Friday, December 8, 2023

किशोर कुमार यांना आधीच लागली होती मृत्यूची चाहूल, म्हणूनच त्यांनी…

‘आले बहू गेले बहू’ परंतु किशोर कुमार यांच्यासारखा बहुआयामी नट या सिनेसृष्टीला आजवर भेटलाच नाही. सिनेसृष्टीतील लखलखत्या ताऱ्यांमध्ये किशोर कुमार यांचे नाव आग्रहाने घ्यावेच लागेल. किशोर कुमार यांनी रुपेरी पडद्यासह संगीत क्षेत्रात देखील आपल्या आवाजाने कमाल केली. फक्त संगीत आणि अभिनयापूर्ती त्यांची महती नव्हती, तर त्यापलीकडे जाऊन ते एक उत्तम पटकथालेखक आणि कुशल निर्माते देखील होते. अशा या बहुआयामी कलाकाराची शुक्रवारी (13ऑक्टोबर ) पुण्यतिथी आहे. बॉलिवूडच्या सोनेरी इतिहासात किशोर कुमार हे नाव सदैव लखलखत राहील. त्यांचे या क्षेत्रातील योगदान वाखाणण्याजोगे आहे.

Photo Courtesy: kishore da the legend/Instgram
Photo Courtesy: kishore da the legend/Instgram

किशोर कुमार यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929रोजी मध्यप्रदेशच्या खंडवा येथे झाला. लहानपापासूनच त्यांचे एक स्वप्न होते, त्यांना त्यांचे भाऊ अशोक कुमार यांच्यापेक्षा जास्त पैसे कमवायचे होते. किशोर यांना के एल सहगल हे गायक खूप आवडायचे. त्यांनी नेहमी सहगल यांच्या प्रमाणे गाण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यात अनेक असे किस्से आहेत जे वाचून तुम्ही देखील चकित व्हाल. आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने त्यांचे असेच काही किस्से जाणून घेऊया.

स्वप्ननगरी मुंबईला म्हणाले होते कुरुप

किशोर कुमार शूटिंगमुळे मुंबईमध्येच राहायचे. त्यांना येथील वातावरण अजिबात आवडत नव्हते. किशोरदा यांना सतत गावी जाण्याची ओढ लागलेली असायची. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते की, “कोणत्या मुर्खाला या शहरात रहायचं आहे. इथे प्रत्येक जण एकमेकांचा वापर करू पाहत आहे. कोणीच मित्र नाही. कुणावर विश्वास ठेवावा असंही कोणी नाही. मला या सर्वांपासून दूर माझ्या गावी खंडवाला जायचे आहे. एवढ्या कुरुप शहरामध्ये कोण राहणार?”

दिग्दर्शकाला लावा पळवून

एका मुलाखतीमध्ये किशोर कुमार यांचा मुलगा अमित कुमार यांनी सांगितले होते की, “एकदा चित्रपटाची शूटिंग संपली होती आणि सर्व टीममधील व्यक्ती त्यांच्याकडे पैसे मागू लागले. तेव्हा किशोर कुमार म्हणाले होते की, एवढे जास्त पैसे कसे काय झाले, एवढे तर नाही व्हायला पाहिजे. हा दिग्दर्शक स्वतःला समजतो तरी काय? मी निर्माता आहे चला पळवून लावा या दिग्दर्शकाला. त्यावेळी बाकीचे म्हणाले तुम्हीच आहात दिग्दर्शक. यावर किशोर कुमार हसत म्हणाले की, अरे हो मीच तर आहे. दिग्दर्शक.” यावर त्यावेळी तिथे खूप हशा पिकला होता.

चौकीदाराला असे घबरवले की, त्याला घामचं फुटला

किशोर कुमार यांच्या चौथ्या पत्नी लीना यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “त्यांना लोकांना चकित करायला खूप आवडायचे. एकदा तर त्यांनी परदेशाहून एक मुखवटा आणला होता. ज्यावेळी त्यांनी तो लावला त्यांना पाहून आमचा चौकीदार खूप घाबरला होता. तो एवढा घाबरला की त्याला खूप घाम फुटला होता.”

मृत्यूची चाहूल आधीच लागली होती

किशोर कुमार यांचे निधन झाले तेव्हा अशी चर्चा सुरू होती की, त्यांना आधीच त्यांच्या मृत्यूची कल्पना आली होती. त्यांचा मुलगा अमित कुमार यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितले होते की, “त्या दिवशी त्यांनी सुमितला स्विमिंग पूलमध्ये जाण्यापासून रोखले होते. तसेच कॅनडामध्ये विमान लवकर आणि नीट खाली येणार की नाही याचीही त्यांना चिंता लागली होती. त्यावेळी ते मस्करीमध्ये म्हणाले होते की डॉक्टरांना बोलव मला हृदयविकाराचा झटका येईल आणि पुढच्याच क्षणी तसे झाले. त्यांना लगेचच हृदयविकाराचा झटका आला, आणि अशा या महान कलाकाराचे निधन 13 ऑक्टोबर 1987 रोजी झाले. वयाच्या58 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

‘जिंदगी एक सफर’, ‘ये जो मोहब्बत है’, ‘मेरे दिल मे आज’, ‘ओ साथी रे’, ‘ओम शांती ओम’, ‘दे दे प्यार दे’ अशी अनेक गाणी गाऊन ते अजरामर झाले. त्यांची गाणी आजही ऐकली तरी मन मंत्रमुग्ध होते. त्यांनी ‘पडोसन’, ‘गंगा की लहरे’, ‘हाफ तिकट’, ‘नौकरी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार अभिनय देखील साकारला होता.

हेही नक्की वाचा-
दिग्गज गायक किशोर कुमारांची कार्बन कॉपी आहेत अमित कुमार, फोटो पाहिला का?
एका जाहीरातीमुळे बदलली ‘तिची’ जिंदगी! थेट मिळाली होती ऋतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी

हे देखील वाचा