Wednesday, June 26, 2024

“…रुबाबात नाच, बिनधास्त नाच !” किरण माने यांनी गौतमी पाटीलसाठी लिहिलेली ‘ती’ खास पोस्ट चर्चेत

गौतमी पाटील हे नाव माहित नाही अशी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. आपल्या अश्लील डान्समुळे, विवादित वक्तव्यांमुळे आणि या ना त्या कारणामुळे तिच्यावर होणाऱ्या सततच्या टीकेमुळे गौतमी नेहमीच लाइमलाईट्मधे येत असते. कोणत्याही मोठ्या कलाकाराला मिळेल एवढे लक्ष तिला मीडिया, सोशल मीडिया आणि लोकांकडून मिळते. गौतमी हे नाव रोजचू विविध वादांमध्ये अडकते किंवा वादांना तोंड फोडते. अशातच तिची प्रतिमा बघता काही दिवसांपूर्वी तिच्या आडनावावरून एक नवीन वाद चर्चेत आलाआहे. तिचे खरे आडनाव हे पाटील नाही तर चाबुकस्वार असे आहे असा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला. ते तिला धमकी देताना म्हणाले की, “पाटील हे आडनाव लावत गौतमी पाटलांची बदनामी करत आहे. त्यामुळे तिने जर तिचे खरे आडनाव लावले नाही तर तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही.”

आता या आडनावाच्या वादावर अनेकांनी त्यांचे मत व्यक्त केले. गौतमीने देखील ती पाटील हेच आडनाव लावणार असल्याचे जाहीर केले. यात आता अभिनेते किरण माने यांनी देखील उडी घेत तिला पाठिंबा दिला आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमधून गौतमीला त्यांचा पाठिंबा दिला आहे. किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत या प्रकरणावर त्यांचे मत मांडले आहे.

किरण यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “…”एक छोटीशी चिमणीसुद्धा आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिव करते रे…” गौतम बुद्धांनी अंबठ्ठाला सांगीतलेलं हे वाक्य हे भारतीय साहित्यातलं नितांतसुंदर आणि आशयघन वाक्य आहे असं आ.ह. साळुंखे तात्या नेहमी म्हणतात. आपल्या संविधानातल्या ‘स्वातंत्र्य’ या मुल्याचं इतकं समर्पक स्पष्टीकरण दुसरीकडे कुठे क्वचितच सापडेल.

चिमणीला सुद्धा स्वत:च्या मनाप्रमाणं चिवचिवण्याची मुभा आहे… आपण तर माणूस आहोत. आपल्याला असं व्यक्त होण्याचं, मनाप्रमाणे वागण्याचं स्वातंत्र्य का मिळू नये??? एखाद्यानं काय बोलायचं… कसं वागायचं… स्वत:च्या घरात काय खायचं… कसले कपडे घालायचे… यावर बंधनं आणण्याचे प्रकार सुरू आहेतच… पण आता कळस झालाय. एका मुलीने पोटापाण्यासाठी काय करावं? किती पैसे घ्यावेत?? इथंपासून ते आता, तिनं कुठलं आडनांव लावावं??? यासाठी सुद्धा दुसरंच कुणीतरी जबरदस्ती करत आसंल… धमक्या देत आसंल तर हे लै म्हंजे लैच संतापजनक आणि लाजीरवाणं हाय.

गौतमी, जेव्हा तू चुकली होतीस, तुझ्या व्हल्गर हातवार्‍यांवर गदारोळ उठला होता, तेव्हा तू माफी मागीतली होतीस… पुन्हा ती चूक होणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतलीस. खरंतर त्यानंतरच तू लोकप्रियतेच्या पायर्‍या चढू लागलीस. आज तू जे करतेस त्यात आता ‘बिभत्स’ असं काहीही नाही. परफॉर्मन्स करताना अंगभर कपडे असतात. तू ज्या अदाकार्‍या करतेस त्यावर ग्रामीण भागातली तरूण पोरं जीव ओवाळून टाकतात.. तुझ्या क्षेत्रात अशी लोकप्रियता लाखात एखादीला लाभते. तुझा डान्स हा उच्च दर्जाचा आहे की नाही, याविषयी प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकतं आणि त्या प्रत्येक मताचा आदर आहे… पण तरीही कुणीही हे नाकारू शकत नाही,की आजच्या तरूणाईमध्ये तुझी जबरदस्स्त ‘क्रेझ’ आहे.. तुझ्या स्टेजवरच्या फक्त एंट्रीनं तरूणाई पागल होते.. गांवखेड्यांत तू लोकप्रियतेचा कळस गाठला आहेस. तिथे मराठी सिनेमा-सिरीयलमधल्या टॉपच्या अभिनेत्रींपेक्षा तू पॉप्युलर आहेस. तू हे यश एंजॉय कर. बर्‍याचदा अशा यशाचा काळ छोटा असतो. जोवर आहे तोवर धमाल कर. तुझ्यात जिद्द आणि चिकाटी असेल तर याहूनही मोठे यश मिळवशील पुढे जाऊन. पण ‘आम्हाला वाटतंय तसंच तू वागावंस, तस्संच नाचावंस आणि आम्ही सांगतोय तेच नांव लावायचंस’ असं दरडावू पहाणार्‍यांना उंच उंच लांब उडवून लाव.

आज तरी तू आमच्या ग्रामीण भागातल्या मनोरंजनक्षेत्रातली ‘पाटलीण’ हायेस… रुबाबात नाच, बिनधास्त नाच !”

दरम्यान आता किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत त्यांना पाठिंबा दिला आहे तर काहीही विरोध दर्शवला आहे.

हे देखील वाचा