Friday, July 5, 2024

‘गोल्डन बॉय नीरज चोप्राने ‘बिग बीं’ना दिल्या भाला फेकण्याच्या टिप्स; म्हणाला, ‘फेकून दाखवला असता पण…’

ऑलिंपिक पदक विजेते नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेश अमिताभ बच्चन यांचा शो ‘कौन बनेगा करोडपती १३’च्या आगामी भागात दिसणार आहेत. सोनी टेलिव्हिजन एन्टरटेन्मेंटने प्रदर्शित केलेल्या एपिसोडचा टिझर इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. कारण ही जोडी हॉट सीटवर असूनही बिग बींसोबत मजा करताना दिसत आहेत. आगामी भागाच्या एका टिझरने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे, जिथे प्रेक्षकांनी खेळ आणि बॉलिवूड यांच्यात एक अद्भुत जुगलबंदी पाहिली. यादरम्यान नीरज चोप्रा अमिताभ बच्चन यांना भाला फेकण्याच्या काही टिप्स देताना दिसला. तो भाला प्रभावीपणे कसा फेकावा हे बिग बींना सांगत होता.

सोनी वाहिनीने हा टिझर ट्विटरवर नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेशच्या एपिसोडसह शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत, कॅप्शन देण्यात आले आहे की, ”चलेगी हॉकी, चलेगा भाला, केबीसी १३ में नीरज, श्रीजेश और एबी सर के संग दिखेगा गेम ओलंपिक वाला! नक्की पाहा हा रोमांचक क्षण. #कौन बनेगा करोड़पति.”

नीरज चोप्रा आणि पीआर श्रीजेशच्या या मजेदार भागात देशातील दोन मोठे खेळाडू दिसतील. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अमिताभ बच्चन यांनी एक हॉकी स्टिक आणि एक भाला काढला. त्यानंतर त्यांनी ऍथलेटिक्सला त्यांचा खेळ शिकण्यासाठी काही टिप्स समजावून सांगण्यास सांगितले.

ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता २३ वर्षीय नीरज चोप्राने भाला फेकण्यासाठी वापरलेल्या तीन वेगवेगळ्या पकड दाखवल्या आणि अमिताभ यांना त्याची आवडती पकड देखील दाखवली. यानंतर नीरज चोप्रा अमिताभ बच्चन यांना म्हणाला की, “मी तुम्हाला भाला फेकून दाखवला असता पण…” त्यावर अमिताभ लगेच म्हणाले, “सर, हे करू नका सर.” यानंतर स्टुडिओमध्ये सर्वजण जोरदार हसू लागले.

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये पदक जिंकल्यानंतर भारतीय क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रेक्षकांकडून टाळ्यांच्या जोरावर या जोडीचे स्वागत करण्यात आले. या दोघांच्या आगमनावर अमिताभ बच्चन यांनी ‘हिंदुस्तान जिंदाबाद’च्या घोषणाही दिल्या. जनरल नॉलेजची प्रश्नांची उत्तरे देण्याव्यतिरिक्त, केबीसी प्रोमोमध्ये खेळाडू आणि दिग्गज अभिनेते यांच्यात एक मजेदार देवाणघेवाण झाली. प्रोमोमध्ये नीरज चोप्रा अमिताभ बच्चन यांना हरियाणवी बोलण्याच्या टिप्स देताना दिसला. हा भाग १७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-निधन झाले गायिकेचे, पण सपना चौधरीलाच ठरवले मृत; अफवेने उडाली होती कुटुंबीयांची झोप

-ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद, ‘ही’ आहे शेवटची पोस्ट

-अरबाजने अनिल यांना विचारला सलमानच्या लग्नाचा प्रश्न; अभिनेते म्हणाले, ‘तू तर त्याचा भाऊ आहेस…’

हे देखील वाचा