Tuesday, June 25, 2024

चार महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या ‘या’ अभिनेत्याचा त्याच्याच घराबाहेर संशयास्पद रूपात सापडला मृतदेह

मनोरंजनविश्वात सतत निधनाच्या बातम्या येतच आहेत. एकामागोमाग एक अशा अनेक दिग्गज कलाकारांचे मागच्या काही दिवसांमध्ये निधन झाले. यात हिंद, प्रादेशिक कलाकारांसोबतच हॉलिवूडमधील कलाकारांचा देखील समावेश आहे. आता हॉलीवूडमधून पुन्हा एक निधनाची बातमी समोर येत आहे. ब्राजीलियन अभिनेता जेफरसन मचाडो हा त्याच्या घराबाहेर एका बॉक्समध्ये मृतावस्थेत सापडला आहे.

एका माहितीनुसार ब्राजीलचा अभिनेता असणारा जेफरसन मचाडो हा मागील काही महिन्यांपासून बेपत्ता होता. मात्र नुकताच तो त्याच्या रियो डी जनेरियो येथील घराबाहेर एका लाकडाच्या बॉक्समध्ये मृतावस्थेत आढळला आहे. त्यांचे पारिवारिक मित्र असणाऱ्या सिंटिया हिल्सेंडेगर यांनी जेफरसनच्या इंस्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आम्हाला सांगण्यास अतिशय खेद जाणवत आहे की, जेफरसनला २२ मे रोजी बेवारसरित्या मृतावस्थेत पाहण्यात आले आहे.”पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४४ वर्षीय जेफला साखळीने बांधून मग बॉक्समध्ये पॅक केले गेले होते. या बॉक्सला काँक्रीटने झाकण्यात देखील आले आणि घराच्या मागे सहा फूट खोल टाकण्यात आले होते.

जेफरसन मचाडोच्या वकिलांनी सांगितले की, त्याचे हात डोक्याच्या मागे बांधण्यात आले होते आणि त्याला एका बॉक्समध्ये टाकून पुरले गेले. हा बॉक्स घरात असणाऱ्या बॉक्स सारखा दिसतो. फिंगर प्रिंट रिपोर्टनुसार त्याला ओळखले गेले आहे. त्याच्या गळ्यावर निशाण असल्यामुळे गळा दाबून त्याची हत्या केल्याचे सांगितले जात आहे. जेफच्या परिवाराने सोशल मीडियावर लिहिले, “जेफरसनची इर्षा, दुष्ट आणि बेईमान लोकांकडून हत्या करण्यात आली आहे. लवकरच अधिक माहिती मिळेल. पोलीस त्यांचे काम चांगल्या पद्धतीने करत असून, मदत करणाऱ्या सर्वांचे धन्यवाद.”

दरम्यान आता पोलीस जेफरसनच्या मारेकऱ्यांचा शोध घेत असून, लवकरच ते सापडण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

हे देखील वाचा