Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्समध्ये नाव, एका वर्षात ३३ चित्रपटांमध्ये काम जाणून घ्या बप्पी दा यांच्या उपलब्धी

बॉलिवूडच्या संगीताला एक नवी दिशा देणारे आणि पॉप सांगीतला भारतात ओळख मिळवून देणारे जेष्ठ संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी आज (१६ फेब्रुवारी) ला दुःखद निधन झाले. बप्पी दा यांनी त्यांच्या गाण्यांमध्ये सतत नावीन्य ठेवल्याने त्यांच्या गाण्यांना लोकांकडून तुफान प्रतिसाद मिळायचा. त्यांचा भारदस्त आवाज आणि संगीताची समज या दोन गोष्टींनी त्यांना बॉलिवूडमध्ये लोकप्रिय केले. बप्पी लहरी यांना संगीत क्षेत्रातील डिस्को किंग म्हटले जात होते. बप्पी लहरी हे संगीतासोबतच सोने घालण्याच्या शैलीसाठी ओळखले जात होते.

त्यांची गाणी आणि त्या गाण्यांची लोकप्रियता बघता ८०/९० च्या दशकात बप्पी दा सगळ्यांची पहिली पसंत बनले. त्यांची संगीतातली समज आणि नवीन काहीतरी करण्याच्या वृत्तीने हॉलीवूडवर देखील त्यांच्या म्युझिकची जादू पसरली होती. त्यांनी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर विविध उपलब्धी देखील मिळवल्या. आज या लेखातून जाणून घेऊया त्यांच्या उपलब्धीबद्दल.

यूके मधील ‘वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्स’ने भारतीय चित्रपटांमधील योगदानासाठी बप्पी दा यांना सन्मानित केले होते. बप्पी लहिरी यांना सिंथेसाइज्ड डिस्को मुझिकला इंडियन टच देण्यासाठी ओळखले जाते. एकाच वर्षात ३३ चित्रपटांमध्ये काम केल्यामुळे त्यांचे नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड्स’मध्ये देखील नोंदवण्यात आले आहे. एका मुलाखतीदरम्यान खुद्द बप्पी दा यांनीच याचा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, “माझ्या नावाने एकाच वेळी ५ स्टुडिओ बुक असायचे. मी तेव्हा एकसाथ ५ स्टुडिओमध्ये काम करायचो.” याशिवाय बप्पी दा पहिले असे भारतीय संगीतकार होते ज्यांना ‘चाइना अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना ‘जिम्मी जिम्मी’ या गाण्यासाठी देण्यात आला होता.

बप्पी दा यांनी फक्त हिंदी चित्रपटांसाठी नाही तर मल्याळम, कन्नड, तेलगू, पंजाबी आणि उडिया भाषांमधील चित्रपटांना देखील संगीत दिले आहे. वयाच्या केवळ २० व्या वर्षी त्यांनी त्यांचे करिअर सुरु केले होते. २०१८ साली त्यांना फिल्मफेयर पुरस्कारांमध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

बप्पी दा यांनी अनेक चित्रपटांना संगीत तर दिले सोबतच काही चित्रपटांमध्ये गाणी देखील गायली. त्यांनी गायलेली गाणी देखील तुफान हिट झाली. त्यांनी काही चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला असून, १९७४ सळई आलेल्या किशोर कुमार यांच्या ‘बढ़ती का नाम दाढ़ी’ चित्रपटात बापू जिप्सियन या पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. १९८३ साली ‘कलाकार’ १९९० साली ‘नयन मोनी’ चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

हेही वाचा :

हे ही पाहा :

हे देखील वाचा