मागील काही दिवसांपासून कंगना रणौत तिच्या पासपोर्टच्या नूतनीकरणावरून सतत चर्चेत आहे. देशद्रोहाच्या दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे पारपत्र प्राधिकरणाने पारपत्र नूतनीकरणास नकार दिला होता. या विरोधात कंगनाने कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर अनेक दावे आणि प्रतिदावे झाल्यानंतर कोर्टाने याचा निर्णय पासपोर्ट प्राधिकरणाच्या बाजूने देत कंगनाच्या पासपोर्टचे नूतनीकरण करायचे की नाही, याचा निर्णय पासपोर्ट प्राधिकरणावर सोडला होता.
मात्र कंगनाने काही वेळापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करत तिचा पासपोर्ट रिन्यू झाल्याची माहिती दिली आहे. मागच्या अनेक दिवसांपासून कंगना तिच्या पासपोर्ट नूतनीकरणाच्या टेन्शनमध्ये होती. मात्र तिचा पासपोर्ट रिन्यू झाल्यामुळे आता कंगनाला दिलासा मिळाला आहे.
कंगनाने सोशल मीडियावर ‘धाकड’ सिनेमाच्या दिग्दर्शकांसोबत एक फोटो शेअर करत लिहिले, “मला माझा पासपोर्ट मिळाला. तुमच्या सर्वांची चिंता आणि शुभेच्छांसाठी खूप धन्यवाद. चीफ लवकरच मी तुमच्यासोबत असणार आहे.” कंगनाला पासपोर्ट मिळाल्यामुळे चाहत्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. कंगनाच्या या पोस्टवर एका फॅनने कमेंट केली की, ‘ऑल द बेस्ट क्वीन कंगना.’ तर दुसर्या फॅनने लिहिले की, ‘अभिनंदन’. तिच्या हजारो चाहत्यांना कंगनाची ही पोस्ट आवडली आहे.
आगामी ‘धाकड’ या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कंगनाला बुडापेस्टला जावे लागणार होते. ज्यासाठी तिला पासपोर्टचे नूतनीकरण करणे आवश्यक होते. त्यानंतर कंगनाने मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. परंतु, कोर्टानेही या प्रकरणाचा निर्णय पासपोर्ट प्राधिकरणावरच सोडला होता.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कंगना लवकरच ‘थलायवी’ या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात ती तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपट याच वर्षी एप्रिलमध्ये रिलीझ होणार होता, पण कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. याशिवाय कंगनाने तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची तयारीही सुरू केली आहे. या चित्रपटात ती इंदिरा गांधीच्या भूमिकेत दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’
-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका










