंतर मनातून पार खचले होते. परंतु वास्तविकता अशी आहे की आम्ही दोघे त्यावेळी खचलो होतो. आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी होतो. पण आम्ही काय करू शकत होतो? मी, पुरे झालं आता मी जात आहे असं सांगून कोणालाही (पती) फसवू शकत नव्हते. मी माझ्या थोरल्या बहिणीला काय तोंड दाखवलं असतं. माझे पती खूप समजूतदार होते. त्यांना हे समजलं होतं की हे असं का झालं? कारण कोणीही प्रेमात पडू शकतं ”

अनेक वर्षानंतर दिलीप कुमार आणि कामिनी कौशल हे दोघे २०१३ मध्ये दिवंगत अभिनेते प्राण यांच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात एकमेकांसमोर आले होते. दिलीप कुमार पत्नी सायरासमवेत तेथे पोहोचले होते. यावेळी दिलीप साहेबांची खुर्ची कामिनी कौशल यांच्या शेजारीच होती. दिलीप कुमार त्यावेळी ९० वर्षांचे आणि कामिनी ८६ वर्षांच्या होत्या. परंतु दिलीप कुमार कामिनी यांना तेव्हा ओळखूही शकले नाहीत.

२०१४ मध्ये एका मुलाखती दरम्यान कामिनी म्हणाल्या, “दिलीप कुमार यांनी जेव्हा मला एक ब्लॅंक लुक दिला तेव्हा माझं हृदयच तुटलं. खरंतर त्यावेळी त्यांना कोणालाही ओळखण्यात त्रास होत होता. हे पाहून मला खूप वाईट वाटलं आणि मी तेथून दूर निघून गेले.” अशी होती बॉलिवूडच्या महानायकाची अर्थात दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांची अधुरी प्रेमकहाणी!

हे देखील वाचा