बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांची नक्कल करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कॉमेडियन तीर्थानंद राव याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. आर्थिक अडचणींमुळे तीर्थानंदने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शेजाऱ्यांमुळे वेळीच तीर्थानंदचे प्राण वाचले. माध्यमातील वृत्तानुसार, तीर्थानंदने २७ डिसेंबरच्या संध्याकाळी विष प्राशन केले होते. चार दिवस तो रुग्णालयात होता आणि आता त्याची प्रकृती सुधारत आहे.
एका मुलाखतीत तीर्थानंदने विष प्यायल्याची कबुली दिली आहे. आर्थिक अडचणींमुळे हे पाऊल उचलल्याचे त्याने सांगितले आणि त्यामुळेच त्याचे कुटुंबीयही त्याला सोडून गेले आहे. तीर्थानंद म्हणाला, “होय, मी विष प्यायले होते आणि माझी प्रकृती गंभीर होती. आर्थिक विवंचनेसोबतच माझ्या कुटुंबातील सदस्यांनीही मला सोडले आहे.” (Kapil Sharma comedian attempt suicide)
पत्नीही गेली सोडून
त्याने सांगितले, “मी हॉस्पिटलमध्ये होतो, पण माझी आई आणि भाऊ मला भेटायलाही आले नाहीत. आम्ही एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतो आणि मी गेल्या १५ वर्षांपासून येथे राहत आहे, पण माझे कुटुंब माझ्याशी बोलतही नाही. एवढेच नाही तर त्यांनी माझ्या उपचारासाठी एक पैसाही खर्च केला नाही. मी कर्जात आहे. हॉस्पिटलमधून आलो असूनही मी घरी एकटाच राहतो. यापेक्षा वाईट परिस्थिती कोणाची असू शकते.”
आपल्या पत्नी आणि मुलीबद्दल बोलताना तीर्थानंद म्हणाला की, “मी ज्याच्याशी लग्न केले आहे, ती एक नृत्यांगना आहे. आम्हाला एक मुलगीही आहे, पण माझ्या पत्नीने पुन्हा लग्न केले. माझ्या मुलीचेही लग्न झाले आहे. माझा त्यांच्याशी संपर्क नाही. मी पोलिसांची माफी मागतो आणि आता मी कामाच्या शोधात आहे. आता मी माझ्या आवडीला फॉलो करीन.”
तीर्थानंदला नाना पाटेकर यांची कॉपी म्हटले जाते. नाना पाटेकरची नक्कल करतानाचे त्याचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. इतकंच नाही, तर तीर्थानंद कॉमेडियन कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शोचाही भाग होता.’ तो कपिलच्या शोमध्ये नाना पाटेकरची नक्कल करताना दिसला होता, जे प्रेक्षकांना खूप आवडले होते.










